सिमला, दि. १९ - मोहम्मद अली जिना यांचे गुणगान करण्याच्या कारणावरून भाजप आणि रा. स्व. संघाच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
दार्जिलिंगमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंग यांच्या निष्कासनाचा निर्णय सिमला येथील पक्षाच्या तीन दिवसीय चिंतन बैठकीच्या पहिल्याच दिवशी संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जसवंतसिंग यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
भाजपाध्यक्ष राजनाथसिंग यांनी कालच जसवंतसिंग यांच्या "जिना-भारत-फाळणी, स्वातंत्र्य' या पुस्तकातील जिना यांचे गुणगान करणाऱ्या विधानावर टीका केली होती आणि पक्ष जसवंतसिंग यांच्या मताशी मुळीच सहमत नाही, असे घोषित केले होते. आज त्यांनी जसवंतसिंग यांच्या निष्कासनाची येथे घोषणा केली.
राजनाथसिंग म्हणाले, आज मी हा विषय पक्षाच्या संसदीय मंडळापुढे मांडला आणि मंडळाने जसवंतसिंग यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना निष्कासित करण्यात आले आहे. या क्षणापासून ते पक्षाच्या कोणत्या कोणत्याही प्राधिकारिणीचे सदस्य नाहीत.
राजनाथसिंग यांनी कालच जसवंतसिंग यांना सूचना दिली होती की, बुवारपासून सिमला येथे आयोजित चिंतन बैठकीत आपण उपस्थित राहू नये. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाने बैठक बोलवावी असे पत्र जसवंतसिंग यांनी पक्षाध्यक्षांना दिले होते. तेव्हापासून पक्षश्रेष्ठींसोबत त्यांचे संबंध तणावाचे झाले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार पाहिलेले ७१ वर्षीय जसवंतसिंग यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी भाजपतील एकही नेता उपस्थित नव्हता. यावरून आगामी कारवाईचे संकेत कालच मिळाले होते. आज चिंतन बैठकीसाठी जसवंतसिंग सिमल्यात आले होते. पण, कालच राजनाथसिंग यांनी त्यांना बैठकीस उपस्थित न राहण्याबद्दल सूचना केल्याने सकाळी अस्वस्थतेचे वातावरण होते. बैठक सुरू झाल्यानंतर जसवंतसिंग हे हॉटेलमध्येच आपल्या खोलीत होते. त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. पण, ते खरे नव्हते. राजनाथसिंग बैठकीतून बाहेर आले आणि निष्कासनाची घोषणा केल्यानंतर चित्र स्पष्ट झाले.
दु:खद, दुर्देवी : जसवंतसिंग
मी तीस वर्षे पक्षाची प्रामाणिकपणे सेवा केली. पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षासोबत राहिलो. माझ्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडल्या. पण, ज्या पद्धतीने माझे निष्कासन करण्यात आले, ते अतिशय दु:खद आणि दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया जसवंतसिंग यांनी व्यक्त केली.
मी या निर्णयाविरूद्ध कोणतेही अपील करणार नाही किंवा पक्षाने पुनर्विचार करावा अशी याचना देखील करणार नाही, हे मी आधीच स्पष्ट करतो. मी माझ्या पुस्तकात जिनांविषयी जे काही लिहिले, त्याबद्दल मला कोणताही खेद नाही आणि त्या वेदनादायी इतिहासाबाबत माझ्या लिखाणावर मी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. मी लोकसभेचा सदस्य म्हणून कायम राहणार आहे आणि जनतेची सेवा करीत राहणार आहे. माझ्या निष्कासनामुळे माझे राजकीय जीवन संपुष्टात आले, असे समजण्याचे काहीही कारण नाही, असे ते म्हणाले. मी कोणतेही पाप केलेले नाही आणि भारताबद्दल काहीही आक्षेपार्ह म्हटलेले नाही, मग खेद कशाचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सिद्धांत आणि अनुशासनावर ठाम
नवी दिल्ली, दि. १८ ः भारतीय जनता पक्ष आपले सिद्धांत आणि अनुशासनाबाबत कोणताही समझोता करणार नाही, असा संदेश जसवंतसिंग यांच्या निष्कासनाच्या माध्यमातून पक्षाने दिला आहे.
जसवंतसिंग यांच्या निष्कासनाचा निर्णय हा स्पष्ट संदेश देणारा आहे. आणि तो म्हणजे पक्ष सिद्धांत आणि अनुशासनाबाबत कोणताही समझोता करणार नाही, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
फाळणीच्या वेळी जिना यांची गुणगान करणारी जसवंतसिंग यांची भूमिका आणि फाळणीला सरदार वल्लभभाई पटेल हे जबाबदार असल्याचे त्यांचे विधान आम्हाला मुळीच मान्य नाही, असे जावडेकर यांनी ठामपणे सांगितले. जसवंतसिंग यांना त्यांच्या निष्कासनाची सूचना प्रत्यक्ष भेटून न देता फोनवर कशी काय देण्यात आली, असा प्रश्न विचारला असता जावडेकर म्हणाले, पक्षाच्या संसदीय मंडळाच्या घटनेनुसार तशी तरतूद आहे.
अशीच अनुशासनात्मक कारवाई आपण वसुंधराराजे यांच्यावरही करणार काय, असे विचारले असता ते म्हणाले, या विषयावर पक्षाने आधीच निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काही दिवसात पक्षकार्यकर्ते पक्षाच्या निर्णयाचे पालन करताना आपणास दिसतील.
अडवाणी यांनीही जसवंतसिंग यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केले होते, याकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, अडवाणी यांचे मत वेगळे होते. त्यांची मते आणि जसवंतसिंग यांच्या भूमिका यांची तुलना होऊ शकत नाही.
Thursday, 20 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment