Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 October 2008

कुंकळ्ळीत तणाव, दसऱ्यादिवशीच आजोबादेव घुमटीची मोडतोड


मोडतोड करण्यात आलेली आजोबादेवाची घुमटी.

- संतप्त नागरिकांचा रास्तारोको
- कुंकळ्ळीत कडकडीत "बंद'
- विटंबना प्रकरण 'सीआयडी'कडे देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कुंकळ्ळी, दि. ९ (प्रतिनिधी): ऐन दसऱ्यादिवशीच कुंकळ्ळी उसकीणीबांध येथील प्राचीन आजोबादेव घुमटीची आज काही अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आल्याने संतप्त कुंकळ्ळीवासीयांनी रास्तारोको केला आणि संपूर्ण बाजार बंद ठेवून निषेध नोंदवला. अखेर खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घटनास्थळी दाखल होऊन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) सोपवण्याचे आश्वासन दिल्यानंतरच रास्तोरोको मागे घेण्यात आला. तसेच यासंदर्भात संबंधितांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार कुंकळ्ळीवासीयांनी केला आहे.
काही अज्ञातांनी या घुमटीतील आसन, समई व बाहेरील फलक तोडून अस्ताव्यस्त फेकून दिला आहे. आज सकाळी नित्याप्रमाणे पूजेसाठी आलेले सेवेकरी प्रेमानंद देसाई यांच्या नजरेस ही घटना पडताच त्यांनी त्वरीत त्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस स्थानकाला दिली. मात्र त्यापूर्वीच ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नारिकांनी आजोबांच्या घुमटीवरील हा हल्ला म्हणजे कुंकळ्ळीकरांच्या अस्मितेवरील आघात असून त्यास चोख उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नागरिकांनी उस्कीणीजवळ झाडे आडवी टाकली. तसेच भाटे चार रस्ता व बाजारात रस्त्यावर दगड, झाडे टाकून रस्ता रोखून धरण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी गोकुळदास नाईक त्वरेने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा आढावा घेतला. सामाजिक शांतता बिघडवण्याचा व समाजात फूट पाडण्याचा काही विघ्नसंतोषी लोकांचा हा कट असू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कुंकळ्ळीचे आमदार तथा नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव व पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर आपल्या फौजफाट्यासह दाखल घटनास्थळी दाखल झाले. अपराध्यांना चोवीस तासात अटक करतो, रस्ता मोकळा करा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र लोकांनी त्यांना दाद दिली न देता मुख्यमंत्र्यांना बोलवा, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास खुद्द मुख्यमंत्र्यानी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. नंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आतापर्यंत हिंदू देवस्थानांवर झालेल्या किती हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले याची माहिती आम्हाला द्या, असा धोशा लोकांनी लावला. त्यावर अशा घटना घडू नयेत म्हणून उत्तर व दक्षिण गोव्यात जादा पोलिस दल तैनात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांना त्यांचा हा खुलासा पटला नाही. त्यामुळे चोवीस तासांत अपराध्यांना पकडा, अन्यथा पुढील परिणामांची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी भूमिका लोकांनी घेतली.
मग मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण त्वरेने सीआयडीकडे सोपवण्याचे आश्वासन दिले. तसेच
उद्या (शुक्रवारी) सकाळीच पोलिसांचे पथक घटनास्थळाला भेट देऊन ताबडतोब चौकशी सुरू करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या विटंबना प्रकरणाच्या निषेधार्थ स्थानिक दुकानदारांनी आज संपूर्ण बाजारबंद ठेवला. त्यामुळे बाजारातील स्थिती तणावपूर्ण, पण नियंत्रणात होती.
दरम्यान, उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता मार्डीकट्टा येथील समाजगृहात पोलिसांचे खास पथक आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

No comments: