Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 1 February 2010

सरकार पंचवाडीवासीयांच्या जिवावर उठले आहे काय?

विजर खाजन बंदर विरोधी ग्रामस्थांचा सवाल

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- केवळ खाण उद्योजकांचे चोचले पुरवण्यासाठी शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावच्या नैसर्गिक संपत्तीवर व या भागातील लोकांच्या उदरनिवार्हाच्या साधनांवर "बुलडोझर' फिरवून सरकार या गावातील लोकांना देशोधडीला लावायला पुढे सरसावले आहे काय, असा संतप्त सवाल पंचवाडीवासीयांनी केला आहे. जनहिताच्या नावाखाली सुमारे ५ लाख ५४ हजार चौरसमीटर जागा संपादन करून खाण मालकांना आपल्या खनिजाची वाहतूक करण्याची वाट मोकळी करून देण्याचा हा कुटील डाव निषेधार्ह आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पंचवाडीवासीयांच्या जिवावरच उठले आहे काय,असा सवाल संतप्त पंचवाडीवासीयांनी केला आहे.
एकीकडे राज्य सरकारकडून नियोजित कोडली ते पंचवाडी दरम्यानचा खनिज वाहतुकीसाठीचा रस्ता व विजर खाजन बंदर उभारण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे पंचवाडीवासीय मात्र या आपल्या गावच्या अस्तित्व रक्षणासाठी आक्रमक बनत चालले आहे. नियोजित खनिज वाहतूक व बंदर याव्दारे लोकांना ट्रक खरेदी करून दिले जातील व यामुळे गावातील काही लोकांना रोजगारही मिळेल,असे गाजर पुढे करून गावातील लोकांना या प्रकल्पांच्या बाजूने खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सेझा गोवा खाण कंपनीकडून गावातीलच काही लोकांना हाताशी धरण्यात आले आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांत फूट घालून त्यांची एकजूट कमकुवत करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.या फसव्या प्रचाराला बळी पडले तर भविष्यात पंचवाडी गाव हा खनिज वाहतुकीमुळे हिरव्याचा लाल होईल व येथील ग्रामस्थ आपल्या पुढील पिढीला खाण्यासाठी धूळ घालील,अशी प्रतिक्रियाही आंदोलक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पंचवाडीवासीयांना आता शिरोडा मतदारसंघातील इतर भागातील लोकांचाही पाठिंबा मिळत आहे. पंचवाडीच्या पॅरीश चर्चचे फादर लॉरेन्स रॉड्रीगिस व श्री सातेरी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ.सोनू कामत यांचा पूर्ण पाठिंबा ग्रामस्थांना असून त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या ग्रामस्थांचा हुरूप अधिक वाढला आहे.
पंचवाडी गावच्या रक्षणासाठी गावातील सर्व धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे लढा उभारून या प्रकल्पांना प्राणपणाने विरोध करण्याचा निर्धारच केला आहे. सरकार जर लोकांचा विरोध डावलून आपल्या भूमिकेशी ठाम राहण्याचे ठरवत असेल तर गावातील शांतता बिघडेल व सेझा गोवा खाण कंपनीचे समर्थक व नियोजित प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलक यांच्यात भांडणे होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गावात कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेऊन सरकारला जाब विचारावा व नियोजित प्रकल्प हा कोणत्या पद्धतीने येथील स्थानिक लोकांचे हित जपणारा आहे याचा खुलासा मागवावा, अशीही मागणी या लोकांनी केली आहे. सरकारने वेळीच माघार घेतली नाही तर पुढील परिणामांना पूर्णपणे ते जबाबदार ठरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

No comments: