विषय धारगळ क्रीडानगरीचा
पेडणे, दि. १५ (प्रतिनिधी) : धारगळ येथील क्रीडानगरीसाठी सुपीक शेतजमीन ताब्यात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करून येथील गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने आपल्या समाज बांधवांना पाठिंबा दर्शवल्यानंतर आता पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाज बांधवांनीही आपल्या शेतकरी बांधवांच्या मदतीला धावण्याचा निर्धार केला आहे. पेडणे येथील शेतकरी सोसायटी सभागृहात उद्या १६ रोजी सकाळी १०.३० वाजता पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाची महत्त्वाची बैठक आयोजिली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना त्यांच्या लढ्यात पाठिंबा दर्शवणारा एकमुखी ठराव संमत केला जाईल, अशी माहिती सरचिटणीस शिवकुमार आरोलकर यांनी दिली.
पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात खडकाळ व पडीक जमीन असतानाही क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी क्रीडा नगरीसाठी धारगळ येथील शेतजमीन ताब्यात घेण्याचा हट्ट चालवला आहे. क्रीडामंत्र्यांच्या या हट्टाला तेवढ्याच खंबीरपणे विरोध करून या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन क्रीडानगरीला न देण्याचा निर्धार केला आहे. या ठिकाणी शेतजमीन असलेले बहुतेक शेतकरी हे विर्नोडा गावचे आहेत.
काही दिवसांपूर्वी विर्नोडा येथील गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत सर्व समाजबांधवांनी विर्नोड्यातील आपल्या शेतकरीबांधवांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा ठराव संमत केला होता. धारगळ येथील या जागेत अनेक भंडारी समाजबांधव शेतकरी कुळे आहेत. हे बहुतेक शेतकरी गरीब असून ही एकमेव शेतजमीन त्यांच्या भवितव्याचा ठेवा आहे.प्राप्त माहितीनुसार सरकारने या जागेसाठी ५५ रुपये प्रतिचौरसमीटर दर देण्याचे निश्चित केले आहे.भंडारी समाजबांधव हे या जागेत कूळ असल्याने त्यांच्या हातात केवळ अर्धी रक्कम पडणार आहे व उर्वरीत रक्कम जमिनदाराला मिळणार आहे.कूळ कायद्यानुसार या जमिनदारांना केवळ ४० पैसे दराने ही जागा देणे भाग पडते; पण या क्रीडानगरीच्या निमित्ताने त्यांचे मात्र उखळ पांढरे होईल, अशी जोरदार चर्चा या भागात सुरू आहे.
हट्ट नको, सामंजस्य हवे
पेडण्यातील शेतकऱ्यांचा क्रीडानगरीला विरोध नाही; पण या प्रकल्पासाठी शेतजमीन संपादून या लोकांच्या भविष्यातील हा अमूल्य ठेवा हिरावून घेण्याचा सरकारला मुळीच अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया पेडण्याचे आमदार तथा पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी व्यक्त केली.
Sunday, 16 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment