Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 6 September 2009

क्रीडानगरीसाठी आता
सोमवारी फेरसर्वेक्षण
गैरहजर राहण्यावर
शेतकरी बांधव ठाम

पेडणे, दि. ५ (प्रतिनिधी) - धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतून शेतजमीन वगळावी या मागणीशी ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर नमते घेऊन स्थगित ठेवण्यात आलेले फेरसर्व्हेक्षण आता सोमवार ७ रोजी पुन्हा हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्थेच्या नावाने अटक करण्याची पोलिसांकरवी धमकी देणे व दुसरीकडे त्यांना फेरसर्वेक्षणाला सहयोग करण्याचे आवाहन करणे हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात फेरसर्व्हेक्षणाच्या जागी हजर न राहण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला आहे.
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा २०११ आयोजित करण्यासाठी नियोजन आयोगाकडून ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी या कामाला चालना देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, क्रीडानगरीसाठी जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांना फेरसर्वेक्षणाच्या निमित्ताने पोलिसांकरवी नोटिसा पाठवण्यात आल्याने त्या मागे घेईपर्यंत या फेरसर्वेक्षणाला हजर न राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेऊन सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.
धारगळ येथील या नियोजित क्रीडानगरी जागेतील शेतकऱ्यांनी फेरसर्वेक्षणाला उपस्थित राहून आपाल्या जागेत कोणत्या प्रकारची किती झाडे आहेत, हे अधिकाऱ्यांना दाखवावे, जेणेकरुन आणखी बागायतीची व शेतजमीन वगळण्यास मदत होईल, असे आवाहन क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांनी केले आहे. गणेश चतुर्थीपूर्वी हाती घेण्यात आलेल्या फेरसर्वेक्षणावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई व कुटुंबीयांच्या ४ लाख चौरस मीटर जागेचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
पेडणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा पाठिंबा मिळत नसेल तर इथल्या प्रमुख समस्या सोडवणे अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या बागायती व शेतजमिनी कमी प्रमाणात का होईना या प्रकल्पासाठी जाणार याबद्दल आपल्याला दुःख वाटते. तथापि, शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी व शासकीय नोकऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर म्हणाले.
शेतकरी ठाम
पेडणे तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांची येथील शेतकरीही कदर करतात. पेडणे तालुक्याचा विकास व्हावा याबाबत कुणाचेच दुमत नाही व क्रीडानगरीलाही तालुक्यातून कुणाचाही विरोध नाही. प्रश्न केवळ एवढाच आहे की या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी आवश्यक खडकाळ व नापीक जागा पेडणे तालुक्यात इतरत्र भरपूर आहे; पण क्रीडामंत्र्यांकडून केवळ याच जागेचा हट्ट नेमका का धरला जातो आहे याबाबत मात्र ते काहीही बोलत नाहीत. ही जागा नियोजित विमानतळ व रेल्वेस्थानकापासूनही जवळ आहे. अशीच जागा तुये येथेही आहे व हा गाव देखील मोपा व रेल्वेस्थानकापासून जवळ आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर नमते घेत क्रीडामंत्र्यांकडून जागा कमी करण्याचे सत्र सुरूच आहे.आता एवढेच असेल तर पेडण्यात नापीक जमीन संपादन करून हा पूर्ण प्रकल्प उभारणे शक्य आहे, त्याचा विचार ते का करीत नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

No comments: