Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 29 December 2009

जय हो कॉंग्रेस, वाहतूक पोलिसांच्या तोंडाला मात्र फेस!

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)ः कायदा हा केवळ सामान्य जनतेसाठीच असतो. राजकीय नेते व बडे धेंडे यांना मात्र सोयीप्रमाणे त्यात सूट दिली जाते. वाहतूक कायद्याचाच विचार केला तर एनकेन प्रकारे वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यावरून लोकांना चलन देणे सुरूच असते. चलन देणे हे वाहतूक पोलिसांचे आवडते काम पण त्याच वेळी वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी मात्र ते विसरतात. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गोवा प्रदेश कॉंग्रेसतर्फे आज पणजीत भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. या रॅलीव्दारे बाकी कोणता संदेश लोकांपर्यंत पोहचला हे जरी स्पष्ट झाले नसले तरी या राज्यात वाहतूक कायदा हा केवळ "आम आदमी' ला लागू आहे हे मात्र प्रकर्षाने स्पष्ट झाले.
आज जुनेगोवे येथील गांधी चौकाकडून या रॅलीला प्रारंभ झाला. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्यासह खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत, आमदार पांडुरंग मडकईकर, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, जलस्त्रोत्रमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस, प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी व शेकडो युवा कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व लोक दुचाकीतून प्रवास करीत होते. रॅलीत सहभागी झालेल्या नेत्यांत व कार्यकर्त्यांत उत्साह एवढा भरून आला होता की रॅलीव्दारे आपण वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन करीत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. ही रॅली राष्ट्रीय महामार्गावरून नेण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट परिधान करणे कायद्याने बंधनकारक आहे पण या रॅलीत सहभागी बहुतांश दुचाकी चालकांनी त्याला पाने पुसली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही दुचाकीवरून या रॅलीत भाग घेतला व सर्वांचे लक्ष वेधले. माजी वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी त्यांचे सारथ्य केले. माजी वाहतूकमंत्री राहिलेल्या आमदार मडकईकर यांनाही वाहतूक नियमाचे पालन करावे, असे वाटले नाही. पूर्ण हेल्मेट घातले तर आपला चेहरा लपून राहील, या कारणात्सव त्यांनी केवळ सोपस्कार म्हणून हेल्मेट डोक्यावर नाममात्र ठेवले होते.आणखीनही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सारथ्य करीत असलेल्या आमदार मडकईकर चालवीत असलेल्या दुचाकीला समोर "नंबरप्लेट' च नव्हती.
जुनेगोवेतून सुटलेली ही रॅली राष्ट्रीय महामार्गाला वळसा घालून थेट शहरात पोहचली व पणजी मिरामारहून थेट कॉंग्रेस भवनासमोर दाखल झाली.वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केली होती खरी पण नवीन वर्षांच्या निमित्ताने पणजीत पर्यटकांची झुंबड पडल्याने व वाहनांच्या वर्दळीतही कमालीची वाढ झाल्याने या रॅलीमुळे वाहन चालकांना त्रास जाणवलाच. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपले वाहने फुटपाथवर पार्किंग करून ठेवल्याने पादचाऱ्यांचीही बरीच गैरसोय झाली. १२५ वर्षे पूर्ण होत असलेल्या कॉंग्रेस पक्षाने देशावर व गोव्यावरही सर्वांधिक काळ सत्ता भोगली व सध्या त्यांचीच सत्ता आहे. या मुहूर्ताची संधी साधून या पक्षाचा विचार युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी वैचारिक संवादाचे कार्यक्रम करण्याचे सोडून अशा प्रकारची रॅली आयोजित करण्याची ही पद्धत मात्र अनेक ज्येष्ठ नेत्यांना मात्र काही रुचलेली नाही.

No comments: