Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 6 November 2009

देशात 'आरोग्य स्वराज्य' अवतरावे : डॉ. बंग

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गोव्यात मद्यसेवनावर लोक किती खर्च करतात याचा शोध लावण्याची गरज असून तंबाखू प्रमाणे मद्याच्या व्यसनामुळेही अनेकांना विविध व्याधींची लागण होते. दारू, तंबाखू, प्रदूषण आदी गोष्टींमुळे नागरिकांच्या जगण्यावर परिणाम होत आहेत व या गोष्टींचा सामना करण्यासाठी सामाजिक कृतीची गरज आहे. देशात "आरोग्य स्वराज्य' अवतरावे, अशी इच्छा "मॅगसेसे' पुरस्कार विजेते डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या सहकार्याने गोवा मराठी पत्रकार संघ, महिला शक्ती अभियान, अखिल भारतीय महिला परिषद व इनर व्हील क्लब, म्हापसा यांच्यातर्फे "वाट शोधताना' अंतर्गत डॉ. अभय बंग यांच्याशी सुसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरीव प्रतिसाद दिला. या भरगच्च कार्यक्रमांत डॉ. बंग यांनी आपल्या अनुभवांचे कथन करताना त्यांच्या सेवेची माहिती दिलीच परंतु समाजासाठी निःस्वार्थीपणे कार्य करण्याची जिद्द व त्यात यशस्वी होण्याचा मार्गही उपस्थितांना कथन केला. महाराष्ट्रातील गडचिरोली या आदिवासी प्रभावित जिल्ह्यात डॉ. बंग यांनी आपली पत्नी डॉ. राणी बंग यांच्या साथीने केलेले कार्य व या भागातील लोकांत निर्माण केलेली जीवनाबद्दलची नवी ऊर्जा याचे प्रत्यक्ष दर्शनच त्यांनी आपल्या अनुभव कथनावरून करून दिले. स्वस्थ आरोग्य हे प्रत्येकाच्या हातात असते. आपल्या आरोग्याची लढाई ही स्वयंपाक घरात व "डायनिंग टेबल'वर होत असते. आपण खाण्यासाठी बाजारात वस्तू विकत घेतानाच आपल्या जीवनमरणाचा निर्णय घेत असतो, असेही ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय व्यवसायात फोफावलेल्या अनितीवर बोट ठेवताना त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. आपल्या देशात वैद्यकीय नीती ही वैद्यकीय व्यावसायिकच ठरवतात व तिथे जनमताला काहीही वाव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय व्यावसायिकांची मक्तेदारी देशात सुरू आहे त्यामुळे व्याधीने ग्रस्त नागरिकांसमोर या परिस्थितीला शरण जाण्यापलीकडे काहीही पर्याय राहत नाही. देशात डॉक्टरांचा तुटवडा हा याच वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. इथे स्पर्धेला जास्त वाव नाही व त्यामुळे ते ठरवतील तो न्याय, असेही ते म्हणाले. नागरिकांत जास्तीत जास्त जागृती करणे गरजेचे आहे. ज्ञानाची सत्ता व माहितीचे भंडार खुले करून नागरिकांना या व्यवसायातील छुप्या गोष्टींची माहिती दिली तरच ही परिस्थिती सुधारेल, असेही यावेळी डॉ. बंग म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यातील महिला व युवकांनी दारूमुक्तीसाठीची उभारलेली चळवळ ही आता संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरली आहे. दारूमुळे माणसाची विवेकबुद्धी नष्ट होते व माणसातील जनावर जागे होते. जनावराबरोबर जुळवून घेणे शक्य नसल्याने गडचिरोलीवासीयांनी दारूमुक्तीचा नारा यशस्वी करून दाखवला. याचा परिणाम म्हणून आपोआपच त्याचे चांगले परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर पडले व त्यांचे राहणीमानही उंचावले, अशी माहिती डॉ.बंग यांनी दिली.
पत्रकार राजू नायक यांनी प्रास्ताविक केले. मोहनदास सुर्लकर यांनी स्वागत केले. सतीश सोनक यांनी डॉ.बंग यांची ओळख करून दिली. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष अमोल मोरजकर यांच्यासह नेली रॉड्रिगीस, भारती प्रभुदेसाई, गौरी काणे, पत्रकार प्रभाकर ढगे, चित्रकार सुबोध केरकर आदी हजर होते. यावेळी डॉ. बंग यांनी उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

No comments: