Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 October 2010

कर्नाटक : बंडखोर आमदार अपात्रच

सभापतींच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
बंगलोर, दि. २९ : कर्नाटकातील ११ बंडखोर भाजप आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा सभापतींच्या निर्णयावर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले असून, या निर्णयामुळे येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारला फार मोठा दिलासा मिळाला आहे.
मागच्या सुनावणीच्यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वातील खंडपीठात मतभेद निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण न्या. व्ही. जी. संभाहित यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या ११ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा विधानसभा सभापती के. जी. बोपय्या यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा न्या. संभाहित यांनी आज दिला आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत घटनेच्या दहाव्या प्रकरणातील कलम २ (१) (अ) नुसार बोपय्या यांनी दिलेला निर्णय योग्य आहे, असे न्या. संभाहित यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.
याआधी तीन सदस्यीय खंडपीठात या प्रकरणी मतभेद निर्माण झाले होते. यांपैकी एका न्यायाधीशांनी बोपय्या यांचा निर्णय योग्य ठरवला होता. तर, दुसरे न्यायाधीश एन. कुमार यांनी अध्यक्षांचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे ही याचिका तिसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आली होती. न्या. संभाहित यांनी आज या याचिकेवरचा आपला निर्णय दिला आणि औपचारिक आदेश देण्यासाठी हा निर्णय खंडपीठाकडे पाठवला.
कर्नाटक उच्च न्यायालयाचा आजचा निर्णय हा राज्य सरकारसाठी फार मोठा विजय मानला जात आहे. ११ बंडखोर भाजप आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आले होते. मात्र, त्यानंतर १४ आणि १६ ऑक्टोबरला सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले होते.
निर्णयाचे येडियुरप्पांकडून स्वागत
११ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आनंद व्यक्त केला असून, पक्षांतर करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने आजचा निर्णय म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करून सरकारला अडचणीत आणणाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा निर्णय धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे पक्षांतर रोखण्यात आजचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी मला आशा आहे, असे येडियुरप्पा यांनी निर्णयानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

No comments: