Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 19 October 2008

पारोडा येथे दोन मंदिरांत मूर्तिभंजन

अपराध्यांना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत; अन्यथा रास्तारोको
कुंकळ्ळी, दि. १८ (प्रतिनिधी): येथील आजोबा देवाच्या घुमटीची मोडतोड होऊन एक आठवडा पूर्ण होण्याआधीच आज केपे तालुक्यातील पारोडा गावातील दोन मंदिरांमध्ये शिवलिंगांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणातील संशयिताला पकडण्यासाठी संतप्त जमावाने पोलिसांना २४ तासांची मुदत दिली असून पोलिस अपयशी ठरल्यास रास्तारोको करण्याचे लोकांनी ठरवले आहे. दरम्यान, अशा स्वरूपाच्या सततच्या प्रकरणांमुळे गोव्यातील कॉंग्रेसच्या राजवटीत हिंदू देवालये असुरक्षित बनल्याची भावना हिंदू समाजात बळावत चालली आहे.
गुडी पारोडा गावातील मुळे येथील श्री महादेव मंदिरांत काल मध्यरात्रीच्या सुमारास छपराची कौले काढून प्रवेश केला व आतील लिंगांची मोडतोड केली, लिंगामागील पितळी, प्रभावळही वाकवली गेली आहे. लिंगासमोरीलच्या नंदीच्या मुखावर घणाचे घाव घालून तो छिन्नविछीन्न करण्यात आला आहे. नंदी मुळापासून उखडण्यात आला आहे. तसेच उत्सवावेळी वाजवले जाणारे जाणार शिंग मोडून आवाराच्या भिंतीबाहेर फेकून देण्यात आले आहे. प्रभावळीवरील संगमरवरी गणेशमुर्तीची विटंबना करण्यात आली आहे. देवालयाच्या आवारातील तुळशीवृदांवनही यातून सुटले नाही. त्याचीही मोडतोड करण्यात आली आहे. देवळासमोरील दिवजांचीही मोडतोड झाली आहे. सकाळी साडेसहा वाजता मंदिराचे पैरेकर चंद्रकांत पर्वतकर नित्याप्रमाणे देवळात आले असता सदर घटना सर्वप्रथम त्याच्या नजरेस आली. त्यांनी ताबडतोब याची माहीती देवस्थान समितीचे सदस्य जिवा नारायण देसाई यांना दिली. दरम्यानच्या काळात तेथे मोठा जमाव एकत्र आला. या घटनेची माहिती मिळताच केप्याचे पोलिस निरिक्षक संतोष देसाई तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी चौकशी सुरू केली. मंत्री ज्योकिम आलेमाव हेही घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जमावाला समजावण्याचा व शांत रहाण्याची विनंती केली असता हिंदूंची १८ देवळे मोडली तेव्हा तुम्ही काय केले, असा सवाल लोकांनी केला. त्यावर अपराधी लवकरच पकडला जाईल नपेक्षा आपण तुमच्याबरोबर राहू असे त्यांनी सांगताच कुंकळ्ळीच्या घटनेच्या वेळी तुम्ही लोकांबरोबर का नव्हता, असा प्रश्न केला असता ज्योकिम गडबडले.
यावेळी हजर असलेले दक्षिण गोवा उपजिल्हाधीकारी गोकुळदास पी. नाईक म्हणाले, याकामी आता ठोस पाऊल गरजेचे बनले आहे या जनतेच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. कुंकळ्ळीत घडलेले मूर्तिभंजनाचे प्रकरण आम्ही तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. लवकरच अपराधी पकडला जाईल. सरकारने २४ तास सर्व २८६ प्रार्थनास्थळांभोवती रात्रीच्या वेळी सुरक्षा अधिक कडक केली जाईल. तसेच यापुढे एकाही मंदिरातील मूर्ती फोडली जाणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.
यावेळी महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत देसाई म्हणाले, आम्ही सतत संयम बाळगत आलो आहोत. या प्रकरणात तरी सरकार व संबंधित यंत्रणेकडून त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. हे सगळे योजनाबद्ध कारस्थान असल्याचे दिसून येते. सरकारने हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कारण जर हिंदू रस्त्यावर उतरले तर त्यांना आवरणे सरकारच्या हाताबाहेर जाईल.
यावेळी पोलिस अधीक्षक ऍलन डीसा, उपअधीक्षक उमेश गावकर, केपे पोलिस निरीक्षक संतोष देसाई, उपजिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई फौजफाट्यासह हजर होते. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान श्वानपथक आणण्यात आले. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. वाहनांतून अपराधी पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी खास यंत्रणेमार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
मुदेश्वर मंदिरातील लिंगाचीही मोडतोड
दरम्यान, पारोडा देसाईवाडा येथील मुदेश्वर मंदिरांतील लिंगाचीही अज्ञातांनी तोडफोड करून लिंग दरवाजापाशी आणून टाकले.आतील पितळी समया व बाजूच्या काही घुमट्यांचीही नासधूस करण्यात आली.
यावेळी बजरंग दलाचे जयेश नाईक व शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तेथे आले असता नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. नंतर मंत्र्यांनी आपणांस अटक करण्याची धमकी दिल्याचे जयेश नाईक यांनी सांगितले.
यावेळी सावधगिरी म्हणून बोलावण्यात आलेली पोलिस कुमक पाहून लोक बिथरले. पोलिसांना मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यास लोकांनी मज्जाव केला. त्यामुळे पोलिसांना रस्त्यावरच उभे राहावे लागले.
गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांना यावेळी पत्रकारांनी यापूर्वीच्या मोडतोड प्रकरणांतील तपासाच्या प्रगतीविषयी विचारले असता ते म्हणाले, सरकारने यातील एकही प्रकरण स्वतंत्ररीत्या तपासासाठी आमच्याकडे सोपवलेले नाही. फक्त स्थानिक पोलिस यंत्रणेस साह्यभूत अशी आमची भूमिका आहे.
मात्र त्याच वेळी दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गोव्यात घडलेली सर्व प्रकरणे गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवल्याचे लोकांना सांगत होते.
सदर घटनेनंतर देवळाच्या प्रांगणांतच लोकानी सभेच आयोजन केले. संतोष देसाई, व्यंकटेश प्रभुदेसाई व संजय गावस देसाई यांनी सरकारने व संबंधित यंत्रणांनी २४ तासांत अपराध्याला न पकडल्यास येत्या सोमवारी "गोवा बंद'च्या समर्थनार्थ "चलो पणजी' कार्यक्रम हाती घेऊ, असा इशारा दिला

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys