Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 7 October 2008

मिकींना मंत्रिमंडळातून ताबडतोब डच्चू द्यावा

डॉ. विली डिसोझा यांची मागणी
कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींना दोन आठवड्यांची मुदत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) : पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री व आघाडीतील एका आमदाराविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केल्याने मिकी यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रदेश तथा देशपातळीवर बदनामी झाली आहे. मिकी यांच्या या पक्षविरोधी कारवायांनी आता परिसीमा गाठली असून येत्या दोन आठवड्यांत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास प्रदेश राष्ट्रवादीला कठोर निर्णय घेणे भाग पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षातील दरी रुंदावत चालली आहे. मिकी यांच्या अपात्रता याचिकेमुळे नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. डॉ.विलींनी आज या याचिकेच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे तिन्ही आमदार तथा महत्त्वाचे पदाधिकारी गैरहजर होते.
डॉ. विली यांनी बोलावलेल्या या बैठकीककडे माजी मंत्री श्रीमती फातिमा डिसा, सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, माजी मंत्री प्रकाश फडते,माजी मंत्री संगीता परब यांचा अपवाद वगळता अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठच फिरवली. प्रा. सुरेंद्र सिरसाट, माजी मंत्री कार्मो पेगादो हेदेखील गैरहजर होते. दरम्यान, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा हे बायणा रवींद्र भवन प्रकरणामुळे बैठकीत व्यस्त होते तर थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर अन्य एका कामासाठी गेल्याने ते येऊ शकले नाहीत,असा खुलासा डॉ. विली यांनी केला.
मिकी पाशेको यांच्या या कृत्यामुळे विद्यमान आघाडी सरकारचे लोकांत हसे झाले आहे. एखादा मंत्री अशी कृती करीत असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मौन धारण करणे त्यांना अजिबात शोभत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिकी यांना तात्काळ मंत्रिमंडळातून वगळायला हवे होते,असेही डॉ.विली म्हणाले. गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे तिसरी आघाडी या नात्याने जनता पाहत असताना श्रेष्ठींकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दलही डॉ. विली यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय समन्वय समितीची बैठक गेल्या आठ महिन्यापूर्वी झाली होती. त्यानंतर अनेक विषय प्रलंबित असतानाही ही बैठक बोलावण्याची तसदी कोणीच घेत नसल्याने ते नाराज झाले. मिकींच्या कारवायांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे ते म्हणाले.
श्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार वागेनः मिकी
आपण अपात्रता याचिका दाखल करण्याचा घेतलेला निर्णय हा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या व्यापक हिताचाच आहे, असे मिकी पाशेको यांनी म्हटले आहे. श्रेष्ठींच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करण्यास आपण वचनबद्ध आहोत. मात्र, डॉ.विली यांनी केलेल्या टीकाटिप्पणीबाबत आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नाही,असे ते म्हणाले.

No comments: