म्हापसा, दि. १८ (प्रतिनिधी) : गोव्यातील सर्व वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट विरोधात आज आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हापसा येथे आयोजित भाजप मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक वाहनचालकांनी या मोर्चाला उपस्थिती लावून भाजप नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला. भाजपचे सर्व विद्यमान आमदार, माजी आमदार, अन्य नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
भाजप आयोजित या मोर्चाची सुरुवात संध्याकाळी ४ वाजता मारुती मंदिराकडून झाली. हा मोर्चा शहरात फिरल्यानंतर त्याचे रुपांतर वाहतूक कार्यालयासमोर सभेत झाले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेस सरकार भ्रष्टाचाराने माखल्याचे सांगून आमदार अनिल साळगावकर यांनी ३० लाखांत फेरीबोट बांधून देण्याची उघड ऑफर दिली असताना, सरकार मात्र ७० लाखांत फेरीबोटी बांधण्याचे कंत्राट देत आहे, अशी टीका केली. नंबर प्लेट मागे घेणे सरकारला भाग पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गोवा सरकारला सामान्य माणसाबद्दल काहीच आस्था नाही, जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले आहेत, भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत, अशा स्थितीत सरकार नंबर प्लेटचे ओझे जनतेवर का लादत आहे, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. नंबर प्लेटची सक्ती मागे घेईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. मुक्ता नाईक यांनीही सरकारच्या निर्णयावर कठोर टीका करताना भ्रष्टाचाराने बरबटलेले सरकार महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आणखी अडचणीत का घालत आहे, असा सवाल त्यांनी केला.
या मोर्चात आमदार अनंत शेट, दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, फ्रांसिस डिसौझा, दीलीप परुळेकर, राजेश पाटणेकर तसेच माजी आमदार सदानंद तानावडे, नरहरी हळदणकर, विठू मोरजकर आदी अनेक नेते मोर्चात सहभागी झाले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment