ओलसर मैदानामुळे क्रिकेट सामना रद्द
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - पावसाने कृपा करूनही बाह्यमैदान सुकवण्यात अपयश आल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम झटपट आंतरराष्ट्रीय सामना आज अखेर रद्द करण्यात आला व त्यामुळे गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. यजमानांनी ही "पावसाळलेली' मालिका १-० अशी जिंकली हाच काय तो रसिकांना मिळालेला एकमेव दिलासा.
फातोर्डा मडगाव येथील नेहरू स्टेडियमचा परिसर पहाटेपासून फुलून गेला होता. स्टेडियममध्ये प्रवेशासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. कधी एकदा स्टेडियममध्ये प्रवेश मिळतोय, असे प्रेक्षकांना झाले होते. मात्र आसनावर स्थानापन्न झाल्यानंतर पहिली उद्घोषणा झाली ती अकरा वाजता मैदानाची पाहणी करण्याची. तरीसुद्धा मेक्सिकन वेव्हज तयार करून रसिकांना आपला उत्साह कायम ठेवला होता. त्यानंतर सव्वाबारा वाजता दुसरी पाहणी केली जाईल, अशी घोषणा झाली. तेव्हा मात्र प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
अधिकृत घोषणेला अक्षम्य विलंब
दरम्यानच्या काळात, समालोचन कक्षात बसलेले सुनील गावस्कर, रवी शास्त्री, , अरुणलाल, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मायकेल बेव्हन, ब्रॅड हॉग या मंडळींनी काढता पाय घेतला तेव्हाच सामना रद्द झाल्याची चाहूल प्रेक्षकांना लागली होती. तथापि, आयोजकांकडून बराच वेळ झाला तरी तशी अधिकृत घोषणा करण्यास विलंब करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यांनी मग आपला राग तेथील आसनांवर काढला. निदान वीस षटकांचा तरी सामना होईल, अशी "छोटीसी आशा' प्रेक्षक बाळगून होते. त्यांच्या पदरी अंतिमतः पडली ती घोर निराशा. त्यांचा प्रचंड हिरमोड झाला आणि सुन्न मनाने त्यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या नावाचा उद्धार करत घरची वाट धरली.
सकाळी मैदानाबाहेर आणि प्रत्यक्ष मैदानातही प्रचंड उत्साह दिसून आला. मैदानाबाहेर तिरंग्यांची धडाक्यात विक्री सुरू होती. त्यांना प्रेक्षकांकडून प्रतिसादही उत्तम मिळत होता. काही जण चेहऱ्यावर तिरंगा रंगवून आले होते, तर कोल्हापूरसारख्या भागातून आलेल्या अनेकांनी भगवा फेटा परिधान करून या सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला. गोव्याबाहेरून आलेल्या अनेकांनी मैदानाच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार करून त्यात मुक्काम ठोकला होता. त्यांच्या साऱ्या परिश्रमांवर पाणी फेरले गेले.
चिकन बिर्याणी "फक्त' १०० रुपयांत!
प्रेक्षक म्हणजे अशा सामन्यांच्या वेळी असाहाय्य बकरेच बनलेले असतात. त्याचा विदारक प्रत्यय या लढतीच्या वेळीदेखील आला. स्टेडियममध्ये एकदा प्रवेश केला की, बाहेर पडायची सोयच नसते. या सुवर्णसंधीचा फायदा उठवून केटरिंगवाले आपले उखळ पांढरे करून घेतात. आजच्या लढतीवेळी या मंडळींनी छोट्या बॉक्समधील चिकन बिर्याणीचा दर चक्क शंभर रुपये ठेवला होता. व्हेज बिर्याणी ८० रुपयांना मिळत होती. शीतपेयाचा एक ग्लास वीस रुपये तर पंधरा रुपयांची पाण्याची बाटली वीस रुपयांना विकली जात होती. व्हेज रोल चाळीस रुपयांना तर व्हेज पॅटिसची किंमत होती २० रुपये. प्रेक्षकांपैकी अनेकांनी या लूटमारीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. पण करणार काय, पोटात भूकेचा आगडोंब उसळल्यावर पैशाचा विचार सुचतो कोणाला, अशी संतप्त प्रतिक्रिया बहुतांश क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.पैसे परत मिळणार
या लढतीसाठी तिकीटे काढलेल्या सर्व प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी येत्या २८ तारखेनंतर प्रेक्षकांनी फेडरल बॅंकेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन गोवा क्रिकेट असोसिएशनने केले आहे. निदान त्यामुळे तरी क्रिकेटप्रेमींना हायसे वाटले असेल यात शंका नाही.
..आणि साईटस्क्रीन कोसळला
सामना सुरू होणार की नाही याबद्दल ठोस माहिती मिळत नसल्यामुळे प्रेक्षक काहीसे चिडचीडे झाले होते. दुसरीकडे ढोल ताशांचा गजर सुरूच होता. त्याचवेळी पावणेबाराच्या ठोक्याला मीडिया बॉक्ससमोर "कर्रऽऽ' असा प्रचंड आवाज करत भलामोठा साईटस्क्रीन अचानकपणे कोसळला. त्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला. सुदैवाने तेव्हा तेथे ग्राऊंड स्टाफ किंवा अन्य मंडळींची गर्दी नव्हती. अन्यथा मोठाच अनर्थ ओढवला असता. सामना सुरू असताना अशी आफत ओढवली असती तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नव्हती. प्रेक्षकांनी मग गॅलरीतून या धारातीर्थी पडलेल्या साईटस्क्रीनचे "दर्शन' घेतले. नंतर मोठ्या दोरखंडांचा आधार देऊन हा साईटस्क्रीन उभा करण्यात आला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.. मात्र त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनातील ढिसाळपणाचा प्रत्यय देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले पाहुणे आणि पत्रकारांसह सर्वांनाच आला.
Monday, 25 October 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment