Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 October 2008

आज गोवा "बंद'

मूर्ती तोडफोडीच्या निषेधार्थ मंदिर सुरक्षा समितीची हाक

राज्यात १४४ कलम जारी


..सर्वत्र चांगल्या प्रतिसादाची चिन्हे
..विहिंप, भाजप, शिवसेना,बजरंग दलाचा पाठिंबा
..मडगावचे मार्केट बंद राहणार
..विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - राज्यात सरकारतर्फे हिंदूच्या भावनांची होणारी पायमल्ली व मंदिरावर होणारे वाढते हल्ले आणि मूर्तींची तोडफोड याविरुद्ध मंदिर सुरक्षा समितीने सोमवारी "बंद' यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, तर राज्य सरकारने बंद उधळून लावण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आज दक्षिण गोव्याप्रमाणे उत्तर गोव्यातही जमावबंदी (१४४ कलम) लागू करण्यात आली आहे. उद्या "बंद'च्यावेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समितीने पुकारलेल्या "गोवा बंद'ला भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, शिवसेना, तसेच विविध संप्रदाय, व्यापारी संघटना व अन्य राष्ट्रवादी संघटनांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे सरकारची धांदल उडाली आहे.
"बंद'वर नियंत्रण ठेवण्यासाठी आज दुपारी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक व वाहतूक विभाग पोलिस अधीक्षक यांनी स्वतंत्र बैठका घेऊन बंदोबस्ताची आखणी केली आहे. परंतु, संघटनांची तयारी पाहिल्यास उद्याचा बंद पूर्ण यशस्वी होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
"बंद'चा धसका घेऊन गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी आज पोलिस स्थानकावर संपर्क साधून माहिती करून घेतली. तर अनेकांनी आपल्या टॅक्सी चालकांशी संपर्क साधून उद्याचे पर्यटन रद्द केल्याची माहिती टॅक्सी चालकांनी दिली. काही पर्यटकांनी बंदचे कारण जाणून घेऊन उद्यासाठी हॉटेलमध्येच थांबून वेगळ्या पद्धतीने या बंदला पाठिंबा देण्याचे बोलून दाखवले.
दक्षिण गोव्यात अधिक प्रतिसाद
मडगाव, (प्रतिनिधी)- अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेल्या गोवा बंदला उद्या सोमवारी संपूर्ण दक्षिण गोव्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याची चिन्हे आज बंदच्या पूर्व संध्येला स्पष्ट झाली. जिल्हा प्रशासनाने उद्या दिवसभरासाठी १४४ कलमाखाली जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे एक प्रकारे बंद यशस्वी होण्यास मदतच होईल असा अंदाज सवार्ंनीच व्यक्त केलेला असताना जिल्हा प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते एकंदर चिन्हे बंद स्वयंस्फूर्तीने होण्याची आहेत व तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा विशेष प्रश्र्न उद्भवणार नाही.
जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज सायंकाळी आपल्या चेंबरमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीत उद्याच्या बंदच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीस पोलिस अधीक्षक ऍलन डिसा उपअधीक्षक उमेश गावकर , उपजिल्हाधिकारी उपस्थित होते . मडगावासाठी सरकारने ३०० जादा राखीव पोलिस पाठविल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
दक्षिण गोव्यातील प्रमुख अशी मडगावची बाजारपेठ तसेच गांधी मार्केट बंद रहाणार असल्याची घोषणा व्यापारी संघटनांनी केल्यामुळे शहरातील सारे व्यापारी व्यवहार थंडावणार आहेत तसेच सरकारने जरी संपूर्ण संरक्षण देण्याची घोषणा केलेली असली तरी त्यावर विसंबून न राहता प्रवासी बसेस सोडावयाच्या की काय ते परिस्थिती पाहून ठरविण्याचा पर्याय बसमालक संघटनेने घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक यांनी सांगितले. सरकारी मालकीच्या कदंब महामंडळाने वाहतूक चालू ठेवण्याची घोषणा केलेली असली तरी आजवरचा अनुभव पाहता ती प्रत्यक्षात येणे कठीण आहे.
उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय योजल्याचे तसेच संवेदनक्षम अशा ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याची माहिती दिली. गोवा पोलिसांबरोबर आय आरपी दल तैनात केलेले आहे. तालुकावार दंडाधिकारी तैनात केलेले असून ते सर्व भागात नजर ठेवून वरचेवर परिस्थितीचा आढावा घेतील.

No comments: