नवी दिल्ली, दि. १० : एकीकडे जगभरातील सर्व शेअर बाजारांची घसरण सुरू असताना सोन्याचे भाव मात्र वरवर चढताहेत. आज दिल्लीतील सोने बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १४,२०० रुपये इतका होता आणि दिवाळीपर्यंत हा दर १५ हजारांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
याबाबत माहितगारांनी सांगितले की, दसऱ्यापर्यंत जर सोने १४ हजारांवर जाऊ शकते तर दिवाळीत याचा भाव १५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या देशात धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वसामान्य लोकांचाही थोड्या प्रमाणात का होईना पण, सोने खरेदीकडे कल असतो. या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढून किंमतही वाढण्याची शक्यता आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, जगभरातील शेअर बाजारांची स्थिती पाहता आता गुंतवणूकदार शेअर्सऐवजी सोन्यामध्ये पैसा गुंतविणे पसंत करू लागले आहेत. मंदीच्या या काळात सोन्यातील गुंतवणूक पुरेशी सुरक्षित असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनीही सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळविला आहे.
-----------------------------------------------------
शेअर बाजार जगभरात गडगडले
लंडन, दि. १० : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेतील मंदी अजूनही जगभरातील बाजारांचा पिच्छा पुरवित असून आज या मंदीमुळे युरोपसह संपूर्ण आशियाई बाजार अक्षरश: गडगडले. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक आणि निफ्टीत विक्रमी घसरण होऊन त्यांनी निचतम स्तर गाठला. ही स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने घाईगर्दीत सीआरआरमध्ये कपातीचा निर्णय जाहीर केला. पण, हा उपाय गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यास साफ अपयशी ठरला आणि बाजाराला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. या नुकसानीमुळे बावचळलेले अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सर्व आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी एका दक्षता समितीच्या स्थापनेची घोषणा करून टाकली आहे.
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीने केवळ बुश प्रशासनाचीच नव्हे तर जगभरातील अर्थमंत्र्यांची झोप उडविली आहे. ब्रिटनमधील एफटीएसई हा निर्देशांक आठ टक्क्यांनी कोसळला. गेल्या पाच वर्षात प्रथमच या निर्देशांकाने ४००० हून खालचा स्तर पाहिला. फ्रान्समधील शेअर बाजार ८.४ टक्के, जर्मनीतील बाजार ९.१ टक्के तर टोक्योतील शेअर बाजारात तब्बल २४ टक्क्यांची प्रचंड मोठी घसरण झाली. जपानचा निकेई ९.६ टक्क्यांनी घसरून गेल्या पाच वर्षातील आपल्या सर्वात खालच्या स्तरापर्यंत आला. या सततच्या अनिश्चिततेमुळे मॉस्को आणि जकार्ता येथील शेअर बाजारातील कामकाजच थांबविण्यात आले आहे.
आशियाई बाजारातही हाहाकार
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीचा फटका आशियाई बाजारांनाही बसला. जपानचा निर्देशांक मे २००३ पासून आज प्रथमच मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यापाठोपाठ भारतातील बाजारातही प्रचंड मंदीचा माहौल होता.
भारतीय बाजारांमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच चिंतेचे सावट दिसत होते. जागतिक स्तरावरील मंदीने गुंतवणूकदार प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे त्यांनी अतिशय सावध पवित्रा घेण्याच्या उद्देशाने मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढले. पण, सर्वच गुंतवणूकदारांनी असा पवित्रा घेतल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकात सुमारे ८००.५१ अंकांची मोठी घसरण झाली. गेल्या दोन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे मानले जात आहे.
३० शेअर्सवर आधारित निर्देशांक आज १० टक्क्यांनी कोसळून १०,५२८ वर बंद झाला. ३० पैकी १३ क्षेत्रातील कंपन्या आज तोट्यात होत्या. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज २३३.७० अंकांची घसरण होऊन तो ३२८० वर बंद झाला.
वास्तविक, आज शेअर बाजाराच्या दृष्टीने दोन चांगल्या घटना घडल्या होत्या. एकतर रिझर्व्ह बॅंकेने सीआरआरमध्ये कपात केली आणि दुसरे म्हणजे महागाईचा दरही खाली आला होता. एरवी या घटनांचा शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम व्हायला हवा होता. पण, आज जागतिक मंदीपुढे या घटना निष्प्रभ ठरल्या. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू, असे अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली नाही आणि पर्यायाने शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
आज रियालिटी क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स ११.३० टक्क्यांनी खाली घसरले. त्यापाठोपाठ ग्राहकी वस्तूंचे शेअर्सही सुमारे १०.११ टक्क्यांनी खाली आले होते.
आज इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचा अहवाल जारी केला. पण, याचा फारसा सकारात्मक परिणाम बाजारांवर होऊ शकला नाही. सीआरआर कपातीच्या घोषणेचे बॅंकिंग क्षेत्राने भरभरून स्वागत केले. त्यामुळे बॅंकांचे शेअर्स फार मोठ्या प्रमाणात कोसळले नाही. पण, उर्वरित सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील कंपन्यांना आज जागतिक मंदीने पछाडले.
घाबरू नका, रिझर्व्ह बॅंक तयारीत : अर्थमंत्री
अमेरिकी मंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील बाजारांमध्ये माजलेला हाहाकार पाहता अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुंतवणूकदारांना आश्वस्त केले असून या परिस्थितीत आवश्यक ती पाऊले उचलण्यास रिझर्व्ह बॅंकेनेही तयार दर्शविल्याचे म्हटले आहे.
आज एका मुलाखतीत बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, मंदीची अशी लाट बरेचदा आर्थिक जगताला सतावते. पण, त्याचा प्रभाव फार काळ राहिलच असे नाही. भारतावर याचा दूरगामी परिणाम होणार नाही, याची दक्षता आमचे सरकार घेईलच. सोबतच रिझर्व्ह बॅंकेनेही आपल्या पतधोरणाचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. आवश्यकता वाटल्यास योग्य ती पाऊले उचलली जातील. गुंतवणूकदारांचे हित जपणे, हे सरकारसाठी सर्वोपरी असल्याचेही ते म्हणाले.
ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी तो काही प्रमाणात खर्च तर काही प्रमाणात जमा करावा. बॅंकांमधील सेव्हिंग सर्वाधिक सुरक्षित आहेत. शिवाय आपल्या देशातील बॅंकाची कार्यपद्धती पुरेशी सक्षम आणि पारदर्शक आहे. त्यामुळे पैसा बुडण्याची शक्यता नाही, असा सल्लाही चिदम्बरम यांनी दिला.
सोबतच यापुढे आर्थिक घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी एका दक्षता समितीची आपण स्थापना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दूरगामी उपाययोजना व्हायला हवी; भाजपाची मागणी
देशातील सध्याचे आर्थिक संकट पाहता दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीने व्यक्त केले आहे.
वरिष्ठ भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटातून देशाला सावरण्यासाठी सीआरआरमध्ये कपात करण्यासारख्या अल्पकाळासाठीच्या योजना फारशा प्रभावी ठरणार नाहीत. त्यापेक्षा सरकारने वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन आर्थिक क्षेत्रातील रिझर्व्ह बॅंक आणि सेबीसारख्या सर्वोच्च कार्यकारिणींसोबत चर्चा केली पाहिजे. बाजारात रोख रक्कम नसणे, बॅंकांजवळ रोख नसणे, ही अतिशय काळजीची बाब आहे. शेअर बाजारांचे संकट तर प्रासंगिक आहे पण, ही देशावरील आर्थिक समस्येची नांदी आहे आणि हे सर्व संपुआ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच घडले असल्याचेही सिन्हा म्हणाले.
Saturday, 11 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making
Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment