Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 14 August 2008

पणजी बाजार संकुलातील जागावाटप छोटे भाजी विक्रेते संतप्तच

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): सुरेंद्र फुर्तादो यांनी नव्या बाजार संकुलाच्या मधोमध बसवलेल्या भाजी विक्रेत्यांना आज पोलिस संरक्षणात हटवून तेथेच बाजूला जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे काल फुर्तादो यांनी "बाजार बंद'ची दिलेली हाक हाणून पाडण्यात आली. मात्र काही भाजी विक्रेते जागावाटपाबाबत संतप्त असून यात बिगर गोमंतकीयांचेच उखळ पांढरे करण्यात आले, असे त्यांचे म्हणणे आहे.
स्वतःला गोव्याचे राज ठाकरे म्हणवणारे फुर्तादो सकाळी बाजारात फिरकलेही नाहीत. या भाजी विक्रेत्यांना हटवताना पणजीचे महापौर टोनी रॉड्रीगीस, नगरसेवक कृष्णा नाईक व स्वीकृत सदस्य दया कारापूरकर उपस्थित होते. बाजाराच्या मधोमध बसवलेल्यांना सर्वांनाच जागा उपलब्ध करून दिल्याचे महापौरांनी सांगितले. फुर्तादो यांनी त्यांची दिशाभूल करून तेथे बसवले होते, असा आरोप महापौरांनी केला. या भाजी विक्रेत्यांना हटवताना काही प्रमाणात तणाव निर्माण झाला. मात्र बाजूला जागा मिळालेल्या विक्रेत्यांमध्ये उशिरापर्यंत संतापाची भावना दिसून आली. आमची कोणत्याच नगरसेवकाशी ओळख नाही व आम्ही कोणाला पैसेही देऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला बाजूची जागा देण्यात आली, असे त्यांचे म्हणणे. गेल्या काही दिवसांपासून भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नावरून गोंधळ उडालेला असताना बाजारकर मंडळाने आवाज केला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या बाजार संकुलातील पहिल्या मजल्यावर काही दुकाने कुलूपबंद करून राखीव ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
"गेल्या २५ वर्षांपासून मी पणजीच्या बाजार भाजीची विक्री करते, नवरा नोकरी करत नाही, मुले मोठी झाली; पण त्यांना नोकरी मिळत नाही, दिवसभर भाजी विकून मिळणाऱ्या पैशातून चूल पेटते. आम्हाला अशी अडगळीतील जागा दिली आहे की, जेथे दुपारनंतर कोणीच फिरकत नाही, त्यामुळे आमचे सामान कुजण्याची शक्यता आहे'. डोळ्यात पाणी आणून कुडका येथील देवकी शिरोडकर यांनी आपली कैफियत मांडली. त्यांच्याप्रमाणेच अशा सुमारे पंधराच्या विक्रेत्यांना अडगळीतील जागा मिळाल्याने त्यांचा व्यवसायच ठप्प होण्याची शक्यता आहे.
जेथे सर्व भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे, तेथेच आम्हालाही जागा मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. या उलट, बिगर गोमंतकीय फळ व भाजी विक्रेत्यांना मात्र प्रशस्त जागा देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

No comments: