विरोधक आक्रमक; कठोर कारवाईचे आश्वासन
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) ः राजधानी पणजीत उघडकीस आलेला पे पार्किंग घोटाळा व मांडवी नदीतील कॅसिनोच्या प्रश्नावरून विधानसभेत आज विरोधकांनी नगरविकासमंत्री जोकिम आलेमाव यांची जबर कोंडी केली. पार्किंग घोटाळा प्रकरणात "घरचा भेदी' असल्याशिवाय हा महाघोटाळा होणे अशक्य आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर नगरविकासमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणात कोणाचीही गय न करता दोषींविरूध्द सरकार कठोर कारवाई करेल, असे आश्वासन दिले.
दयानंद सोपटे यांनी पणजीतील बेकायदा पार्किंग शुल्काचा प्रश्न उपस्थित केला होता. पालिका आधिकाऱ्यांना ५ मार्च २००८ रोजी या घोटाळ्याची माहिती होती हे त्यांच्या नोंदीवरून दिसून येते. प्रत्यक्षात त्यांनी कोणतीच कारवाई का केली नाही. केवळ नगरसेवकांनी तब्बल तीन महिन्यानंतर तक्रार केल्यावर याबाबत चौकशी चालू झाली. माहिती असतानाही कारवाई न करणारे पालिका अधिकारी कोणाला पाठीशी घालत होते, असा सवाल करून पालिकेतीलच काही मंडळींचा या भानगडबाजांशी संबंध असावा, असा संशय विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
या घोटाळ्याबाबत पोलिसांकडे प्रथम दर्शनी अहवाल दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. आठ नगरसेवकांनी याबाबत तक्रार दिली होती. पोलिस तपास पूर्ण होताच दोषींवर कारवाई करू, अशी ग्वाही आलेमाव यांनी दिली.
दरम्यान, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी कॅसिनोबाबत विचारलेल्या एका प्रश्नावरही आलेमाव यांची प्रचंड कोंडी झाली. सरकारने आपल्या जेटीच्या हद्दीत काही कॅसिनोंना परवाने दिले आहेत काय, असा त्यांचा प्रश्न होता. त्यावर २००२ साली अडवाणी प्लेजर क्रुझ कंपनीला पणजी महापालिकेने परवाना दिला होता, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. हा परवाना केव्हा दिला त्याची तारीख सांगा, असा आग्रह मांद्रेकरांनी धरला. त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रश्नात ही माहिती विचारलेली नाही असे सांगून मंत्र्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
सभागृहात मूळ प्रश्नावर पुरवणी प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळा प्रश्न विचारण्याची गरज नाही असे मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. पर्रीकर यांनीही यावेळी नगरविकासमंत्र्यांना धारेवर धरत पालिकेतील सुरू असलेल्या गोंधळाची त्यांना माहिती करून दिली.
पालिकेतील विविध टिपणेही बदलली जात असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. बदलीवरील पालिका अधिकारी १० जून २००८ रोजी रूजू झालेला असतानाही त्याने ९ जून २००८ रोजीच्या एका आदेशावर सही केल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तुमच्या खात्यात काय चालले ते पाहा. अधिकारी काहीही करू लागले आहेत. त्यांना जरा आवर घाला असे सांगून पर्रीकरांनी पणजी पालिकेतील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभाराची कागदपत्रे सभागृहासमोर ठेवली. त्यावर, त्वरित कारवाईचे आश्वासन मंत्री आलेमाव यांनी दिले.
हा गंभीर प्रकार ः पर्रीकर
मुळातच पालिकेच्या नावावर पावत्या छापणे हे गंभीर आहे. अलीकडेच एका वाहतूक पोलिसाने बनावट चलन पुस्तिकेची छपाई केली होती. हे प्रकार अशा घोटाळ्यापेक्षाही गंभीर आहेत. उद्या विविध परवाने, दाखलेही छापले जातील, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. "घरचा भेदी' त्यात गुंतल्याखेरीज हे कसे शक्य आहे, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
Wednesday, 27 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment