Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 25 October 2008

आणखी दोघांना बेळगावात अटक, मुख्य सूत्रधाराची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार

ऍड. आयरिश हल्लाप्रकरण
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश रॉड्रिगीस आणि प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार संदीप वायंगणकर याची ब्रेन मॅपिंग व लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी आज प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असता, त्यांना ती देण्यात आली आहे. या हल्ल्यासाठी कोणी सुपारी दिली होती हे त्यानंतर उघड होईल, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ला प्रकरणात काल रात्री बेळगाव येथून आसिफ बडिगर (२४) व अस्लम बडिगर (२२) या दोघांना पणजी पोलिसांनी काल रात्री एका ठिकाणी लपून बसलेले असताना अटक केली. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे.
आसिफ व अस्लम या दोघांना व जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो याला न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे; तर अन्य संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पाचपैकी आसिफ व अस्लम यांचा प्रत्यक्ष हल्लयात सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर शब्बीर गुजराती व जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो (१८) यांचाही या हल्लयात सहभाग आहे. तसेच संदीप वायगणकर याने हल्लेखोरांची त्या रात्री अशोक बार अँड रेस्टॉरंटच्या ठिकाणी भेट घेतली होती, अशी माहिती पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली.
आतापर्यंतच्या पोलिस चौकशीत संदीप वायगणकर याने हा कट रचला होता, असे उघड झाले असून त्याला हे कृत्य करण्यासाठी कोणी पाठवले होते, याची चौकशी सुरू आहे.
संदीप याला बोलते करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील असून त्याच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी त्याला कोणत्याही क्षणी पोलिस मुंबईला घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या हल्ला प्रकरणात सामील असलेले चौघे हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करतानाच अजून एकाला अटक होईल, असे जॉर्ज यांनी सांगितले.
या प्रकरणी १४ ऑक्टोबर पासून या प्रकरणात पोलिसांनी अकरा जणांना अटक केली असून त्यातील पाच जणांचा प्रत्यक्ष हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. १३ ऑक्टोबर रोजी जेनिटो हा जीए ०१ एस ६१०५ या क्रमांकाच्या निळ्या मारुती कारमधून पाच हल्लेखोरांना घेऊन अशोक बारच्या ठिकाणी आला होता. त्यानंतर त्याठिकाणी त्यांना संदीप वायगणकर भेटायला आला. त्यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले, हे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर संदीप हा शब्बीर गुजरातीला घेऊन अशोक बारच्या एका खिडकीकडे गेला. तेथूनच त्याने तेथे बसलेल्या चौघांपैकी ऍड. आयरिश कोण, याची माहिती करून दिली. त्यानंतर जेनिटो, अस्लम, आसिफ, शब्बीर व आणखी एक तरुण, असे पाच हल्लेखोर त्या हॉटेलात रात्री १०.३० सुमारास शिरले. सर्वांनी बुरखे घातले होते. त्यातील एकाने ऍड. आयरिश यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. हल्ल्यानंतर सर्वजण पळत या निळ्या मारुती कारमधून पळून गेले. ही कार जेनिटो चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हल्लेखोरांनी वापरलेली हत्यारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संदीप याच्या वाहनातून एक कुकरी (नेपाळी चाकू) पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा चाकू या हल्ल्यात वापरण्यात आला होता का, हे सिद्ध करण्यासाठी सदर चाकूची वैद्यकीय चाचणीसाठी पाठवला जाणार असल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.
यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात अँथनी बार्रेटो (सांव पावलू - ताळगाव), नॉर्मन जॉन ऊर्फ बॉचो (व्हडलेभाट- ताळगाव ) व संदीप तुकाराम वायंगणकर (टोंक - करंजाळे) याना अटक केली होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वरला अटक केली होती.
जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो (१८), संदेश चक्रवर्ती शिंदे (१८), मायकेल जॉन्सन चकल (२३), संदीप कृष्णा पुजारी (१८) एनिसन व्हिक्टर नुनीस (२३) त्यानंतर चिंबल येथून शब्बीर गुजराती यांना अटक करण्यात आली होती. काल अजून दोघांना अटक झाली.
ऍड. आयरिश व प्रजल यांच्यावर हल्ला करणाऱ्या या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्यासह पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस, उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त, ब्राज मिनेझीस, विश्वेश कर्पे व पणजी पोलिस स्थानकाचे "एलआयबी' पथकाने परिश्रम घेतल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.

No comments: