Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 6 October 2008

पाळीचा कॉंग्रेस उमेदवार स्थानिक नेतेच ठरविणार

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- पाळी मतदारसंघासाठी उमेदवार ठरविण्याबाबत "हायकमांड' कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नसून ती संपूर्ण जबाबदारी गोवा प्रदेशाध्यक्ष व स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आल्याचे आज कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी बी.के.हरिप्रसाद यांनी सांगितले. पाळीतील उमेदवाराच्या निवडीबाबत आज सकाळी बोलावण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर तसेच अन्य नेते पक्ष कार्यालयात उपस्थित होते. या मतदारसंघाचे आमदार गुरुदास गावस यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. येत्या काही दिवसांत या मतदारसंघात निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू झाली आहे.
"मला स्थानिक आखाड्याची माहिती नसल्याने हा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्री कामत व प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर घेणार आहेत,' असे श्री. हरिप्रसाद म्हणाले. स्थानिक तसेच पक्षाच्या अन्य नेत्यांची मते अजमावून घेण्यासाठीच ही बैठक असून अद्याप कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याने उमेदवाराच्या नावावर आताच बोलणे योग्य नसून यानंतर अनेक बैठका घेतल्या जाणार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु, या मतदारसंघासाठी कॉंग्रेस पक्षाला उमेदवाराची निवड करताना कॉंग्रेस सरकारात असलेल्या आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना काट्याची टक्कर द्यावी लागणार आहे. सध्या मंत्री राणे यांनी आपली पत्नी सौ. दिव्या राणे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर उतरणार की, अपक्ष म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षासमोर गंभीर प्रश्न उभा ठाकल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज झालेल्या या बैठकीत मात्र काही मंडळ अध्यक्षांनी प्रकाश गावस यांची तर काहींनी माजी आमदार सदानंद मळीक यांच्या नावावर जोर दिला असल्याची माहिती मिळाली असून सौ. राणे यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयीच मुख्यमंत्री कामत यांना विचारले असता, ते म्हणाले, उमेदवारीसाठी अनेक नावाची शिफारस झालेली असून योग्यवेळी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार आहे.

No comments: