Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 7 November 2008

पाळी पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर, डॉ. आमोणकर यांचा भाजपचा राजीनामा? कॉंग्रेसला पाठिंब्यासंदर्भात म.गो.चे मौन!

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): पाळी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या उद्या (शुक्रवारी) भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. आज सहाव्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांनी दिली. माजी आरोग्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.सुरेश आमोणकर यांना उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा फॅक्सव्दारे भाजप मुख्यालयात पाठवल्याची चर्चा आहे. त्यांनी पाळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी सादर करण्याचे ठरवल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत असले तरी त्यांची समजूत काढण्यात यश मिळेल,असा विश्वास भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपतर्फे काल युवा नेते डॉ. प्रमोद सावंत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज कॉंग्रेसकडून प्रताप गावस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा आघाडीतील घटक असल्याने त्यांनी यावेळी आपला उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षाचा पाठींबा कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस यांना जाहीर करण्याबाबत त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
गोवा राज्य शिवसेना प्रमुख उपेंद्र गावकर यांनी अद्याप भाजपला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतरच शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल, असे म्हटले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. आमोणकर यांना कॉंग्रेसचे उमेदवार प्रा. गुरूदास गावस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तथापि, त्यापूर्वी डॉ. आमोणकर यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डॉ. प्रमोद सावंत या नव्या दमाच्या युवकाला उमेदवारी बहाल करून भाजपने येथील कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. डॉ.आमोणकर यांनी सार्दिन सरकारात व त्यानंतर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्रीपद सांभाळले होते. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ.आमोणकर यांच्याकडून बंडाची भूमिका घेतली जाणार नाही,असा विश्वास पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. आज माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांची भेट घेतली व समजूत काढण्याचे प्रयत्न केले, अशी माहिती मिळाली आहे.

No comments: