पणजी, दि. ५ (प्रा. रमेश सप्रे): एखादी साहित्यकृती वैश्विक असते, पण तिला भाषेची मर्यादा पडते, रामायण, महाभारत, एलिएड, ओडेसी या सारखी महाकाव्ये ग्रंथरुपात अन्य भाषा समजणाऱ्यांना "अनाकलनीय' असतात. प्रख्यात रशियन साहित्यिक लीओ टॉलस्टॉयच्या "वॉर अँड पीस'ची तऱ्हा अशीच असते. तथापि, दृकश्राव्य किंवा चित्रनाट्य रुपात ती सर्वांना पूर्ण समजली नाहीत तरी मनाचा कोपरा ती नकळत व्यापतेच.
"संभवामि युगे युगे..' सारख्या महानाट्याचे हेच सामर्थ्य असते. मराठीतील प्रयोगाच्या यशस्वितेनंतरच अन्य भारतीय वा परकीय भाषांतून हे महानाट्य सादर करण्याची प्रेरणा योगेश्वर कृष्ण निर्मात्यांना देईलही. भाषेच्या मर्यादा ओलांडून विविध भावभावनांना आवाहन करत सध्याचा प्रयोगही सर्वांच्या ह्रदयाच्या तारा छेडत राहील. आदर्श युवक युवतीचे हेच खरे लक्षण आहे. धर्म, वंश. जाती, भाषा, देश ही कुंपणे ओलांडून "विश्वात्मक देवाची' आराधना करत राहायचे. हे सारे भेदायचे, वेधायचे कसे तर श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखे. खरेतर ही काळाची गरज आहे. विज्ञान- विज्ञानाचे जर एक "सीमाशून्य जग (बॉर्डरलेस वर्ल्ड) तयार केले असेल, नव्हे केले आहेच, तर तत्त्वज्ञान आत्मज्ञानाने चे एकत्र (इंटिग्रेटेड) गुंफले, विणले गेले पाहिजे.
हाच खरा श्रीकृष्णाच्या जीवनाचा अन् म्हणूनच संभवामि युगे युगे...' या महानाट्याचाही संदेश आहे. विशेषतः युवा वर्गाला कृष्णजन्माची अद्भुतता, त्यांतील बाललीलांची ह्रदयता, रासलीलेची दिव्यता सारे सुंदरच आहे. पण त्याने आयुष्यभर केलेला आसुरी शक्तीचा नाश आणि सत्य शिवाची केलेली संस्थापना आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रेरक आहे. या महानाट्यातील "पूतनावधाचे' प्रतिकात्मक दृश्य सध्याच्या मायावी पण मोहक "मार्केट सृष्टी'चा वेध घ्यायला युवाशक्तीचा प्रेरित करील. राजकीय क्षेत्रातील नेत्यांना मिळालेले "सर्वेसर्वा' महत्त्व कमी करून चरित्र व नेतृत्व यांची सांगड घालून नव्या उमद्या नेत्यांच्या मांदियाळीचा उदय "कंसवधा'च्या प्रसंगातून स्फूर्ती घेऊन होऊ शकेल. आज युवाशक्तीला परस्परांतील स्पर्धा, हेवेदावे, मत्सर यांनी ग्रासले आहे. अगदी शैक्षणिक संस्थांतील निवडणुका, उपक्रम, प्रकल्प यातही हे दिसून येते. त्या आत्मघातकी वृत्तींचा संहार करण्यासाठी मार्गदर्शन "शिशुपालवधा'च्या घटनाक्रमातून होईल. गोकुळातील बाळ-गोपाळ-किशोर कृष्णाने केलेल्या असुरवधांना काही अतिमानवी सामर्थ्याचे वलय असेल; पण मथुरा-द्वारका-कुरुक्षेत्रातील कृष्णाने ज्या आसुरी प्रवृत्तीता विनाश केले व तो ज्या निरनिराळ्या पध्दतीने-तंत्राने केला, याचे या महानाट्यातील दर्शन युवावर्गाला कार्यप्रेरणा देईल, असा विश्वास वाटतो.
कालियावर त्याची शेपटी एका हातात धरून दुसऱ्या हाताने बासरी वाजवणारा किशोर कृष्ण कालियाच्या फणांवर नर्तन करणारा कृष्ण केवळ गोकुळवासीयासाठी संकट विमोचक नव्हता तर यमुनेच्या काठावर जमलेल्या युवागोपाळांना संदेश देत होता. "कालजयी व्हा!' कालिया हे काळाचे प्रतीक, प्रत्येक युगात, प्रत्येक काळात विषारी शक्ती असतात, पण त्यावर मात करणाऱ्या अमृतशक्तीही असतातच. त्यासाठी सामर्थ्याबरोबरच संघटित शक्तीचीही गरज असते. गोवर्धन पर्वत उचलणे, त्याला आपली करंगळी लावणे, पण प्रत्येक गोपाळाला आपली काठीही लावायला संंागून त्यांना शक्तीचा आत्मप्रत्यय् घडवणं हे कार्य केवळ कृष्णच करू जाणे. याचा अनुभव अशा कृष्णलीलांतून व चरित्रप्रसंगातून युवावर्गाला मिळेल. युवाशक्ती म्हणजे नृत्यातील "दांडिया' नव्हे तर गोवर्धन उद्धारातील "काठ्या' ही आहेत. "संभवामि युगे युगे..' सारख्या महानाट्याचं आवाहन (अपील) समाजातील सर्व गटांसाठी असते. जीवनाभिमुखता हा अशा महाकृतींच्या विशेष असतो. असा महाप्रयोगांच्या सर्व अंगांना, सर्व तंत्रांना एक सर्वस्पर्शी पैलू असतो. म्हणून केवळ पाहणे, "वाहव्वा' करणे आणि विसरून जाणे यासाठी असे प्रयोग सादर केले जात नाहीत. त्याच्याशी संबंधित सर्व बाबी झपाटलेल्या असतात. सर्वांच्या अंतर्यामी "समष्टी' म्हणजे "समाजा'चा, त्याच्या कल्याणाचा विचार असतो. केवळ मनोरंजन हा हेतू नसतो. हा या मंडळीचा उद्देश प्रत्यक्षात आणण्याचे उत्तरदायित्व अर्थातच युवा वर्गावर असते. प्रत्येक युवक- युवतीने हे महानाट्य पाहावे,. अनुभवावे व थोडे का होईना स्वतःच्या जीवनात उतरवावे; तरच या अभूतपूर्व प्रयोगाचे सार्थक होईल. सध्याची युवापिढी "चंद्रमुखी' होण्याचा प्रयत्न करतेय. म्हणजे काव्यातील चंद्राप्रमाणे सुंदर दिसण्याचा प्रयत्न अधिक करतेय. या युवावर्गाने "सूर्यमुखी' बनण्याचा, प्रखर ज्ञानप्राप्तीचा, प्रज्ञाविकसनाचा ध्यास घेण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. आवश्यक असेल तेव्हा आसुरीवृत्तीचा (केवळ व्यक्तींचा नव्हे!) संहार करण्यासाठी "ज्वालामुखी'चा उद्रेक करायलाही शिकले पाहिजे. "संभवामि युगे युगे..' या महानाट्याचा महानायक श्रीकृष्ण सुंदर तर होताच, चंद्रमुखी तसाच " अहम वैश्वनरो भूत्वा' म्हणणारी सूर्यमुखीही होता, तर गीताप्रसंगातील विश्वरुपदर्शनात प्रलयकारी ज्वालामुखीही होता. दिव्यसूर्य सहस्त्रस्य' म्हणजे हजारो सूर्यांचे तेज घेऊन तळपणारा हा "विश्वरूप महानायक' युवापिढीचा सर्वार्थाने त्राता ("हिरो') आहे. अन् तोही सर्व युगांसाठी! त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी सर्वांची पावले वळलीच पाहिजेत, या भव्य अन् दिव्य महानाट्याकडे.......
Thursday, 6 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment