मंदार सुर्लकर हत्याप्रकरण
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): मंदार सुर्लकरच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याचे शंकर याने रायन पिंटो याला सांगितल्यानंतर उसकई म्हापसा येथे रायनने आपल्या घरातच दोरीच्या साहाय्याने मंदारचा गळा आवळून व डोक्यावर बेसबॉल बॅटने जोरदार प्रहार करून त्याला ठार केले, अशी साक्ष माफीचा साक्षीदार बनलेल्या अल सलेहा सनी बेग याने काल न्यायालयात दिली.
वास्को येथील मंदार सुर्लकर हत्याप्रकरणी बेग याने दिलेली जबानी पूर्ण झाली असून त्याची उलटतपासणी दोन आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे. मंदारला ठार करण्यापूर्वी त्याला तीन वेळा सीरिंजद्वारे "व्होडका' देण्यात आली होती. मंदारचा मृत्यू झाल्यावर त्याला आल्तो गाडीत घालून डिचोलीमार्गे फोंड्याकडे जाणाऱ्या एका निर्जनस्थळी त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मारण्याकरता वापरलेल्या सर्व वस्तू लाल बॅगेत टाकून बाणस्तारीच्या पुलावरून ती बॅग फेकून देण्यात आल्याचे बेग याने सांगितले.
या प्रकरणात रायन पिंटो हा मुख्य सूत्रधार असून मंदारच्या अपहरणातून मिळणाऱ्या रकमेतून सर्वांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये देण्यात येणार होते. १४ सप्टेंबर ०६ रोजी पाच अल्पवयीन मित्रांनी खंडणीसाठी आपल्याच मित्राचे अपहरण केले व नंतर त्याची हत्या केल्यामुळे गोव्यात प्रचंड खळबळ माजली होती. मंदारचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागताच या खून प्रकरणातील संशयित आरोपी अल सलेहा सनी बेग याच्यासह त्याचे साथीदार रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी व रायन पिंटो यांना अटक झाली होती. यातील सनी बेग याला माफीचा साक्षीदार बनवल्याने सध्या त्याची जबानी नोंदवून घेण्याचे काम बाल न्यायालयात पूर्ण झाले आहे.
अपहरणाची तयारी...
या कटानुसार १० सप्टेंबर २००६ रोजी दुपारी ३ वाजता रायन पिंटो याच्या उसकई येथील घरी सर्व संशयित जमले. यावेळी रायन याने आधीच ३ ते ४ इंजेक्शन सीरिंज, पांढरी मोठी चिकटपट्टी, ३ ते ४ रोल कापड, हातमोज्यांच्या तीन जोड्या, काही नंबर प्लेट व दोन बेसबॉल बॅट आणून ठेवल्या होत्या.
पहिली संधी हुकली
त्याच दिवशी सायंकाळी मंदारचे अपहरण करण्याचा बेत ठरला. त्यानुसार रायन याने मंदारला दूरध्वनी केला. मुंबईच्या एका कंपनीला गोव्यात "डिस्को शो' करायचा असून त्यासाठी संबंधितांना भेटायला ये, असे त्याला सांगण्यात आले. मात्र, आपण सध्या गडबडीत आहोत व उद्या सकाळी भेटतो, असे मंदार याने सांगितले.
झोपी गेल्याने मंदार तेव्हा बचावला...
दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबर ०६ रोजी सकाळी त्याचे अपहरण करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मी फोंड्यातील माझे दुकान बंद ठेवले. सकाळी मी आणि रायन पणजीत आलो. बाकीचे सहकारी उसकईलाच थांबले. आम्ही पणजीत येऊन मंदारला दूरध्वनी केला. तेव्हा त्याने आपण झोपलो असून त्या कंपनीवाल्यांना नंतर भेटतो, असे सांगितले. त्यामुळे आम्ही उसकई येथे रायनच्या घरी परतलो.
नव्या कटाची आखणी
१२ सप्टेंबर शनिवारी मी दुकानावर गेलो नाही. रायनने मला जाऊ दिले नाही. त्या दिवशी मला कोणतीही माहिती न देता, रायनने माझ्या घरी दूरध्वनी करून मी तातडीने कामासाठी बंगळूरला गेल्याचे माझ्या घरच्यांना सांगितले. त्या रात्री मी आणि रायन पार्टीला गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता आम्ही, घरी परतलो. मी सकाळी ११ वाजता उठलो आणि पणजीला निघून गेलो व रात्री सात वाजता परतलो. यादरम्यान दुपारी उसकईला रोहन व शंकर येऊन गेले होते. त्यांनी नवी योजना आखली होती. मी परतल्यावर या अपहरणातून मिळणाऱ्या रकमेतून सर्वांना पाच पाच लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले.
असे झाले अपहरण...
रविवार दि. १४ सप्टेंबर ०६ रोजी सकाळी ९ ते ९.३० या दरम्यान रोहन आणि नफियाज हे मंदराला घेऊन उसकई येथे येत असल्याचा दूरध्वनी रायनला आला. वास्कोला जाऊन रोहन आणि नाफियाज मंदराला घेऊन काळ्या रंगाच्या आल्तो गाडीतून निघाले होते. शंकर त्यांच्या मागून होंडा डिओवरून येत असल्याची माहिती देण्यात आली. पणजीत पोहोचल्यावर रोहन गाडीतून उतरला आणि नफियाज त्याला घेऊन उसकईत आला.
अपहरण झाल्याचे मंदारला कळले
घराचे दार मीच उघडले. त्या दिवशी मी मंदारला पहिल्यांदा पाहिले. रायन तेव्हा भोजनाच्या खोलीत बसला होता. काही वेळात रोहन आणि शंकर त्या ठिकाणी आले. ते दोघेही थेट एका खोलीत गेले. मला मंदारशी बोलत बसायला सांगून रायनही आत गेला. त्यानंतर रोहन बाहेर आला. त्याने मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावून मंदारच्या थोबाडीत देण्यास मला सांगितले. मी तसे केले. यावेळी रायन तेथे आला आणि त्याने मंदारला मागून घट्ट पकडले. यावेळी अचंबित झालेल्या मंदारने "हे काय', असे रोहनला विचारले. त्यावेळी रोहनने त्याला, "आम्ही सांगतो तसे कर', अशी धमकी दिली. मग रोहनने मंदारचे हात चिकटपट्टीने बांधले. त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावण्यात आली. त्यानंतर त्याच्या तोंडावरून उशीचा आभ्रा घालण्यात आला. शंकरने मंदारचे पाय दोरीने घट्ट बांधले. या सर्वांनी यापूर्वी १० सप्टेंबर रोजी अशा प्रकारे रोहनला बांधून हत्येची "रंगीत तालीम' केली होती, असे सनी बेग याने सांगितले.
मंदारचा अनन्वित छळ
हात - पाय बांधल्यानंतर रायनने त्याला मारहाण केली. "आपले अपहरण झाले असून पैसे पाठवून द्या' असा संदेश मंदारच्या आवाजात रोहनने दोन वेळा आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला. हे काम आटोपल्यानंतर मंदारने रोहनकडे पाणी मागितले. मात्र, रोहनने त्याला पाणी न देता "व्होडका'चे इंजेक्शन दिले. तेव्हाही रायनने त्याला लाथाबुक्क्यांनी मारले. त्यानंतर रोहन, शंकर आणि नफियाज पणजीला निघून गेले.
फोनवरून पैशांची मागणी
पणजीत पोहोचल्यावर शंकरने मंदारच्या वडिलांना पैशांची मागणी करणारा दूरध्वनी केला. त्यानंतर शंकरने मंदारच्या वडिलांनी पैसे देण्याचे नाकारल्याचे रायनला कळवले. मग रोहन व नफियाज यांना रायनने वास्कोला जाण्यास फर्मावले. कारण खंडणीचे पैसे ते घेणार होते. यावेळी मी रायनच्या घरी लॅपटॉपवर खेळत होतो. काही वेळात मी व्होडका घेण्यासाठी आत गेलो तेव्हा, रायन मंदारवर बेसबॉलच्या बॅटने प्रहार करत होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यानंतर रायनने शंकरला गाडी घेऊन येण्यास सांगितले. दुपारी ३ वाजता शंकर आला.
मंदारचा मृत्यू...
शंकर आल्यावर मी आणि तो पाच ते दहा मिनिटे बाहेरच बोलत थांबलो. ज्यावेळी आम्ही आत गेलो त्यावेळी रायन मंदारच्या तोंडावर व मानेवर पाय ठेवून उभा राहिला होता. तो त्याच्या गळ्याभोवती दोरी गुंडाळून हाताने ती खेचून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करीत होता. मंदार कोणतीही हालचाल न करता जमिनीवर पडला होता. तेव्हा रायनचे बूट व उशीचा आभ्रा रक्ताने माखला होता. ते दृश्य पाहून माझा व शंकरचा थरकाप उडाला. रायनने आम्हालाही धमकावले.
मृतदेहाची विल्हेवाट...
त्यानंतर रायनने एका मोठ्या पॉलिथिन पिशवीत मंदारचा मृतदेह कोंबण्यासाठी आमची मदत मागितली. अखेर एका चादरीत मृतदेह गुंडाळण्यात आला. आम्ही तो तसाच ओढत गाडीत नेऊन ठेवला. मंदारला मारण्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू लाल बॅगेत घालण्यात आल्या. नंतर मी आणि रायन मृतदेह टाकण्यासाठी डिचोलीमार्गे फोंड्याकडे निघालो. एका निर्जनस्थळी पोहोचल्यावर आम्ही गाडी थांबवली. रायन मागच्या आसनावर मृतदेहाशेजारी जाऊन बसला. त्याने ती पॉलिथिन पिशवी काढली. तोंडावर घातलेला उशीचा आभ्रा काढला. मंदारच्या तोंडावर निळा टी शर्ट गुंडाळला आणि एका झाडीत मृतदेह फेकण्यात आला. त्यानंतर रायनने रोहनला दूरध्वनी करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. आम्ही फोंड्याला निघून गेलो. यावेळी माझ्या दुकानावर मी आणि रायनने कपडे बदलले आणि आम्ही पणजीला निघालो. त्या रात्री आम्ही दोघे उसकई येथेच रायनच्या घरी थांबलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ रोजी रात्री सात वाजता रोहनसह अन्य साथीदारांना भेटण्यासाठी आम्ही वास्कोत गेलो. रायन तेव्हा खूष होता. कारण त्याचा तो पहिला खून होता व त्याने तसे बोलूनही दाखवल्याचे सनी बेग याने सांगितले.
या घटनेनंतर या प्रकरणातील सर्व संशयितांना पणजी व म्हापसा पोलिसांनी अटक केली होती.
Tuesday, 8 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment