त्या नगरसेवकांची अखेर 'गॉडफादर'कडून पाठराखण
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : पणजी महापालिकेतील घोटाळ्यांसमोर राज्य सरकारने नांगी टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचा पूर्णतः ढासळलेला कारभार ठिकाणावर आणण्यासाठी यंदाच्या जूनमध्ये महापालिकेच्या आयुक्तपदी खास नियुक्त केलेले संजीत रॉड्रिक्स यांची अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. माजी आयुक्त एल्विस गोम्स यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश सरकारने काल जारी केले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासनाची हमी देण्यात येत असली तरी महापालिकेतील या बदली नाट्यामुळे सरकारचा हा फुगा फुटला आहे. नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनीही या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त करून महापालिकेचा कारभार नुकताच कुठे मार्गी लागत असताना पर्सोनेल खात्याला संजीत यांची बदली करण्याची दुर्बुद्धी कशी काय सुचली हे कळत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.महापालिका प्रशासनाची जबाबदारी नगरविकास खात्याकडे येत असली तरी अधिकाऱ्यांच्या बदलीचा अधिकार हा पर्सोनेल खात्याला आहे. सध्या हे खाते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे असल्याने याबाबत तेच योग्य स्पष्टीकरण देतील, असे सडेतोड वक्तव्य त्यांनी केले.
संजीत यांना केवळ पणजीतील कचरा साफ करण्यासाठी नेमण्यात आले होते काय, अशी संतप्त प्रतिक्रिया राजधानीत उमटत आहे. एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याची फजिती सरकारकडून सुरू आहे असेच या प्रकारावरून स्पष्ट होते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. यापूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी काम केलेल्या संजीत यांना महापालिकेतील काही सत्ताधारी नगरसेवकांनी केलेल्या सर्व कारनाम्यांची संपूर्ण माहिती होती. त्यांनी या पदाचा ताबा घेताना मुख्यमंत्र्यांकडे कामाबाबत पुरेशी मोकळीक मिळावी, अशी विनंती केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली होती.
आता अचानक त्यांची बदली करण्यात आल्याने पुन्हा एकदा महापालिका राजकारणाला ऊत आला आहे. महापालिकेतील अनेक घोटाळ्यांचाही तपास सुरू झाल्याने व त्यात महालेखापालांचा अहवाल उघड झाल्याने सत्ताधारी गटातील अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान, या नगरसेवकांनी आपल्या "गॉडफादर' करवी संजीत यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू करून अखेर त्यात यश मिळवल्याने महापालिकेतील या तथाकथित महाभागांसमोर सरकारने शरणागती पत्करल्याची चर्चा राजधानीत सुरू आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही या बदली आदेशावर टीका केली. या सरकारात कोणताही ताळमेळ नसून सरकारातील प्रत्येक मंत्री आपल्या सोयी व मर्जीप्रमाणे अधिकाऱ्यांना वागवतात. त्याचा फटका मात्र जनतेला बसतो, असे ते म्हणाले.
ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मात्र या बदलीबाबत स्पष्टीकरण देताना आपल्या सहकाऱ्यांची पाठराखण केली. संजीत यांच्याकडे इतरही अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती त्यामुळे ते महापालिकेच्या कारभाराकडे पूर्णवेळ लक्ष देऊ शकत नव्हते. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्ताची गरज होती, त्यामुळेच ही बदली झाली, असे समर्थन त्यांनी केले.
महापालिकेत सध्या विद्यमान सत्ताधारी गट हा बाबूश समर्थक आहे. या गटातील अनेक नगरसेवकांनी केेलेल्या गैरप्रकार तथा भानगडींचा अलीकडच्या काळात पर्दाफाशही झाला आहे. असे असताना या "भ्रष्ट' नगरसेवकांना पाठीशी घालण्याची बाबूश यांची भूमिका मात्र अनेकांना पसंत पडली नसून त्यांनी या प्रकरणी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Sunday, 16 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment