पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश व प्रजल यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची जबाबदारी पहिल्याच रात्री अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांपैकी एकाने स्वीकारली असून उद्या गुरुवारपर्यंत या संपूर्ण नाट्याचा पर्दाफाश होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी आज दुपारी दोघा तरुणांना अटक करण्यात आली, तर अजून अन्य तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. हल्ल्याचा कट ताळगाव येथील एका बंगल्यात शिजल्याचेही त्या संशयिताने पोलिसांना सांगितले. ही सुपारी कोणी दिली होती, त्याचे नाव उघड करण्याच्या तयारीत पोलिस असून उद्या पर्यंत मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात येण्याची दाट शक्यता आहे.
१३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान ऍड. आयरिश व प्रजल यांच्यावर बुरखाधारी हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर १४ च्या पहाटे पणजी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती. त्यान्वये अँथनी बार्रेटो (सांव पावलू - ताळगाव), नॉर्मन जॉन ऊर्फ बॉचो (व्हडलेभाट- ताळगाव ) व संदीप तुकाराम वायंगणकर (टोंक - करंजाळे) या संशयितांना अटक केली होती. त्यापैकी एकाने या कटाची माहिती आज पोलिसांसमोर उघड केली.
ऍड. आयरिश यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे नाव आज मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्या संशयिताने हे काम आपल्याच मार्गदर्शनाखाली झाल्याची कबुली दिली असून त्या अन्य हल्लेखोरांनाही आपणच पैसे दिल्याचे त्याने उघड केल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसापूर्वी या तिघांना सामान्य वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले असता, त्यांना "गोमेकॉ'त दाखल करून घेण्यात आले होते. त्यांना तेथे कोण-कोण भेटायला आले होते, या दृष्टीनेही सध्या पोलिस तपास करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment