Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 8 November 2008

कळसई दाभाळ येथे तणाव

सातेरी पिसानी देवस्थानातील सहा मूर्ती व घुमटीची तोडफोड
- संशयावरून चौघे पोलिसांच्या ताब्यात
- खवळलेल्या ग्रामस्थांकडून रास्ता रोको
- छडा लावण्यासाठी ४८ तासांची मुदत
- स्थानिक आमदारांचा कडाडून निषेध

कुडचडे, दि.७ (प्रतिनिधी)- कळसई दाभाळ येथील सात गावांची ग्रामदेवता असलेल्या सातेरी पिसानी देवस्थानात काल रात्री सुमारे २ वाजता अज्ञातांनी देवस्थानाच्या सभामंडपात असलेल्या देवाच्या सहा मूर्ती व घुमटीची मोडतोड केली. यावेळी आरोपी देवालयाच्या मुख्य गेटचे कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात असताना घटनास्थळी रात्रीच्या वेळी पहारा देणारी पोलिसांची गाडी पोहोचल्याने अज्ञातांनी मोडतोडीसाठी वापरलेले हातोडा व छिन्नी (घण व शेणे) तेथेच टाकून पलायन केले. या घटनेच्या निषेधार्थ सुमारे १००० लोकांनी सावर्डे ते धारबांदोडा रस्ता अडवून वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. आरोपींना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना ४८ तासांची मुदत दिली असून यात ते असफल ठरल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौघांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंबंधी उपअधीक्षक पत्रे यांनी सांगितले की, येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू करून चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
देवळाच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करावेत किंवा ग्रामस्थांनी रोज देवळांमध्ये मुक्काम करून पहारा ठेवण्याची गरज पत्रे यांनी व्यक्त केली.
काल मध्यरात्री अज्ञातांनी देवस्थानाच्या आवारात व सभागृहात असलेल्या जल्मी देवाच्या मूर्ती व देवचाराची मूर्तीसह तुळस, घुमटीची वृंदावनाची तोडफोड करण्यात आली. यानंतर संशयितांनी देवस्थानाच्या मुख्य लोखंडी गेटच्या कुलुपाला पेट्रोलच्या साहाय्याने आग लावून ते तोडले. याच दरम्यान पोलिसांचे गस्तीवाहन घटनास्थळी दाखल झाले असता संशयितांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात अपयश आले. मुख्य म्हणजे यावेळी पोलिसांकडे पुरेशी यंत्र सामग्री नसल्याने अज्ञातांना पलायन करता आले.
पोलिसांनी भटजींना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर हे वृत्त सर्वत्र फैलावले व पहाटे ४ वाजेपर्यंत ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांसह शोधमोहीम सुरू केली मात्र त्यांचा पत्ता लागली नाही. सदर देवस्थान किर्लपाल, वाघोण, सादगळ, कामरखंड, कळसई, कोडली, दाभाळ, या गावांचे ग्रामस्थान असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
सावर्डे धारबांदोडा रस्ता पूर्ण बंद
मूर्तींच्या मोडतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पहाटे ४.३० वाजल्यापासून सावर्डे दाभाळ धारबांदोडा रस्ता पूर्णपणे बंद केला होता. सावरगाळ ते दाभाळ पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर सुमारे २ मीटरच्या अंतरावर दगडी कुंपण व जेसीबीच्या साहाय्याने भले मोठे वृक्ष रस्त्यावर टाकून संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. टायरना आग लावल्याने दुचाकी वाहनांसह सर्व प्रकारची वाहने अडवून ठेवण्यात आली. यामुळे अनेक प्रवाशांना याचा फटका बसला.
घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, केप्याचे उपजिल्हाधिकारी वेनान्सियो फुर्तादो, उपअधीक्षक रोहिदास पत्रे, कुडचडे पोलिस निरीक्षक नीलेश राणे, सांग्याचे निरीक्षक राजू राऊत देसाई, केप्याचे निरीक्षक संतोष राणे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सांगे मामलेदार पराग नगर्सेकर हेही तेथे उपस्थित होते. यावेळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले; पण त्यांना कोणतेच धागेदोरे सापडू शकले नाहीत.
सामूहिक गाऱ्हाणे
यावेळी सात गावच्या हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावकरी व भटजीसह देवीला सामूहिक गाऱ्हाणे घातले. या घटनेला कारणीभूत असलेल्यांना लवकरच जनतेसमोर उघड कर, असे साकडे देवाला घालण्यात आले.
स्थानिक आमदारांचा निषेध
सावर्डे मतदारसंघात प्रथम अशी घटना घडूनही स्थानिक आमदार अनिल साळगावकर दिवसभर घटनास्थळी न फिरकल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली असून इतर कामांसाठी ते फारसे भेटत नाहीतच पण निदान याप्रसंगी तरी त्यांनी घटनास्थळी लोकांना भेटणे गरजेचे होते, असे मत जनतेतून व्यक्त करण्यात आले. दुपारी उशिरा आमदारांचे सुपुत्र अर्जुन साळगावकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लोकांना सहानुभूती दाखवण्याचे प्रयत्न केले; मात्र आमदार न फिरकल्याने जनतेकडून याचा निषेध करण्यात आला.
या घटनेचा निषेध करताना बजरंग दलाचे सावर्डे प्रमुख भानुदास मामलेकर यांनी हिंदू जनांनी एकत्र येऊन याचा विरोध करावा, असे आवाहन केले. यामागे मोठ्या टोळीचा हात असून राज्यातील सर्व देवालयांमध्ये छुपे कॅमेरे सरकारकडून बसविण्याची गरज आहे. मंत्र्यांसाठी वापरण्यात येणारी "झेड' सुरक्षा कमी करून ती देवालयामध्ये ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
भाजप मंडल समितीचे पंचायत प्रमुख सागर तेंडुलकर यांनी कुचकामी ठरलेल्या सरकारी यंत्रणेला जबाबदार ठरवून आमदारांचा निषेध केला. देवस्थानचे प्रमुख बाबूराव गावकर यांनी हा प्रकार म्हणजे जातीय सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न असून सरकारने देवळांच्या सुरक्षेसाठी खास सुरक्षा रक्षक देण्याची मागणी केली.
कळसईचे पंच दामोदर बांदेकर यांनी ही घटना म्हणजे व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचे सांगून स्थानिक आमदारांचा निषेध केला. आम्ही आमदारांना अजून पाहिलेच नसल्याचे ते म्हणाले. सरपंच रामा गावकर यांनीही या घटनेचा निषेध केला.
यानंतर घेण्यात आलेल्या निषेध सभेत जयेश थळी, बजरंग दलाचे दक्षिण गोवा प्रमुख जयेश नाईक, समीर साळगावकर व इतरांनी आपले विचार मांडले.
केप्याचे उपजिल्हाधिकारी वेनान्सियो फुर्तादो म्हणाले, दाभाळ परिसरात असलेल्या सेझा गोवा खाण कंपनीला या भागातील देवस्थानांना सुरक्षा पुरवण्याचा प्रस्ताव सेझासमोर मांडण्यात आला असता कंपनीने त्याला होकार दिला आहे. यासंबंधी ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांसोबत दक्षिण गोव्यातील सर्व २३८ देवस्थानांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन संबंधित ठिकाणी असलेल्या खाण कंपन्यांशी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. या प्रकणामध्ये आम्हाला काही धागेदोरे सापडले असून लवकरच आरोपीला पकडण्यात यश मिळेल.

No comments: