Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 April 2008

गोपीनाथ मुंडे यांचे सर्व पदांचे राजीनामे

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी): मुंबई विभागीय भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार मधू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचे निमित्त होऊन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज पक्षातील आपल्या सर्व पदांचे राजीनामे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांना सादर केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, संसदीय मंडळाचे सदस्य, राजस्थानचे पक्षाचे प्रभारी, महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य आदी पदे त्यांच्याकडे होती. त्या सर्व पदांचा मुंडे यांनी आज त्याग केला.
आपले राजीनामे मुंडे यांनी मागे घ्यावे यासाठी त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश येईल, असा विश्वास पक्षाच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मुंडे यांचे मन वळविण्याच्या हालचालीही एव्हाना सुरू झाल्या आहेत. भाजपा विधिमंडळ गटनेते एकनाथराव खडसे जळगावहून आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर खामगावहून संभाजीनगरला रवाना झाले आहेत. राजीनामे मागे घेण्याची विनंती ते मुंडे यांना करणार आहेत.
चव्हाणांच्या नियुक्तीनंतर-
मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आ. प्रकाश मेहता यांच्या जागी आ. मधु चव्हाण यांची नियुक्ती पक्षाने केल्यानंतर लगेच मुंडे यांनी आपले राजीनामे मुंबईहूनच राजनाथसिंह यांना पाठविले आणि ते संभाजीनगरला रवाना झाले, असे त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले.
मुंबईच्या अध्यक्षपदाचा निर्णय गेले वर्षभर लांबणीवर पडला होता. आ. मेहता यांनाच कायम ठेवायचे की नवीन अध्यक्ष नेमायचा, हे एकमताने ठरत नव्हते. शेवटी यासाठी एक ३ सदस्यीय समिती नेमण्यात आली. राम नाईक, वेदप्रकाश गोयल आणि प्रा. बाळासाहेब आपटे या तिघांच्या समितीने मुंबईतील काही प्रमुख कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेऊन आ. मधू चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती.
या शिफारसीवर विचार करून पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी आज प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांना आपला निर्णय कळविला आणि आ. मधू चव्हाण यांच्या नावाला हिरवी झेंडी दाखविली. त्यानुसार प्रदेश भाजपाने आ. मधू चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मुंडे यांचे राजीनामा-प्रकरण घडले.
लोकशाही नसल्याचा आरोप
मुंबई असो की दिल्ली, पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय होत नाहीत, असे जाणवल्यामुळे मी पदे सोडली, अशा शब्दांत मुंडे यांनी संभाजीनगरला पोचल्यानंतर आपली भूमिका मांडली.
कोण्या एका प्रकरणावरून राजीनामे दिलेले नाही व मी कोणा एका व्यक्तिविरुद्धही नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, पक्ष लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे, अशी माझी भावना आहे.
अशीच भावना पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचीही आहे. त्या सर्वांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून मी आपली भूमिका मांडणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
३० वर्षे लोकप्रतिनिधी
भाजपाचा बहुजन चेहरा अशी ओळख असलेले मुंडे यांनी जनसंघाच्या काळापासून स्व. प्रमोद महाजन यांच्या प्रेरणेने राजकारणात उडी घेतली. आणिबाणीत त्यांनी कारावासही भोगला. १९७८ साली त्यांनी बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. रेणापूर मतदारसंघातील पहिली निवडणूक ते हारले. मात्र, येथूनच १९८५ पासून आजपर्यंत ते आमदार म्हणून सतत निवडून येत आहेत.
१९९० ते १९९५ याकाळात विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध प्रचाराचे रान उठवून त्यांचे सरकार खाली खेचण्यात महत्त्वाचे योगदान दिले आणि युतीच्या राज्यात त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले.
दोन वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांचे अचानक निधन झाल्यानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस नेमले.
-----------------------------------------
मुंडेंचे प्राधान्य पुरोहितांना?
मुंबई भाजपाध्यक्षपदी आ. मेहता यांच्या जागी आ. राज पुरोहित यांना नेमावे, अशी मुंडे यांची इच्छा होती, असे सूत्रांकडून कळते.
आ. राज पुरोहित हे विधानसभेत भाजपाचे मुख्य प्रतोद आहेत. अन्य ५ आमदारांसोबत सध्या त्यांचे सदस्यत्व निलंबित अवस्थेत आहे.
------------------------------------------

No comments: