Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 23 July 2011

माध्यमप्रश्‍नी युवाशक्तीचा ‘घणाघात’

‘युवाशक्तीचा एकच निर्धार! कामत सरकारचे पतन हाच निर्धार!’
पर्वरीत उत्तर गोवा युवा मेळाव्याला अमाप प्रतिसाद

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोव्याच्या स्वत्वासाठी व पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने मातृभाषा रक्षणासाठी तरुणांनी छातीचा कोट करून सरकारविरोधात उठाव करावा असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांनी पर्वरी येथे केले. पर्वरी येथील आझाद भवनाच्या स्व. राम मनोहर लोहिया सभागृहात आज (दि.२२) उत्तर गोवा युवा विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. यावेळी श्री. वाघ युवाशक्तीला मार्गदर्शन करताना बोलत होते.
मेळाव्यात, ‘युवाशक्तीचा एकच निर्धार! दिगंबर कामत सरकारचे पतन हाच निर्धार!’ अशा वारंवार देण्यात येणार्‍या गगनभेदी घोषणांनी सभागृह दणाणून गेले. या युवा विद्यार्थी मेळाव्याला आज अमाप प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांनी सरकारच्या प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजीकरणाला जोरदार विरोध केला व मातृभाषा रक्षणासाठी उग्र आंदोलन करण्याची शपथ घेतली.
पुढे बोलताना श्री. वाघ यांनी युवा शक्तीने गोव्यातील अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. गेले दोन महिने भारतीय भाषा सुरक्षा मंचने विविध माध्यमातून सरकारचा इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय कसा चुकीचा आहे हे पटवून दिले. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक व युवक तथा विद्यार्थी या सवार्ंबरोबरच राज्यातील भजनी व इतर कलाकारांनी सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालून आपला रोष प्रकट केला आहे. तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यापुढे युवावर्गाच्या प्रखर आंदोलनात दिगंबर कामत सरकारची समिधा पडल्यावाचून राहणार नाही, असे प्रतिपादन केले. इंग्रजी ही जर पोट भरण्याची भाषा आहे तर डुक्करसुद्धा पोट भरतो, असे सांगून भाषेबरोबर इतिहास व संस्कृती असते म्हणून मातृभाषेचे रक्षण महत्त्वाचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
जागतिक सिद्धांत अभ्यासा : पुंडलीक नाईक
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष इंग्रजी माध्यमाचे समर्थन करताना ज्यांना जे हवे ते देऊ! म्हणून सांगतात. भाषा ही वाटण्याची गोष्ट नाही हे शिरोडकर यांनी लक्षात ठेवावे व जगाच्या विरुद्ध चालण्याचा मूर्खपणा करू नये. असे प्रतिपादन पुंडलिक नाईक यांनी यावेळी केले.
मातृभाषा माणसाचा श्‍वास : प्रा. अनिल सामंत
मातृभाषा ही फक्त भाषा असत नाही तर ती माणसाचा श्‍वास असते. तिच्यातून चरित्र व संस्कृती निर्माण होते. गोव्याच्या सरकारने गोवेकरांचा श्‍वासच रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. गोवेकरांचे चरित्र आणि संस्कृती पुसून टाकायला निघालेल्या असंस्कृत लोकांना धडा शिकवण्यासाठी युवा पिढीने संघटितपणे संघर्षास तयार राहावे असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी यावेळी केले.
तिसरा मुक्तिसंग्राम : प्रा. वेलींगकर
देशाचा व गोवा मुक्तीचा लढा हा पहिला मुक्तिसंग्राम, इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी हा दुसरा मुक्तिसंग्राम व कॉंगेसच्याच सरकारने लादलेले भाषामाध्यम हा तिसरा मुक्तिसंग्राम आहे. ज्या तरुणांना पहिल्या दोन मुक्तिसंग्रामात भाग घेता आला नाही, त्यांना दिगंबर कामत सरकारने या तिसर्‍या मुक्तिसंग्रामात भाग घेण्याचे सौभाग्य प्राप्त करून दिले आहे. त्याचा फायदा युवापिढीने घेऊन कामत सरकारला सळो की पळो करून सोडावे व भाषाप्रेमींच्या विजयाचे सैनिक बनावे असे आवाहन प्रा. सुभाष वेलींगकर यांनी यावेळी केले.
युवा शक्तीचे सामर्थ्य दाखवा : काकोडकर
सरकार बहिरे बनले आहे, त्यांना भाषाप्रेमींचा आवाज ऐकू येत नाही. त्या सरकारला आता युवा पिढीने आपल्या शक्तीचे सामर्थ्य दाखवून द्यावे. हेतू साध्य होईपर्यंत तीव्र संघर्ष करण्याची शपथ घ्यावी असे आवाहन शशिकला काकोडकर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
युवा मंचचे निमंत्रक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रनिवेदन वल्लभ केळकर यांनी केले.

पालिकेतील सदस्य नियुक्तीवरून बाबूश-पारेख यांच्यात संघर्ष

पणजी, दि.२२ (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीत ताळगाव मतदारसंघातून आपल्या पत्नीला कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आमदार व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महापालिका निवडणुकीत वैर पत्करलेल्या उदय मडकईकर यांच्याशी मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी लीना मडकईकर यांना महापालिकेच्या नियुक्त सदस्य म्हणून घेण्याचा डाव त्यांनी आखला आहे. मात्र यामुळे पणजीचे महापौर यतीन पारेख नाराज झाले आहेत. एक नियुक्त सदस्य निवडलेला असताना आणखी चार सदस्य नेमणे शक्य नाही, असे चारच दिवसांपूर्वी श्री. पारेख यांनी जाहीर केले होते. मात्र जबरदस्त दबावतंत्र वापरून बाबूश यांनी पारेख यांना आपले म्हणणे बदलण्यास भाग पाडले आहे. महापौर पारेख यांनी जरी बाबूश यांच्या म्हणण्याला सध्या मान्यता दिली असली तरी बाबूश आणि पारेख यांच्यातील संघर्ष यानिमित्ताने उघड झाला आहे.
शिक्षणमंत्री मोन्सेरात हे निवडणुकांवर डोळा ठेवून आपली धोरणे बदलण्यात तरबेज आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवताना आपल्या पत्नीला कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून बाबूश यांनी महापालिका निवडणुकीत वैर पत्करलेल्या व बाबूश यांनी खास प्रयत्न करून पाडाव केलेल्या उदय मडकईकर यांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने याचा वचपा काढण्यासाठी ताळगावातूनच बाबूश किंवा त्यांच्या पत्नी जेनिेफर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी मडकईकर करत आहेत. त्यामुळे मोन्सेरात यांनी मडकईकरांशी जवळीक साधत त्यांना अपक्ष म्हणून लढण्यापासून परावृत्त करण्याची नीती यांनी आखली आहे. त्यासाठी लिना मडकईकर यांना पणजी महापालिकेच्या नियुक्त नगरसेविका म्हणून घेण्याची तयारी बाबूश यांनी केली आहे. या योजनेनुसार महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या कट्टर समर्थकांना नियुक्त नगरसेवक म्हणून महापालिकेवर घेण्याचे बाबूशनी ठरवले आहे. या चार सदस्यात लीना उदय मडकईकर यांचे नाव आहे.
चार सदस्यांचा विचार आहे : पारेख
दरम्यान, महापौर यतीन पारेख यांनी एका सदस्याच्या निवडीचा आपला विचार बदलला असून ‘चार नियुक्त सदस्य निवडण्यासाठी सरकारकडे चार नावे पाठवली जातील’ व सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर चार नियुक्त नगरसेवक निवडले जातील अशी माहिती महापौर यतीन पारेख यांनी दिली आहे. मात्र या विषयावरून शिक्षणमंत्री व महापौर यांच्यात बराच वाद झाल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
चार सदस्य नियुक्तीस विरोध : वैदेही नाईक
बाबूश मोन्सेरात हे आपल्या पराभूत साथीदारांना मागील दाराने महापालिकेत बसवण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करत आहेत. यापूर्वी पेट्रासिया पिंटो यांना नियुक्त सदस्य म्हणून घेतलेले असताना आणखी चार सदस्य घेण्यास आपल्या गटाचा विरोध आहे. आपल्या गटाचे मिनीनो डिक्रुझ यांना नियुक्त सदस्य करावे असा आग्रह आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी गटनेत्या वैदेही नाईक यांनी दिली आहे.

शांताराम नाईक पुन्हा राज्यसभेवर

सत्तारूढ आघाडीला दोन मतांचा फटका
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार शांताराम नाईक यांनी आज विरोधी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार दामोदर नाईक यांच्यावर २४ विरुद्ध १४ मतांनी विजय मिळवला. आघाडीतील आमदारांची संख्या २६ असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिकी पाशेको हे मतदानासाठी फिरकलेच नाहीत तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचे मत बाद ठरवण्यात आले. एकीकडे भाजपचे सर्व १४ आमदार एकसंध राहिले असताना आघाडीतील दोन मते कमी झाल्याने कॉंग्रेसच्या विजयावर विरजणच पडले आहे.
आज पर्वरी विधानसभा संकुलात राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मतदान झाले. मुख्य निवडणूक अधिकारी गोणेश कोयू हे निवडणूक निरीक्षक म्हणून हजर होते. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली असता दुपारपर्यंत ३९ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिकी पाशेको यांनी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. खासदार शांताराम नाईक यांनी राज्यसभेत फक्त भाषणबाजी केली व आपल्या मतदारसंघासाठी काहीच केले नाही, असा ठपका त्यांनी ठेवला. भाषा माध्यमप्रश्‍नी पालकांना दिलेल्या अधिकाराविरोधात भाजप असल्याने भाजपला मत देणार नाही तसेच मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सांगण्यावरूनच आपला छळ सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाजपचे उमेदवार आमदार दामोदर नाईक यांनी निवडणुकीपूर्वी आघाडीतील काही आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे वक्तव्य केल्याने शांताराम नाईक यांची झोप उडाली होती. कॉंग्रेस श्रेष्ठींनाही आघाडीतील वातावरणावर विश्‍वास नव्हता व म्हणूनच या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी जगमितसिंग ब्रार व राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांना पाचारण करण्यात आले होते. जगमितसिंग ब्रार यांनी हजेरी लावूनही कॉंग्रेस पक्षातील एक मत बाद ठरल्याने पक्षाची बरीच मानहानी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाद झालेले मत ऍड. दयानंद नार्वेकर यांचे होते. मतपत्रिकेवर कशा पद्धतीची निशाणी नोंदवावी याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने खूण करण्यात आली व त्यामुळेच हे मत बाद ठरले. दरम्यान, ऍड.दयानंद नार्वेकर हे विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून नकळत चूक घडणे शक्य नाही,अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस गोटातून देण्यात आली. ऍड. नार्वेकर यांनी आपले मत बाद ठरवून उघडपणे श्रेष्ठींना आपल्या बंडखोरीचे संकेत दिल्याचेही बोलते जाते.
भाजपचे आमदार एकसंध
भाजपचे काही आमदार कॉंग्रेस पक्षाच्या गळाला लागले आहेत, अशा अफवा गेले काही दिवस राजकीय पटलावर पसरवण्यात आल्या होत्या. आज राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने या अफवांना कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या सर्व १४ आमदारांनी एकसंधपणे दामोदर नाईक यांना मतदान करून आपली एकजूट सिद्ध केली.
अनिल साळगावकरांची हजेरी
विधानसभा अधिवेशनावेळी बहुतांशवेळी गैरहजर राहणारे अपक्ष आमदार अनिल साळगावकर यांनी राज्यसभा मतदानासाठी जातीने हजेरी लावली. याठिकाणी त्यांचे स्वागत खासदार शांताराम नाईक यांनी केले. अनिल साळगावकर हे खाण उद्योजक आहेत. या उद्योजकांचा वारंवार संबंध केंद्रातील विविध मंत्रालयांशी येतो व त्यामुळेच त्यांनी या मतदानात सहभागी होणेच उचित मानले
आता जनतेनेच निकाल लावावा
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडे आवश्यक आमदारसंख्या नव्हती परंतु कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला बिनविरोध ही जागा मिळू नये यासाठीच उमेदवारी दाखल केली होती. राज्यात विविध विषयांवरून जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे. आघाडीतील अनेक नेते उघडपणे जनतेच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्याच सरकारला दोष देत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी आपला रोष व नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली होती. पक्षातर्फे जारी करण्यात आलेला व्हीप व पक्षाची बांधीलकी जपून कॉंग्रेस आमदारांनी शांताराम नाईक यांना मतदान केले. म.गो पक्षाने सुरुवातीला शांताराम नाईक यांना विरोध दर्शवला होता, पण नेहमीच्या सवयीप्रमाणे अखेर कोलांटी मारून कॉंग्रेसच्या बाजूने राहणेच पसंत केले. म.गो आमदारांचा खरा चेहरा आता लोकांना कळून चुकला आहे, असे दामू नाईक म्हणाले. आता यापुढे या सरकारला जनतेनेच धडा शिकवावा लागेल, असेही दामू म्हणाले.

वालंका जिंकली तर सामूहिक राजीनामे?

खवळलेल्या युवक कॉंग्रेस सदस्यांचा विचार
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत राज्यातील मंत्री व आमदारांनी उघडपणे चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव हिचा प्रचार ‘सर्वशक्तीनिशी’ सुरू करून या निवडणुकीतील पारदर्शकतेचा बोजवारा उडवला आहे. साहजिकच वालंकाची अध्यक्षपदी निवडीची घोषणा झाल्यानंतर लगेच अनेक युवक सदस्यांनी संघटनेला रामराम ठोकण्याची तयारी आरंभल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सरकार पक्षातील नेत्यांनी जणू ‘हायजॅक’ केल्या आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीच बैठक घेऊन वालंकाच्या अध्यक्ष म्हणून उमेदवारीस पाठिंबा जाहीर केल्याने रिंगणातील अन्य उमेदवारांत संतापाची लाट पसरली आहे. उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष जितेश कामत यांनी या असंतोषाची माहिती राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचवण्याचे धाडस केल्याने संघटनेत त्यांचे कौतुक सुरू आहे.
दरम्यान, संघटनेच्या निवडणूक आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वालंका व कामत यांना नोटिसा पाठवून मतदान २६ व २७ जुलै रोजी ठेवले आहे. या नोटिसा म्हणजे केवळ उपचार असून वालंकाच्या निवडीला युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेतेही अनुकूल असल्याचे वृत्त फैलावले आहे.
चौदा उमेदवार रिंगणात
या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांत अदिल अहमद तिनवाले,गौरी सुभाष शिरोडकर,गौतम संतोष भगत, गोकुळदास महादेव सावंत, जितेश कामत, मुल्ला उरफान, नेहा ज्ञानेश्‍वर खोर्जुवेकर,प्रतिमा कुतीन्हो, सुमंगल लक्ष्मण गांवस, सुनील सुभाष नाईक,उबाल्डीनो डायस,वालंका आलेमाव व झेवियर अल्वीटो फिएल्हो यांचा समावेश आहे.
बाबू आजगावकरांचे ‘सासष्टीप्रेम’
पेडणे तालुक्यातून सुमंगल लक्ष्मण गावस या युवतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाही पेडण्याचे पालकमंत्री बाबू आजगावकर यांनी वालंकाला पाठिंबा देण्याचे आवाहन पेडणेतील युवक सदस्यांना केले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. बाबू यांनी पेडणे तालुक्यातील युवक कॉंग्रेस सदस्यांची बैठक येथील एका हॉटेलात बोलावून त्यांनी थेट वालंकाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. बाबू मूळ मडगावचे. ते धारगळ मतदारसंघातून निवडून येत असले तरी त्यांचे ‘सासष्टीप्रेम’ उफाळून आले आहे. पेडण्यातील युवक कॉंग्रेस सदस्यांना पाठिंबा देण्याचे सोडून वालंकाला पाठिंबा देण्याचे बाबू यांनी केलेले आवाहन या भागांतील अनेकांना रुचलेले नाही. बाबूंना वालंकाची एवढीच चिंता असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना सासष्टीची वाट दाखवावी लागेल, असा टोला या युवा नेत्यांनी हाणला आहे.
सामूहिक राजीनामे देणार
वालंका आलेमाव हिची निवड झाली तर अनेक युवक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा ठाम निर्धार केल्याची वदंता आहे. शिवाय या संघटनेवरही घराणेशाहीचा ठपका बसेल. त्यामुळे अन्य युवकांना संघटनेत सामील होण्याची विनंती करण्याचा कोणताच अधिकार आम्हाला राहणार नाही, अशी खंत एका युवक नेत्याने बोलून दाखवली.

नव्या कॅसिनोचे उद्घाटन थाटात?

सूचना मिळूनही गृहखात्याचे दुर्लक्ष
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): मांडवी नदीतील एका जुन्या कॅसिनोचा ताबा ‘अंडरवर्ल्ड’ जगताशी संबंधित असलेल्या लोकांकडे जाण्याची कल्पना पोलिस गुप्तचर विभागाने चार महिन्यांपूर्वीच गृहखात्याला दिली होती. गृहखाते मात्र या माहितीवर केवळ बसून राहिले व आज प्रत्यक्ष या नव्या कॅसिनोचे थाटात उद्घाटन झाल्याचीही खबर प्राप्त झाली आहे.
गोव्यातील कॅसिनोंचा ताबा आता ‘अंडरवर्ल्ड’शी संबंधित लोकांच्या हाती जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. ‘जुगार’ व्यवसायात प्रसिद्ध असलेला व मुंबई पोलिसांना चकवा देऊन वेळोवेळी पसार होणारा हुमायूं चांदीवाला याचा कॅसिनो ‘प्राईम’शी संबंध असल्याच्या वार्तेमुळे पोलिस खातेही खडबडून जागे झाले आहे. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासंबंधीच्या जाहिराती गेल्या काही काळापासून वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या. पोलिस गुप्तचर यंत्रणांनी याबाबत गृहखात्याला गेल्या चार महिन्यांपूर्वीच सतर्क केले होते पण त्याबाबत विशेष दखल घेतली नसल्याचेही कळते.
वदेशी गुंतवणुकीचा संशय
दरम्यान, गोव्यातील या कॅसिनो व्यवहारांत मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुकीची शक्यता वर्तवून केंद्रातील सक्तवसुली संचालनालय (इडी) यांनी चौकशी चालवल्याची खबर आहे. गोव्यातील नव्यानेच सुरू होणार्‍या कॅसिनो ‘प्राईम’ हादेखील ‘इडी’च्या रडारवर असल्याची खबर असून त्याची चौकशी सुरू असल्याचे कळते. दरम्यान, प्रत्यक्ष कॅसिनोंसाठी गृहखात्याकडून परवाना मिळवल्यानंतर हा व्यवसाय इतरांना चालवण्यासाठी देताना गृहमंत्रालयाची मान्यता घेणे बंधनकारक आहे काय, असे विचारले असता गृहखातेही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचेच जाणवले. एखाद्या भल्या व्यक्तीने आपल्या नावावर कॅसिनो परवाना मिळवला व तो गुन्हेगारी व अंडरवर्ल्ड जगताशी संबंधित व्यक्तीला चालवण्यास दिला तर त्याबाबत गृहखाते काहीच कारवाई करणार नाही का, असा सवालही यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘एफआयआर’ नोंदवण्याचे आदेश

पणजी, दि.२२ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणांत ७८८ कोटी रुपये व राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात येणार्‍या आरोग्य विमा योजनेअंतर्गत ९२० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोग्य संचालिका राजनंदा देसाई, ‘पीपीपी’ विभागाचे संचालक अनुपम किशोर, आरोग्य सचिव राजीव वर्मा तसेच ‘रेडियंट हेल्थलाईफ केअर कंपनी’ व ‘आयसीआयसीआय लॅबर्ट कंपनीविरोधात ‘एफआयआर’ नोंद करण्याचे आदेश म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिले आहेत.
भ्रष्टाचाराविरोधात माहिती हक्क कायद्याचा आधार घेऊन व्यापक आंदोलन छेडलेले काशिनाथ शेटये व इतरांनी यासंबंधी म्हापसा पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली होती. आरोग्य खात्यातर्फे करण्यात आलेला हा महाघोटाळा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’ प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी काशीनाथ शेटये यांच्या तक्रारीवर प्रथम चौकशी अहवाल (एफआयआर) नोंदवण्याचे आदेश दिल्याने सरकारला जबर दणका बसला आहे. म्हापसा पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास विलंब लावल्याने काशिनाथ शेटये यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे धाव घेतली होती. आज यासंबंधीची सुनावणी झाली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुर्गा मडकईकर यांनी चोवीस तासांत संबंधितांवर ‘एफआयआर’ नोंदवून त्याची प्रत चोवीस तासांत तक्रारदाराला देण्याचे आदेश जारी केले.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याकडून विविध भागांत कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावे भरवून आरोग्य खात्यात क्रांती केल्याचा दावा केला जात असतानाच जिल्हा इस्पितळ व आरोग्य विमा योजनेच्या घोटाळ्याप्रकरणी सरकारी अधिकार्‍यांवर ‘एफआयआर’ नोंद करण्याचे आदेश दिल्याने त्यांची बरीच नाचक्की झाल्याचे बोलले जाते.

जिल्हा इस्पितळाबाबत सोमवारी म्हापशात धरणे

आरोग्यमंत्री खोटारडे : डिसोझा
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून तयार असलेले जिल्हा इस्पितळ आज, उद्या सुरू करणार असे तगादे लावत आणि न्यायालयाच्याही तोंडाला पाने पुसत असलेले आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे खोटारडेपणा करत असून खोटारडेपणाने वागतही आहेत असा आरोप म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. जिल्हा इस्पितळ सुरू करण्यास विलंब लावत असल्यामुळे सोमवार २५ जुलै रोजी भाजपतर्फे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत धरणे धरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार डिसोझा यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, साळगावचे आमदार दिलीप परुळेकर, माजी आमदार सदानंद तानावडे, भाजप मंडळ अध्यक्ष राजसिंग राणे उपस्थित होते.
जुन्या आझिलोची अवस्था बिकट झाली आहे. मोडकळीस आलेल्या या इस्पितळात रुग्णांना आणि कर्मचार्‍यांना ठेवण्यात आलेले आहे. यावेळी जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री आरोग्य संचालिका की कॉंग्रेस पक्ष हे स्पष्टपणे सांगावे अशी ताकीदच डिसोझा यांनी यावेळी दिली. पेडे येथे नव्याने बांधण्यात आलेली इमारत असताना जुन्या आझिलोतील रुग्णांना गोमेकॉत हलविण्यात येत आहे. नवीन जिल्हा इस्पितळात सुविधा नाहीत. आझिलोतील रुग्णांना जर गोमेकॉत पाठवायचे असेल तर आझिलोतील सर्वच रुग्णांना बांबोळीला का नेण्यात येत नाही असा सवाल करत तसे केले असते तर सर्वांचीच काळजी मिटली असती असा टोला श्री. डिसोझा यांनी हाणला.
आझिलोबाबत रुग्णांच्या जीविताशी आरोग्यमंत्र्यांनी खेळ मांडलेला आहे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहायचा आपला हट्ट जर त्यांनी सोडला नाही तर जनताच त्यांना धडा शिकवेल असा इशारा श्री. डिसोझा यांनी दिला. बांधकाम खात्याने जुने आझिलो इस्पितळ खाली करण्याचा आदेश दिला होता. तेव्हाच इस्पितळ खाली करून पेडे येथे स्थलांतरित केले पाहिजे होते. पण खोटारड्या आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांना त्रास देण्यासाठीच त्यांना अद्याप जुन्या आझिलोत ठेवले आहे. असा आरोप श्री. डिसोझा यांनी केला.
यावेळी बोलताना श्री. मांद्रेकर म्हणाले की, खरेतर आरोग्यमंत्र्यांवर कुणाचाच विश्‍वास नाही. ते आज एक व उद्या वेगळेच बोलतात. जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचे आश्‍वासन त्यांनी विधानसभेत दिले होते. आजही ते इस्पितळ सुरू करण्याचे आश्‍वासन देतात आणि आपल्या फायद्यासाठी पीपीपी तत्त्वावर देण्यासाठी धावतात. मुख्यमंत्रीही आश्‍वासने देतात पण पाळत नाहीत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तयार झालेले इस्पितळ अद्याप सुरू होत नाही. याचा जाब येत्या निवडणुकीत आरोग्यमंत्र्यांना द्यावा लागेल असा इशारा श्री. मांद्रेकर यांनी दिला.
सोमवारी आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमात शिवोली, ताळगाव, थिवी, म्हापसा या मतदारसंघातील आमदार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. डिसोझा यांनी शेवटी केले.

कोकण रेल्वेला पुन्हा ङ्गटका

सावंतवाडी, दि. २२ (प्रतिनिधी): मालवणजवळच्या तळगाव येथे दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. गेल्या आठवड्यात ठप्प झालेली वाहतूक काल गुरुवारीच सुरळीत करण्यात आली होती. मात्र, आज दरड कोसळल्याने ती पुन्हा ठप्प झाली आहे. या घटनांमुळे पावसाळ्यातील कोकण रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून सावंतवाडीमार्गे मुंबईकडे जाणार्‍या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत रेल्वेमार्ग सुरळीत होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, तळगाव येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मदत व बचाव पथकाचे सदस्य पोहोचले असून, ढिगारे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरड कोसळण्याच्या घटनेमुळे अनेक रेल्वे गाड्या विविध मार्गांवर खोळंबल्या असून, यामुळे शेकडो प्रवासीही अडकून पडले आहेत. या प्रवाशांंना इच्छित स्थळी नेण्यासाठी रेल्वे प्रशासन बसची व्यवस्था करीत आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Friday, 22 July 2011

कॅसिनो अंडरवर्ल्डकडे

‘वॉटेड’ हुमायूं चांदीवालाच्या प्राईम कॅसिनोचे आज उद्घाटन


पणजी, दि. २१(प्रतिनिधी)
ड्रग्स माफियांच्या खुल्या वावरामुळे आधीच गुन्हेगारी जगतात बदनाम होत असलेला गोवा ‘अंडरवर्ल्ड’ माफियांचे प्रमुख केंद्र तर बनणार नाही ना, अशी भीती आता निर्माण झाली आहे. मांडवी नदीत ठाण मांडून राहिलेल्या कॅसिनोंची सूत्रे आता हळूहळू ‘अंडरवर्ल्ड’वाल्यांच्या हाती जाऊ लागली आहेत. मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला हुमायूं चांदीवाला याने आपल्या ‘प्राईम’ कॅसिनोचे उद्घाटन उद्या २२ रोजी मोठ्या दिमाखात आयोजित करून गोव्यात आपला प्रवेश केल्याची खात्रीलायक खबर प्राप्त झाली आहे.
मुंबई-अंधेरी येथे एका इमारतीत एक हजार चौरस फुटाच्या जागेत एक अलिशान जुगारी अड्डा हुमायूं चांदीवाला याने सुरू केला होता. प्रती कॅसिनो रॉयल म्हणूनही या क्लबची ख्याती पसरली होती. मुंबई पोलिसांनी या क्लबवर छापा टाकून ५.९४ लाख रुपये जप्त केले होते व तब्बल ६१ लोकांना पकडले होते. या छाप्यानंतर या क्लबचा मालक कोट्यधीश हुमायूं चांदीवाला मुंबई पोलिसांच्या वॉटेड यादीवर नोंद आहे. मुंबई विलेपार्ले येथे दीपा बारची डान्सर तरन्नूम खान हिच्या बंगल्यावर आयकर खात्याने छापा टाकून कोट्यवधींची रोकड जप्त करण्याचे प्रकरणही बरेच गाजले होते. हुमायूं चांदीवाला हा तरन्नूम खान हिच्या अत्यंत जवळचा व दीपा बारचा पार्टनर असल्याचेही नंतर उघड झाले होते.
मांडवी नदीतील एक कॅसिनो हुमायूं चांदीवाला याने चालवायला घेतल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या कॅसिनोचे नामांतर ‘प्राईम’ असे करण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्या २२ रोजी आयोजित केले आहे. या उद्घाटनाला मुंबई व इतर ठिकाणच्या प्रख्यात गॅम्बलरना आमंत्रित करण्यात आल्याचेही कळते. मुख्य म्हणजे मांडवी नदीतील या कॅसिनोचा व्यवसाय हुमायूं चांदीवाला याच्याकडे देण्यासंबंधी कोणताच पत्रव्यवहार किंवा ना हरकत दाखला गृहखात्याकडून मिळवण्यात आलेला नाही. गृहखात्याच्या अवर सचिवांना विचारले असता त्यांनी यासंबंधी कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. या कॅसिनोच्या उद्घाटनाबाबत प्रसिद्ध वृत्तपत्रांतून जाहिरातबाजी सुरू असली तरी त्याची दखल गृहखात्याने अथवा पोलिसांनीही घेतल्याचे मात्र अजिबात दिसत नाही. मुख्य म्हणजे हुमायूं चांदीवाला याने चालवायला घेतलेला कॅसिनो मूळ एकाच्या नावे, जेटी दुसर्‍याच्या नावे, जहाज तिसर्‍याच्या नावे व परवाना भलत्याच्याच नावे, अशी विचित्र परिस्थिती असल्याचेही कळते. गृहखात्याकडून परवाना दिल्यानंतर प्रत्यक्ष या कॅसिनोत काय चालते याकडे कुणाचेही लक्ष नसल्यानेच त्यांच्यासाठी रान मोकळे बनल्याचेही बोलले जाते.
हुमायूं याने मुंबई पोलिसांना चकवा देत अनेक ठिकाणी आपले अड्डे चालवले होते. न्यायालयातून १३ पत्त्यांची ‘रमी’ सुरू करण्याची परवानगी मिळवणारा तो हाच हुमायूं आहे, अशीही खबर मिळाली आहे.

दाऊद इब्राहिमचे लागेबांधे...
२००५ साली मॅचफिंक्सींगच्या प्रकरणात तरन्नूम खान आणि हुमायूं यांचे संबंध असल्याचे उघडकीस आले होते. तरन्नूमचे अंडरवर्ल्डशी संबंधाचे धागेदोरेही यावेळीच उघड होऊन प्रत्यक्ष डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी थेट संबंध असल्याचीही चर्चा होती. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीथरन आणि बॉलिवूड अभिनेते आदित्य पांचोली यांची दीपा बारमध्येच तरन्नूमशी ओळख झाल्याचे पोलिस तपासास उघड झाले होते. दरम्यान, गोव्यातील सदर कॅसिनोचे नामांतर करून त्याचे नाव प्राईम कॅसिनो असे ठेवण्यात आले खरे पण त्यासंबंधीची कोणतीच माहिती गृह खात्याला देण्यात आलेली नाही. हुमायूं याने कॅसिनोच्या निमित्ताने गोव्यात केलेला प्रवेश गृहखाते व गोवा पोलिसांची झोप उडवणाराच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तिलारी धरणग्रस्तांना एकरकमी पैसे द्या

पणजीतील बैठकीत सुनील तटकरे आग्रही
६३१ प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देणे अशक्य

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
तिलारी धरणाचे ७२.५० टक्के पाणी गोव्याला मिळणार आहे व गोवा आणि महाराष्ट्र राज्यात झालेल्या करारानुसार गोवा सरकारने सुमारे ६३१ तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देणे गरजेचे आहे. या नोकर्‍या मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र सरकारच्यावतीने आपण आग्रही असून जर नोकर्‍या देणे शक्य नसेल तर त्यांना एकरकमी पैसे द्या, अशी योजना आपण गोवा सरकारकडे मांडणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ही योजना महाराष्ट्र सरकार गोवा सरकारसमोर ठेवणार आहे. त्यावर गोवा सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. जर ही एकरकमी योजना मान्य नसेल तर पंधरा दिवसांत सर्वांना नोकर्‍या द्याव्यात अशी मागणी करणार आहे. ही कार्यवाही पंधरा दिवसाच्या आत व्हायला हवी असा आमचा आग्रह असेल अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आज पर्वरी येथे दिली.
पर्वरी येथील सचिवालयाच्या कक्षात आयोजित तिसर्‍या ‘तिलारी आंतरराज्य नियामक मंडळाच्या’ बैठकीनंतर श्री. तटकरे बोलत होते. या प्रसंगी गोव्याचे जलसिंचन मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्राचे जलसंपदा सचिव ई. बी. पाटील, गोवा सरकारचे जलसिंचन सचिव विजयन, सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, समितीचे अन्य सदस्य व दोन्ही राज्यांच्या जलसिंचन खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
श्री. रॉड्रिगीस यांनी एक रकमी योजना मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आपण काम करणार असल्याचे सांगून जरी तीन बैठका झाल्या असल्यातरी चर्चा चालूच होती असे सांगितले.
या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. तटकरे म्हणाले की, गोव्याने अजून या प्रकल्पासाठीचे ३० ते ४० कोटी रुपये देणे बाकी असून हा प्रकल्प २०१३ पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या १५ कोटी खर्चून राऊंड रस्ता बांधणे सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तब्बल दहा वर्षानंतर बैठक
तिलारी प्रकल्प करार १९९० साली चर्चिल आलेमाव मुख्यमंत्री असताना झाला होता. त्या करारात गोव्याने ७० टक्के प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देण्याचे मान्य करून तसा करार केला होता. मात्र त्यानंतर गेली एकवीस वर्षे प्रकल्पग्रस्तांना गोव्याने वार्‍यावर सोडले. त्यानंतर फक्त दोन बैठका झाल्या. या दरम्यान तिलारी प्रकल्पग्रस्तांनी पणजीत येऊन आझाद मैदानावर धरणे धरून गोवा सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. तरीही काहीही हालचाल न झाल्याने त्रस्त तिलारी प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या कालव्यात जलसमाधी घेण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे गोवा सरकार जागे झाले नाही, मात्र महाराष्ट्र सरकार जागे झाले व तब्बल दहा वर्षांनी आज बैठक बोलावण्यात आली. तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र भावनांची गोव्याच्या सरकारला जाणीव व्हावी यासाठी ही बैठक गोव्यात आयोजित केल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.

‘एकरकमी’ करार मान्य ः धरणग्रस्त
या बैठकीनंतर तिलारी प्रकल्प अन्यायग्रस्त समितीचे सचिव संजय नाईक यांना या ‘एकरकमी’ कराराबाबत विचारले असता, त्यांनी गेली २१ वर्षे गोवा सरकारने आम्हांला नोकर्‍या दिलेल्या नाहीत. याचाच अर्थ त्यांना आम्हांला नोकर्‍या देणे जमणार नाही असा होतो. त्यामुळे एकरकमी करार मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.