शेतकऱ्यांच्या एकजुटीने सरकारची नाचक्की
वाद धारगळ क्रीडानगरीचा
पेडणे, दि. १८ (प्रतिनिधी): धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेतून शेतजमीन वगळण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज आपल्या एकजुटीचे दर्शन घडवत सरकारला चांगलीच चपराक दिली. कथित जागेचे आज फेरसर्वेक्षण निश्चित करण्यात आले होते परंतु काल शेतकऱ्यांनी या फेरसर्वेक्षणाला आक्षेप घेऊन ते चतुर्थीनंतर हाती घेण्याची विनंती केली होती. एवढे असूनही पोलिसांकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून हे फेरसर्वेक्षण पुढे रेटण्याच्या प्रयत्नांना आज शेतकऱ्यांनी एकजुटीने खो घातला. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक तथा येथील जमीनदार व्ही. एम. प्रभूदेसाई व त्यांचे नातेवाईक बंडू देसाई वगळता एकही शेतकरी याठिकाणी फिरकला नाही, त्यामुळे फेरसर्वेक्षणासाठी हजर राहिलेल्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची मात्र बरीच नाचक्की झाली.
धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतील जमिनीचे फेरसर्वेक्षण आज करण्यात येणार होते.या नियोजित प्रकल्पातून शेतजमीन वगळावी, अशी मागणी करून शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या शेतकऱ्यांकडून फेरसर्वेक्षणावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांना नोटिसाही पाठवण्याची कृती सरकारने केली. दरम्यान, काल शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी श्री.मिरजकर यांना निवेदन सादर करून हे फेरसर्वेक्षण चतुर्थीनंतर हाती घेण्याची विनंती केली होती. सध्या गणेश चतुर्थीचा सण ऐन तोंडावर असल्याने सगळे शेतकरी आपापल्या कामात व्यस्त आहेत, त्यामुळे हे फेरसर्वेक्षण घाईगडबडीत न करता निवांतपणे हाती घ्यावे,असेही या निवेदनात सुचवण्यात आले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या निवेदनाची कदर न करता आज या ठिकाणी पेडणेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर, मामलेदार भूषण सावईकर व पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई आपल्या पोलिस फौजफाट्यासह हजर राहिले. याठिकाणी अवघे काही शेतकरी जरी हजर राहिले असते तरी त्यामुळे शेतकऱ्यांत फूट पडल्याचे भासवून हे सर्वेक्षण हाती घेण्याचा डाव सरकारने आखला होता,अशी टीका या शेतकऱ्यांनी केली. या विषयी शेतकरी मात्र एकसंध आहेत, त्यामुळे एकही शेतकरी याठिकाणी फिरकला नाही. नियोजित क्रीडानगरीसाठी जागा जाणाऱ्यांपैकी केवळ गोवा क्रीडा प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम.प्रभूदेसाई व कुटुंबीय यांचाच केवळ सरकारला पाठिंबा आहे हे देखील आज स्पष्ट झाले. दरम्यान, याठिकाणी उपस्थिती लावून हात हलवत परत जावे लागेल व त्यामुळे नाचक्की होईल यामुळे अखेर प्रभूदेसाई यांच्या कुटुंबीयांच्या ४ लाख चौरसमीटर जागेचे अखेर सर्वेक्षण करण्यात आले. सर्वे क्रमांक २९८,२९४,३०१,२९७,२९६ व ३०६ या जागेचे श्री.प्रभूदेसाई व त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने फेरसर्वेक्षण करण्यात आले.
तिखट स्वाभिमानी पेडणेवासीय हुशारही आहेत
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गेल्या विधानसभेत क्रीडानगरी विरोधी पेडण्यातील शेतकऱ्यांची बाजू मांडताना पेडणेवासीय तिखट स्वाभिमानी असल्याचा उल्लेख केला होता.पेडणेवासीय स्वाभिमानी आहेतच पण ते हुशारही आहेत याची प्रचिती आजच्या प्रकारातून सिद्ध झाली आहे. काहीही करून शेतकऱ्यांत फूट पाडण्यासाठी क्रीडामंत्र्यांकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत.या फेरसर्वेक्षणाच्या निमित्ताने खवळलेले शेतकरी इथे येथील व दंगामस्ती करतील व त्यांना पोलिसांकरवी अटक करून त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारून त्यांच्यावर दबाव टाकणे शक्य होईल,अशीच शक्कल लढवण्यात आली होती.क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांची क्रीडानगरीसाठी सुरू असलेली धडपड खरोखरच प्रशंसनीय अशीच आहे पण त्यांनी केवळ याच जागेसाठी सुरू ठेवलेला हट्ट मात्र संशय निर्माण करणारा आहे.पेडणेत इतरत्र अनेक ठिकाणी खडकाळ व नापीक जमीन आहे त्याचा विचारही न करता हीच जागा पाहिजे हा हट्ट मात्र नेमका कशासाठी हेच समजत नाही,अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.सुरुवातीस २३ लाख जागा पाहिजे असा दावा करणाऱ्या क्रीडामंत्र्यांनी आता त्यातील काही जागा सोडून ती १३ लाख चौरसमीटरांपर्यंत आणली आहे. आता या जागेतून त्यांनी नियोजित क्रीडानगरी प्रकल्पातील कोणते प्रकल्प वगळले आहेत हे मात्र उघड केले नाही,असेही यावेळी शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या जागेबाबत सरकारकडून सुरू असलेला हेकेखोरपणा पाहिल्यास चर्चेव्दारे किंवा सामंजस्याने तोडगा काढण्याची क्रीडामंत्र्यांची अजिबात तयारी दिसत नाही व त्यामुळे या जागेचे संरक्षण न्यायालयामार्फतच करावे लागेल,असाही इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
प्रभूदेसाईं कुटुंबीयांवरील आरोप निराधार
प्रभूदेसाई कुटुंबीयांवर शेतकऱ्यांकडून होणारे आरोप निराधार असल्याचा दावा व्ही.एम.प्रभूदेसाई यांनी केला.आजपर्यंत जेवढे सरकारी प्रकल्प उभे राहिले त्याला प्रभूदेसाई कुटुंबीयांनी सहकार्य करून त्याग केला आहे.तिळारी नाल्यासाठी प्रभूदेसाई कुटुंबीयांची कितीतरीच जागा गेली आहे. प्रभूदेसाई हे पैशांसाठी अजिबात लाचार नाहीत,असे ठणकावून सांगत आजपर्यंत १२ प्रभूदेसाई कुटुंबीयांनी त्याग केला आहे,असेही ते म्हणाले.याठिकाणी शेतात बेकायदेशीर खाणी चालतात त्याबाबत शेतकरी गप्प का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आपण पेडणेचे सुपुत्र आहे व सरकारी पातळीवर पेडण्याचे सोने करण्याची संधी मिळाल्याने पेडण्यातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू तयार व्हावेत यासाठीच या क्रीडानगरीला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
Wednesday, 19 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment