Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 1 February 2010

वास्कोत जुगारी अड्ड्यांना ऊत

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)- वास्को शहरात सध्या विविध ठिकाणी जुगारी क्लबांना (अड्ड्यांना) ऊत आला आहे व त्यात दिवसाढवळ्या जुगाराचे पट रंगत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. राज्यात विविध ठिकाणी जत्रोत्सवातील व इतर धार्मिक उत्सवांतील जुगाराविरोधात "गोवादूत'ने जनजागृती चळवळ उभारल्यानंतर आता पोलिसांना या अनिष्ट प्रथेविरोधात जोरदार कारवाई करणे भाग पडले आहे.
वास्को शहरात जत्रोत्सव किंवा धार्मिक उत्सवांना जुगार चालत नसला तरी इथे कायमस्वरूपी जुगारी अड्ड्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या जुगारी अड्ड्यांवर पोलिसांची तमा न बाळगता बिनधास्तपणे जुगाराचे डाव खेळले जातात व त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मात्र पोलिसांत अजिबात दिसत नाही. वास्को शहर, मंगोरहील, वाडे, बायणा, नवेवाडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सुमारे आठ मुख्य जुगाराचे अड्डे चालतात. या अड्ड्यांवर चोवीस तास जुगार चालतो, अशी खास माहिती प्राप्त झाली आहे. या जुगारी अड्ड्यांचे हप्ते पोलिसांना नियमित पोहचतात व त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांचाही आश्रय या अड्ड्यांना मिळत असल्याने हे अड्डे सध्या तेजीत सुरू आहेत.
"गोवादूत'ने जुगाराविरोधात सुरू केलेल्या चळवळीची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आहे व सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जुगाराविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
वास्को पोलिसांनी काल दुपारी एका मटका अड्ड्यावर छापा टाकला व सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांकडून आपलीच पाठ थोपटण्याचा प्रकार होत असला तरी उर्वरित ठिकाणी मात्र सर्रासपणे जुगार सुरू असल्याने पोलिस आपलेच हसे करून घेत असल्याची प्रतिक्रिया येथील लोकांनी दिली आहे. खुद्द वास्को शहरात तीन जुगाराचे अड्डे चालतात. पैकी एक क्लब पोलिस स्थानकापासून १०० मीटराच्या अंतरावर आहे तर दुसरा पोलिस स्थानकापासून २०० मीटराच्या अंतरावर आहे,अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. तिसरा अड्डा तर पोलिस हद्दीच्या हाकेच्या अंतरावर असून पोलिस मात्र या अड्ड्यांना सरकारची मान्यता मिळाल्याच्या थाटातच वावरत असतात. नवेवाडे येथील शेवटचा बसथांबा, मंगोरहील येथील सुलभ शौचालयासमोर, तसेच बायणा, वाडे व चिखली या भागातही जुगाराचे छोटेमोठे अड्डे चालतात.
वास्को शहरातील या अड्ड्यांवर रमी, (सिंडीकेट), फ्लॅश (तीन पाने), अंदर बाहर असे विविध प्रकार खेळले जातात व त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते,अशीही माहिती मिळाली आहे. आता राज्यात सर्वत्र जुगाराविरोधात वातावरण निर्मिती सुरू असताना हे अड्डे बंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून वास्को पोलिस या जुगाराचा कसा बंदोबस्त लावतात, याची उत्सुकता येथील नागरिकांना लागून राहिलेली आहे.

No comments: