साहित्य संमेलनात ठराव संमत
फोंडा, दि. १९ (प्रतिनिधी)- गोव्यातील फोंडा, मडगाव, पणजी सारख्या भागात तरुणाईकडून घडणाऱ्या बलात्कार, अपहरण सारखी दुष्कृत्ये, भ्याड हल्ले करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या शक्तींचा निषेध करणारा ठराव ६ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात एकमताने संमत करण्यात आला आहे.
या समारोप कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष प्रा. लीना सोहनी, सौ. आशा काळे नाईक, माधवीताई देसाई, सौ. लक्ष्मी जोग उपस्थित होत्या. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. लीना सोहनी यांनी दिवसभरातील कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला.
या संमेलनातील ठराव श्रीमती माधवीताई देसाई यांनी मांडले. फोंडा, पणजी, मडगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. ह्या वाईट कृत्यांमध्ये तरुणाईचा जास्त सहभाग आहे. तरुणाईकडून केल्या जाणाऱ्या या विचित्र प्रकारांचा धिक्कार केला पाहिजे. महिलांनी या घटनांमुळे सावध होऊन संस्कृती रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे श्रीमती देसाई म्हणाल्या.
अशा ह्या वाईट कृत्यांना बळी पडलेल्या फोंडा भागातील एका युवतीने यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. त्याच्या विरोधात आवाज न उठवता संबंधित मूक गिळून गप्प बसले. ह्या घटनांचा महिलांनी धिक्कार केला पाहिजे, असे सांगून श्रीमती देसाई म्हणाल्या की, पणजी येथे लोकशाहीचा गळा घोटण्याचा एका राज्यकर्त्याने केलेल्या प्रकाराचा निषेध केला पाहिजे. पणजी येथे अँड.आयरिश रॉड्रिगीस आणि प्रा. प्रजल साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आम्हांला लोकशाहीचा आदर करणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज आहे, असेही श्रीमती देसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन संगीत अभ्यंकर यांनी केले. पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.
Monday, 20 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment