मडगावात वातावरण तंग; वाहन पेटवले
मडगाव, दि.२४ (प्रतिनिधी): मडगावातील बेदरकार वाहतूक व्यवस्थेत आज आर्लेम फातोर्डा येथे आणखी एका शाळकरी मुलाचा बळी गेला. प्रथमेश प्रकाश नाईक (वय १०) असे या मुलाचे नाव असून तो होली स्पिरीट इन्स्टिट्यूटमध्ये पाचवीत शिकत होता. त्यामुळे खवळलेल्या जमावाने या अपघातास कारणीभूत ठरलेल्या मालवाहू कॅंटरला आग लावली. अग्निशामक दल व पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून ती विझविली. तथापि, वातावरण तणावपूर्ण असल्याने तेथे रात्री उशिरापर्यंत सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी कॅंटर चालकशेख इम्तियाज याला अटक केली आहे.
नेहमीप्रमाणे दुपारी १-१५ वाजता वर्ग सुटल्यावर प्रथमेश "जानकी' या (जीए ०२ टी ४७४३ ) बसने घरी निघाला. सदर मिनीबसमध्ये होली स्पिरीटचीच जास्त मुले असतात. मुलांना उतरवत ती बस आर्लेम नाक्यावरून टाटा शोरूम रस्त्यावर वळली व चंद्रावाडो रस्त्यावर थांबली. तेथे प्रथमेशसह एकूण ६ मुले उतरली. प्रथमेशचे घर उजवीकडे असल्याने तो थांबलेल्या बससमोरून गेला व मागून एखादे वाहन येते की काय ते पाहाण्यासाठी त्याने आपले डोके पुढे काढले तोच मागून भरधाव आलेल्या मालवाहू कॅंटरची (जीए ०१-डब्ल्यू ६२८१) ठोकर त्याच्या डोक्याला बसून तो उसळला आणि सुमारे ६ मीटरपर्यंत फरफटत गेला. मागच्या चाकाखाली सापडल्याने तो जागीच मरण पावला.
या अपघातानंतर लगेच तेथे लोक जमले ते पाहून कॅंटरचा चालक पळून गेला .जमावाने कॅंटरमधील सामानाच्या पेट्या बाहेर काढून त्या कॅंटरखाली ठेवून पेटवल्या. ती आग कॅंटरला लागेपर्यंत कोणीतरी पोलिस व अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्यांनी येऊन आग विझविली, पण संतप्त जमावाला शांत करणे त्यांना शक्य झाले नाही .
दरम्यानच्या काळात तेथे गर्दी वाढू लागली व स्थिती स्फोटक बनत चालल्याचे पाहून पोलिस निरीक्षक धर्मेश आंगले यांनी वरिष्ठांना माहिती दिली. निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई तेथे दाखल झाले. मात्र त्यामुळे फरक पडला नाही. त्यामुळे मामलेदार परेश फळदेसाई, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई तेथे दाखल झाले. तसेच तमाम वाहतूक पोलिसांसह जादा पोलिस कुमक तेथे तैनात करण्यात आली.
या भीषण अपघातामुळे मडगावातील बेशिस्त व बेदरकार वाहतुकीचा प्रश्र्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी याच दिवसात अशाच एका अपघातात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर मिनीबस उलटून आठवीत शिकणारा लॉयोला हायस्कूलचा विद्यार्थी मरण पावला होता. त्याशिवाय लहान मोठे अपघात ही नित्याचीच बाब झालेली आहे. ज्यांनी वाहतुकीत शिस्त आणावी अशी अपेक्षा असते ते वाहतूक पोलिस महामार्गावर किवा रात्रीच्या वेळी नाक्यावर राहून परप्रांतीय मालवाहू वाहनांना सतावण्यात धन्यता मानतात. त्यामुळे शहरातील बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण ठेवायचे कोणी, असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. आजचा अपघात हा याच मालिकेतील एक भाग मानला जातो.
-------------------------------------------------------------------
बेभान वाहन चालकांना कोण रोखणार?
मुले जेव्हा शाळा सुटल्यावर रस्ता ओलांडून घराकडे जात असतात तेव्हा अन्य वाहनचालकांनी याची दखल घेणे गरजेचे असते. मात्र, त्याची फिकीर न करता काही अपवाद वगळता बहुतांश वाहन चालक भरधाव वाहने हाकतात. या वाहन चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांतून केली जात आहे. दरम्यान, दहा वर्षांच्या कोवळ्या प्रथमेशचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातस्थळी उपस्थित असलेले लोक त्यामुळे गलबलले.
Tuesday, 24 June 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment