Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 March 2009

महाराष्ट्रात युतीवर शिक्कामोर्तब

भाजप-२६, शिवसेना २२ जागा लढविणार

मुंबई, दि. १३ - जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव आणि किरकोळ मतभेद दूर सारून आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर गेली २२ वर्ष अभेद्य असलेल्या भाजपा-शिवसेना युतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. दोन्ही पक्षांनी जागावाटप जाहीर केले असून, भाजपा २६ जागा, तर शिवसेना २२ जागा लढणार आहे.
युतीतील नेत्यांमध्ये जागावाटपावर दीर्घकाळ चर्चा सुरू होती. परंतु काल रात्री (गुरुवारी) भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे, शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी, सुरेशदादा जैन यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत २६-२२ जागांचा फॉर्म्युला निश्चित करून युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भाजपाला कल्याण मतदारसंघाच्या बदल्यात भिवंडी मतदारसंघ देण्याची तयारी प्रथम शिवसेनेने दर्शविली होती. मात्र, नंतर भिवंडीवर आग्रह कायम ठेवल्याने चर्चा लांबली होती. मात्र, आज दोन्ही पक्षांनी संयुक्तरीत्या जागावाटपाची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये भिवंडी भाजपाला सोडण्यात आली आहे, तर कल्याण शिवसेना लढविणार आहे.
काल रात्रीच युतीमध्ये जागावाटपावर एकमत झाल्यानंतर युतीची आज अधिकृतरीत्या घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे आणि शिवसेना सरचिटणीस आमदार सुभाष देसाई यांनी संयुक्तरीत्या जागावाटपाची यादी जाहीर केली. त्यामध्ये जळगावची जागा भाजपाला देण्यात आली असून, दक्षिण मध्य मुंबई-शिवसेना लढविणार आहे. लोकसभेसाठी २६-२२ हा युतीचा जुनाच फॉर्म्युला यावेळीही निश्चित झाला आहे.
प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून
जागावाटप जाहीर करतानाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुंबईहून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच निवडणुकीचा पुढील प्रचारही संयुक्तपणे करण्यात येणार आहे.
भाजपाची यादी चार दिवसात -विनोद तावडे
दरम्यान, भाजपाच्या वाट्याला आलेल्या २६ मतदारसंघांतील उमेदवारांची यादी येत्या चार दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले. उमेदवार ठरविण्याची आमची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, उमेदवार निवड समिती यावर शेवटचा हात फिरवत आहे, असे स्पष्ट करून राज्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर युतीने भर दिला असल्याचे तावडे म्हणाले.

No comments: