Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 31 October 2008

अतिरेक्यांवर कारवाईस टाळाटाळ : भाजप

नवी दिल्ली, दि. ३० : दिल्लीत बसलेले केंद्र सरकार प्रचंड गोंधळलेले असून व्होट बॅंकेसाठी ते राष्ट्रीय सुरक्षा दावणीला बांधत आहेत. याच कारणाने त्यांनी अतिरेक्यांवर कारवाई करणेही वेळोवेळी टाळले असल्याची तिखट प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीने व्यक्त केली आहे.
पक्षाचे प्रमुख राजनाथ सिंग यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, आसाममधील स्फोट घडवून आणण्यामागे बांगलादेशी घुसखोरांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वास्तविक बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत कारवाईची मागणी वेळोवेळी झाली. पण, सरकारने नेहमीच व्होट बॅंकेकडे पाहून कारवाई करण्याचे टाळले. परिणामी बांगलादेशींचे लोंढे भारतात शिरले.
अतिरेक्यांचा कोणताही धर्म, पंथ नसतो. त्यांच्या कोणत्याही कारवाया समर्थनीय कधीच नसतात. उलट त्या माणुसकीच्या विरोधातच असतात. आता इतके स्फोट आणि मोठमोठे हल्ले झाल्यानंतर तरी सरकारने डोळे उघडे करून दहशतवादाच्या समस्येकडे पाहिले पाहिजे. राजकीय स्वार्थ दूर ठेवून कुठेतरी देशहिताचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा त्यांनी प्राधान्याने उचलला पाहिजे.
आज आसाममधील स्फोटांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस सरकारची निष्क्रियता आणि अपयश उघड केले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्याच्या बाता मारणाऱ्या संपुआ सरकारला देशातील घातपाती कारवायांचा सुगावाही मिळू शकत नाही, मग ते सिमी असो, हुजी किंवा उल्फा. दहशतवादाविषयी संपुआ सरकारची नरमाईच या घटनांना जन्म देत असल्याचीही राजनाथ सिंग यांनी निंदा केली.
हे गुप्तहेर संघटनेचे अपयश : भाकप
आसाममधील स्फोटमालिका हे गुप्तहेर संघटनांचे फार मोठे अपयश असल्याची प्रतिक्रिया भारतीय कम्युनिस्ट पार्टीने व्यक्त केली आहे.
पक्षातर्फे जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आसाम हे ईशान्येकडील अतिशय संवेदनशील राज्य आहे. शिवाय त्याला लागून आंतरराष्ट्रीय सीमा आहे. हे राज्य नेहमीच घुसखोरीच्या समस्येने ग्रस्त राहिले आहे. केंद्र सरकारने विशेषत: गृहमंत्रालयाने तेथील समस्यांकडे आजवर कानाडोळा केला आहे. त्यांची ही बेफिकीर वृत्तीच असंख्य निरपराध लोकांच्या जीवावर बेतली आहे.
-------------------------------------------------------------------
महाराष्ट्र आणि प. बंगालमध्ये 'हाय अलर्ट'
मुंबई, दि. ३० : आसाममधील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह देशात अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महत्त्वपूर्ण संस्था, ठिकाणे आणि व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश जारी केले आहेत. पश्चिम बंगालमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्या असून तेथील सीमा सील करण्यात आल्याचे वृत्त आहे.
------------------------------------------------------------------
अमेरिका, पाककडून निषेध
नवी दिल्ली, दि.३० : अमेरिका आणि पाकिस्तान यांनी आसाममधील बॉम्बहल्ल्यांचा निषेध केला असून या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांविषयी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेच्यावतीने भारतातील राजदूत डेव्हीड मलफोर्ड यांनी संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानतर्फे राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी आसाममधील स्फोटांबाबत प्रतिक्रिया दिली. झरदारी यांनी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, निरपराध लोकांचे बळी घेणारा दहशतवाद आणि कट्टरवाद कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरूच शकत नाही. याचा समूळ नायनाट झाला पाहिजे.
पंतप्रधान गिलानी यांनी आपल्या संदेशाद्वारे दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तान भारतासोबत असल्याचे म्हटले आहे.

No comments: