उत्तम राऊत देसाई पेडणेवासीयांच्या नजरेतून उतरले!
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांनिमित्त सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या जुगाराविरोधात नुकतेच कुठे लोक एकवटत असताना जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांनी थेट जुगारवाल्यांची साथ देत या चळवळीला खो घातला. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा या भागातून कडाडून निषेध केला जात आहे.
कार्यक्षम पोलिस अधिकारी म्हणून परिचित असलेले उत्तम राऊत देसाई यांनी जनतेचा रोष पत्करून जुगारवाल्यांसमोर घातलेले लोटांगण ही अत्यंत दुर्दैवी घटना ठरली असून या भागातील जनतेच्या नजरेतून ते पूर्णपणे उतरले आहेत, अशा प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. हरमल येथे एका रशियन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरारी संशयीतांना पकडण्यात यश मिळवल्याने पेडणे पोलिसांच्या कामाचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे जुगारावरून मात्र पेडणे पोलिसांची पूर्ण नाचक्की झाली आहे.
जुगार बेकायदा आहे; तरीही त्यास सामाजिक अधिष्ठान प्राप्त करून देत विविध ठिकाणी आयोजित जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांत त्याचा बिनधास्तपणे बाजार मांडला जातो. या जुगारातून देवस्थान समितीला हजारो रुपयांची देणगी मिळते, असे कारण पुढे करून या अनिष्ट प्रकाराची पाठराखण केली जाते. पोलिसही या जुगारवाल्यांकडून हप्ते वसूल करतात व देवस्थान समित्यांचे नाव पुढे करून आपले उखळ पांढरे करून घेतात. या जुगारामुळे युवा पिढी व विशेष करून दिवसाला काबाडकष्ट करून संसार चालवणारे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. या जुगाराचे प्रस्थ एवढे वाढले की त्यामुळे धार्मिक उत्सवांची व देवस्थान परिसराची पवित्रताही नष्ट झाली आहे. जुगार खेळला जात असल्याने तिथे मद्यसेवन व इतर व्यसनांचाही आपोआप समावेश होतो. साहजिकच लोक अशा उत्सवांना जाणेही टाळतात,असाही अनुभव आहे.
"गोवादूत' ने या सार्वत्रिक जुगाराविरोधात जनतेत जागृती करण्यासाठी चळवळ सुरू केली व त्याला सर्वत्र जोरदार पाठिंबा प्राप्त झाला. जुगाराविरोधात उघडपणे बोलणे टाळणारे लोकही पुढे सरसावले व हा प्रकार बंद व्हायला हवा असे बेडरपणे मत मांडू लागले. "मांद्रे सिटिझन फोरम' च्या नेतृत्वाखाली येथील नव्या दमाच्या तरुणांनी हा विषय हातात घेतला व त्याबाबत त्यांच्याकडून सामाजिक जागृती सुरू आहे. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांना निवेदन सादर करून त्यांचाही पाठिंबा मिळवण्यात आला. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनीही हा जुगार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांनी संबंधित पोलिस अधीक्षकांना अशा जुगारावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही जारी केले.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी तर जनतेने या जुगाराविरोधात पुढे यावे, पोलिस त्यांना पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही व्यक्त केला. प्रत्यक्षात पेडणे पोलिसांची भूमिका पूर्ण जनविरोधी ठरली. जनचळवळीचा धाक नुकताच कुठे तयार होत असताना पोलिसांनीच या जुगारवाल्यांना अभय दिले. मोरजी व केरी येथील जत्रोत्सवात बेफामपणे जुगाराचा बाजार मांडून जुगारविरोधी चळवळीची हवाच काढून घेण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. पोलिसांनी जनतेला साथ देण्याचे सोडून आता खुद्द गुन्हेगारांनाच साथ देण्याचे ठरवल्याने या प्रकाराची सरकारने त्वरित गंभीर दखल घेण्याची गरज आहे, अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे.
कॅसिनो पचला तिथे जुगाराचे काय !
जनतेची स्मरणशक्ती अल्प असते, असे म्हटले जाते परंतु काही गोष्टी मात्र जनतेच्या कायम स्मपणात राहतात. काही काळापूर्वी पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या कॅसिनो भेटीवरून बरेच वादळ उठले होते. खात्यातील काही अधिकारी कॅसिनोवर पार्टीत दंग असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आले होते. या कृतीचा सर्वत्र निषेध होत असताना या अधिकाऱ्यांना चार खडे बोल सुनवायचे सोडून पोलिस महासंचालकांनी त्यांची पाठराखण केली व त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या कॅसिनो भेटीची तुलना मंदिरात जाण्याशी करून या वादात अधिकच भर घातली.
कॅसिनोवर गेलेल्या अधिकाऱ्यांत पेडणेचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई हेदेखील होते. पेडणे पोलिस स्थानकाचा ताबा सध्या त्यांच्याकडे आहे, त्यामुळे या भागात जुगाराला उघडपणे मिळणाऱ्या आश्रयाला ते जबाबदार ठरतात. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची खास मर्जी असलेल्या उत्तम राऊत देसाई यांच्या या भूमिकेचेही कदाचित वरिष्ठ अधिकारी समर्थन करत असतील, अन्यथा उघडपणे जुगाराला अभय देण्याचे धाडस त्यांनी केले नसते, अशी शक्यता आता लोक व्यक्त करीत आहेत.
Sunday, 31 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment