Sunday, 25 January 2009
'त्या' सभेने फोंड्यातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय
फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रवाशांनी केलेली गर्दी. (छाया : प्रमोद ठाकूर)
फोंडा, दि.२४ (प्रतिनिधी): येथील फोंडा बसस्थानकावरून पणजी, मडगाव, सावर्डे, डिचोली, वाळपई आदी विविध भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बऱ्याच बसगाड्यांना साखळी येथील एका जाहीर सभेसाठी लोकांना नेणे बंधनकारक केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज फोंडा भागातील लोकांना पुरेशा बसगाड्यांअभावी प्रचंड त्रास सोसावा लागला.
शहर आणि आसपासच्या भागात कामधंद्यानिमित्त आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना घरी पोहोचण्यासाठी त्रास सहन करावा लागला. प्रवासी बसगाड्यांचा आपल्या कामासाठी उपयोग करणारे नेते आणि सरकारी यंत्रणा यांच्या नावाने त्रस्त सामान्य प्रवासी बोटे मोडत होते. फोंडा भागातील प्रवासी बसगाड्यांना मडकई आणि प्रियोळ मतदारसंघातील लोकांना साखळी येथील सभेसाठी नेणे वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंधनकारक केल्याची तक्रार आहे. दुपारी दीड वाजता प्रवासी खासगी बसगाड्यांवर राजकीय नेत्यांचे बॅनर्स लावून त्यांना लोकांना आणण्यासाठी मडकई व प्रियोळ भागात पाठविण्यात आले. यासंबंधी येथील काही बसचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या "आदेशा'वरून प्रवासी बसगाड्यांना सभेसाठी लोकांना नेण्याची सूचना केल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. फोंडा भागातील सुमारे सत्तर ते एैशी बसगाड्यांना सभेसाठी लोकांना नेण्याचे काम देण्यात आल्याचे वृत्त आहे. या कामासाठी बसगाड्यांना भत्ताही देण्यात आला आहे.
फोंडा भागातील लोकांनी गैरसोय करण्यात आलेल्या या प्रकाराचा शिवसेनेचे उत्तर गोवा जिल्हा प्रमुख दामू नाईक यांनी तीव्र निषेध केला आहे. लोकांना सभेसाठी नेण्यासाठी गाड्या हव्या होत्या तर नेत्यांनी खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घ्यायला हव्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.
पणजी, डिचोली, वाळपई, सावर्डे, मडगाव या भागाबरोबर फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक फोंडा शहरात कामधंद्यासाठी येतात. सकाळी फोंड्यात येताना बसगाड्या उपलब्ध होत्या. मात्र, संध्याकाळी घरी परत जाताना बसगाड्यांची संख्या कमी असल्याने अनेक जण वेळेवर आपल्या घरी पोहोचू शकले नाही. या भागातील बसगाड्यांची संख्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असल्याने लोकांना बसमध्ये खच्चून भरण्यात येत होते. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न प्रवाशांकडून करण्यात आला. सरकारी अधिकारी आणि नेत्यांनी बसगाड्या नेल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची कोणताही शक्यता नाही, असे प्रवाशांनी सांगितले.
येथील जुन्या बसस्थानकाला संध्याकाळी प्रवाशांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप आले होते. बसगाड्यांबाबत प्रवाशांकडून वाहतूक पोलिसांकडे विचारणा केली जात होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही निश्चित माहिती मिळत नव्हती. त्यामुळे प्रवाशांना निर्धारित स्थळी जाण्यासाठी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत ताटकळावे लागले. गर्दीमुळे अनेकांना बसगाड्यांत प्रवेशही मिळत नव्हता. त्यामुळे काही लोकांना भाडोत्री खासगी गाड्यांद्वारे घर गाठावे लागले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment