सक्ती रद्द न केल्यास शुक्रवारी "गोवा बंद'
व्यापक बैठकीत राज्यस्तरीय संघटना स्थापन
पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपण दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची केल्याचा आदेश काढल्याने त्यांच्या विरोधात दि. २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण गोवा बंद ठेवण्याचा इशारा आज वाहतूकदारांनी दिला. या नंबर प्लेटच्या विरोधात सर्व वाहतूकदार, राजकीय पक्ष तसेच व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन "अखिल गोवा युनियन अगेन्स्ट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' या संघटनेची स्थापना केली. या बंदानंतरही सरकारला जाग येत नसल्यास अमर्यादित काळासाठी गोवा बंद केला जाणार असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. आज सकाळी घेतलेल्या व्यापक बैठकीनंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते.
येत्या चार दिवसांत सरकारने आपला निर्णय रद्द करावा, अन्यथा संपूर्ण गोवा बंद झाल्यानंतर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे. बेमुदत गोवा बंद ठेवण्याचाही संघटनेचा विचार असल्याची माहिती श्री. कळंगुटकर यांनी दिली. यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे गोविंद पर्वतकर, युवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर, सुदीप ताम्हणकर, महेश नाईक व मान्युएल रॉड्रिगीस उपस्थित होते. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या विरोधात यापुढील लढा या संघटनेतर्फे दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या सकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. केवळ वाहतूक मंत्र्यांना हवा असलेला हा प्रस्ताव स्वतःच्या फायद्यासाठी संपूर्ण गोव्यावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या विरोधात लढा उभारण्यासाठी दि. २५ सप्टें. रोजी सर्व महाविद्यालय, विद्यालय, दुकाने, तसेच वाहतूक बंद ठेवून या लढ्याला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री. कळंगुटकर यांनी केले.
"वाहतूक मंत्री खोटे बोलतात. आमच्या त्यांच्यावर विश्वास नाही. गोवा बंदचे दुष्परिणाम जनतेवर होऊ नये, यासाठी सरकारने येत्या २५ सप्टेंबर पूर्वी हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा प्रस्ताव रद्द करावा', अशी मागणी यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली. आम आदमीचे सरकार म्हणून हे सरकार केवळ खास आदमीसाठीच कार्यरत आहे, अशी टीकाही त्यांनी बोलताना केली.
गेल्या दीड महिन्यापासून या नंबर प्लेटच्या विरोधात हा लढा सुरू आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल येण्याचीही वाट न पाहता वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही नंबर प्लेट सक्तीची केली. त्याच्या या हट्टी स्वभावामुळे आणि जनतेच्या विरोधात जाण्याच्या प्रकारामुळे संपूर्ण सरकारवर परिणाम व्हायला लागला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द केल्याचे जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत, तोवर सरकारच्या कोणत्याच आश्वासनावर विश्वास ठेवला जाणार नाही, असे यावेळी संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत प्राचार्य संघटना, व्यापारी संघटना, विद्यार्थी संघटना, महाविद्यालय विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष सचिव यांची बैठका घेऊन त्यांनाही या लढ्यात उतरवले जाणार असल्याचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
आज सकाळी झालेल्या वाहतूकदारांच्या बैठकीत नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी सुदेश कळंगुटकर यांची निवड करण्यात आली आहे. तर, सचिवपदी सुदीप ताम्हणकर यांना नियुक्त केले आहे. उपेंद्र गावकर, आशिष शिरोडकर, मंगेश व्हायकर, अविनाश भोसले व महेश नाईक हे उपाध्यक्ष असून अनिल होबळे हे सहसचिवपदी आहेत. तसेच, साल्वादोर परेरा हे खजिनदार असून रितेश नार्वेकर हे सहखजिनदार आहेत. त्याचप्रमाणे गोविंद पर्वतकर, संकल्प आमोणकर व सुदीप ताम्हणकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक झाली आहे. नामदेव नाईक, उदय सामंत, फ्रान्सिस सिल्वा, यशवंत देसाई, नीळकंठ गावस व जनार्दन भंडारी यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
Monday, 21 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment