Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 3 February 2010

पेडणे जत्रोत्सवातील जुगाराची सीडी उपमहानिरीक्षकांना सुपूर्द

- अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना चौकशीचे आदेश
- ...अन्यथा "सीडी' उच्च न्यायालयात पाठवणार

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात कुठलीही भीडमुर्वत न बाळगता सर्रासपणे सुरू असलेल्या सार्वजनिक जुगाराविरोधात येथील युवकांनी आघाडीच उघडली आहे. हरमल व केरी येथील जत्रोत्सवांत जो बिनधास्तपणे जुगाराचा बाजार मांडण्यात आला होता त्याची "सीडी' च आता पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांना सुपूर्द करण्यात आली आहे. श्री. यादव यांनी ही "सीडी' उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याकडे पाठवून त्यांना तात्काळ चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
पेडणे तालुक्यातील जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांत सुरू असलेल्या जुगाराला सर्वत्र तीव्र विरोध सुरू आहे. "मांद्रे सिटिझन फोरम' तर्फे यासंबंधी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून सह्यांची मोहीमही राबवण्यात येत आहे. कायदा आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनीही यासंबंधी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून पेडण्यातील या जुगारावर कडक कारवाई करण्याची शिफारस केली आहे. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी जुगाराविरोधात कडक धोरण अवलंबिण्याचे आदेश जारी केले असतानाही पेडण्याचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी मात्र जुगाराला पूर्णपणे अभय देण्याची भूमिका स्वीकारल्याने ते रोषाला पात्र ठरले आहेत. हा जुगार बंद करण्यासाठी जनतेला साथ देण्याचे सोडून पोलिसांनी थेट जुगारवाल्यांचीच तळी उचलून धरल्याने तालुक्यात सर्वत्र पोलिसांच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.
दरम्यान, या जुगाराबाबत ठोस पुरावे दिल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरू, असे वक्तव्य उपमहानिरीक्षकांनी केल्याने तालुक्यातील काही युवकांनी हे आव्हान स्वीकारले आहे. हरमल गावातील काही युवकांनी येथील जत्रोत्सवाची "सीडी'च तयार केली आहे. ही "सीडी' "गोवादूत' ला मिळाल्यानंतर ती लगेच पोलिस महानिरीक्षकांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्री. यादव यांनी अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना चौकशीचे आदेश जारी केले आहेत. आता या "सीडी' ची चौकशी कितपत प्रामाणिकपणे होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. उत्तम राऊत देसाई हे बॉस्को जॉर्ज यांच्या खास मर्जीतील निरीक्षक म्हणून परिचित आहेत, तसेच ते एकाच बॅचचे सहकारी असल्याने ते हे प्रकरण कितपत गंभीरपणे घेतात, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हयगय केली तर ही "सीडी' थेट उच्च न्यायालयात पाठवण्याची तयारीही या आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी सुरू केली आहे.
बड्या नेत्याची निरीक्षकांना "उत्तम' साथ
पेडण्यातील जुगाराविरोधात कारवाई करू नये, असे आदेश जारी करून तालुक्यातील एका बड्या नेत्याने निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांना "उत्तम' साथ दिली असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. सदर निरीक्षकांनी या नेत्यासमोर पूर्णपणे लोटांगण घातले आहे व या नेत्याच्या इशाऱ्यांवरच पोलिस वागत असतात, अशीही माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे या निरीक्षकांविरोधात कितीही पुरावे पोहोचवले तरी त्यांना या पदावरून हटवणे शक्य नाही, अशी फुशारकीच या नेत्याचे काही कार्यकर्ते मारत असल्याचीही खबर आहे. उपमहानिरीक्षक रवींद्र यादव याप्रकरणी कितपत आपला अधिकार वापरू शकतील हा संशयाचा विषय असल्याने अखेर ही "सीडी' न्यायालयात सादर करून जुगाराविरोधात जनहित याचिका सादर करण्याचीही जय्यत तयारी येथील काही सुशिक्षित युवकांनी चालवली आहे.

No comments: