प्रफुल्ल डहाणूकर यांनी उलगडले कलेचे विविध "रंग'
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) ः निळ्याशार कॅनव्हासच्या डोहावर चित्रमयी झुळकीने तरंग उठावेत. प्रत्येक तरंगात जीवनाचा नवा अर्थ सामावलेला. त्याला लाभलेली अध्यात्माची डूब अशा चैतन्यदायी वातावरणात आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा त्या उपभोग घेत आहेत. सृजनता आणि सर्जनशीलता यांचा मनोहारी संगम त्यांच्या ठायी झाला आहे. बुधवारी कातरवेळी त्यांनी "गोवादूत'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व संपादकीय मंडळाला त्या "विविधरंगी' दुनियेत घेऊन गेल्या. या अनौपचारिक गप्पांच्या मैफलीने सारा माहोलच "प्रफुल्ल'मय बनला. त्या विभूतीचे नाव प्रफुल्ल डहाणूकर! आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकार अन् गोव्याची माहेरवाशिण. वास्कोचे प्रसिद्ध उद्योगपती अण्णा जोशी यांच्या त्या भगिनी होत. त्यांचे वास्तव्य मुंबईत असले तरी गोमंतभूमी म्हणजे त्यांच्या काळजातील हळवा कोपरा. सागराची गाज, संथ लयीत डुलणारे प्रसन्न माड, कुळागरे, झुळझुळ वाहणारे ओहोळ या गोव्यातील निसर्गसंपदेचे वर्णन करताना त्यांचे डोळे तेजाने चमकत होते. आजही त्यांना गोव्याची ओढ असून वेळ मिळेल तेव्हा त्या गोव्याला हटकून भेट देतात.
चित्रकला जणू त्यांच्या रक्तातच भिनली आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार श्री. गायतोंडे हे त्यांचे कलाक्षेत्रातील गुरू. आतापर्यंत सौ. प्रफुल्ल यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने इंग्लंड, आईसलॅंड यासारखे युरोपीय देश व आखाती देशांत आयोजित करण्यात आली आहेत. नुकतेच इंग्लंडमध्ये भरविलेले त्यांचे चित्रप्रदर्शन तर "बर्कलेज' या अग्रगण्य कंपनीने प्रायोजित केले होते. इंद्रधनुष्यात जसे अनेक रंग बेमालूम मिसळलेले असतात तसेच त्यांचे व्यक्तिमत्व. गायनाचे म्हणाल तर त्या केवळ कानसेन नसून रागदारीची त्यांना असलेली माहिती थक्क करून सोडणारीच. ख्यातनाम ठुमरी गायिका शोभा म्हणजे त्यांची जीवाभावाची सखी. तुम्ही जर चित्रकार झाला नसता तर... या प्रश्नाला त्यांनी क्षणार्धात "मग मी गायिका झाले असते,' असे उत्तर दिले. गप्पांच्या ओघात त्यांनी स्व. जितेंद्रबुवा अभिषेकी यांच्या गायनप्रवासाच्या स्मृतींना उजाळा दिला. याच ओघात त्यांनी मुक्तछंदात जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या काव्यपंक्ती गाऊन दाखवल्या. मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरी यासारख्या अनेक संस्थांवर त्या आजही तेवढ्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे उत्साह व स्फूर्तिचा झरा. आनंदाचे डोही आनंद तरंग हे त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान. "ढलता सूरज धीरे धीरे' या प्रसिद्ध कव्वालीत "खाली हाथ आया है खाली हाथ जायेगा' असे अर्थपूर्ण कडवे आहे. तोच धागा पकडून त्या सांगतात, माणूस येताना काहीही घेऊन येत नाही व जातानाही सोबत काहीच घेऊन जात नाही. अनंताच्या यात्रेला निघून गेल्यावर सारे येथेच उरते. म्हणून अहंकार बाजूला ठेवायचा आणि छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत हे तत्त्व मी आरंभापासून जपले.
आज त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. आपल्या सहकाऱ्यांना आणि चाहत्यांना आनंदाचे वाटप करत राहायचे हाच त्यांचा स्थायिभाव. त्यांनी आल्या आल्या आपली ओळख करून देताना "आय ऍम सेव्हंटी फाईव्ह इयर्स ओल्ड' असे सांगितले. त्यात किंचित बदल करून असे निश्चितपणे म्हणता येते की, "मिसेस प्रफुल्ला डहाणूकर इज सेव्हंटी फाइव्ह इयर्स यंग'!
या "रंग'तदार सोहळ्यात "गोवादूत'च्या संचालक ज्योती धोंड यांनी सौ. डहाणूकर यांचे स्वागत केले; तर रविवार पुरवणीचे संपादक अशोक नाईक तुयेकर उर्फ पुष्पाग्रज यांनी त्यांची ओळख करून दिली. याप्रसंगी "गोवादूत'चे संचालक सागर अग्नी व कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी
ज्या समाजात आपले वास्तव्य आहे त्याचे आपण काही देणे लागतो ही खूणगाठ सौ. प्रफुल्ल डहाणूकर यांनी मनाशी पक्की बांधली आहे. या जाणिवेतून त्यांनी तळेगाव येथे अनाथ मुलांसाठी खास संस्था चालवली आहे. तेथील निरागस बालकांसाठी त्या नेहमीच पदरमोड करत आल्या आहेत. मात्र याचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही. वृत्तपत्रांत किंवा नियतकालिकात आपली छबी छापून यावी यासाठी त्यांचा अजिबात अट्टहास नाही.
Thursday, 24 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment