Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 22 February 2010

पुणे स्फोट : बळींची संख्या १५

पुणे, दि. २१ : १३ फेब्रुवारी रोजी पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींपैकी आणखी दोन जण दगावल्याने यातील बळीसंख्या १५ वर पोहोेचली आहे.
२४ वर्षी विकास तुलसियानी आणि २३ वर्षीय राजीव अग्रवाल हे दोघे जखमी अवस्थेत जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. तब्बल आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या दोघांची प्राणज्योत मालवली. त्यापैकी विकास हा पुण्याचाच होता. आज सकाळी जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. राजीव हा काल रात्री उशिरा दगावला.
राजीव अग्रवाल हा कोलकात्याचा रहिवासी होता. तो पुण्यातील सिंबॉयसिस महाविद्यालयात विधी शाखेत शिकत होता. स्फोट झाला तेव्हा राजीव हा त्याच्या चार मित्रांसमवेत जर्मन बेकरीत होता. स्फोटात सर्वजण जखमी झाले होते. त्यातील अभिषेक सक्सेनाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अन्य मित्रांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
राजीवला कार्पोरेट लॉमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम होती, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटात ९ जण जागीच मृत्युमुखी पडले, ५ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अद्याप जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या जखमा खोलवर असल्याने प्रकृती सुधारण्यास काही अवधी लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

तेलंगण आंदोलन चिघळणार

हैदराबाद, दि. २१ : वेगळ्या तेलंगणाच्या मागणीसाठी शनिवारी श्रीपुरम् यादय्या या युवकाने आत्मदहन केले होते. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हे आंदोलन पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
उस्मानिया विद्यापीठ म्हणजे वेगळ्या तेलंगणावाद्यांचा बालेकिल्लाच बनला आहे. तेथे शेजारच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील नागाराम गावातील हा विद्यार्थी वेगळ्या तेेेलंगणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला होता. आंदोलनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.
या प्रकाराने तेथील पोलिसही क्षणभर गोंधळून गेले. नंतर तातडीने हालचाल करून त्यांनी आग विझवली. प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि अपोेेलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या बॅगमध्ये काही प्रमाणपत्रे आणि मृत्यूचे कारण सांगणारे पत्र सापडले आहे.
त्या पत्रात त्याने म्हटले आहे की, तेलंगणाच्या प्रस्तावाला सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून माझ्यासारख्यांना नोकऱ्या मिळत नाही. वेगळ्या तेलंगणात नव्या नोकऱ्या निर्माण होतील म्हणून या आंदोलनात मी माझ्या प्राणाची आहुती देत आहे. तेलंगणा वेगळे होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवा, असेही त्याने तेलुगूमध्ये लिहून ठेवले आहे.
आज उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

Sunday, 21 February 2010

रोहिदासच्या कुटुंबाला त्वरित अर्थसाह्य द्यावे

विदेशींची "दादागिरी'खपवून घेणार नाही
आज मोरजीची ग्रामसभा "गाजणार'

पेडणे, दि. २० (प्रतिनिधी): मोरजीत विदेशी नागरिकांच्या वाढत्या दादागिरीचा बळी ठरलेल्या मरडीवाडा येथील रोहिदास शेटगावकर या स्थानिक टॅक्सीचालकाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर भीषण संकट ओढवले आहे. रोहिदास हाच या कुटुंबातील कर्ता पुरुष होता, त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने ताबडतोब लक्ष घालावे व रोहिदासच्या कुटुंबाला अर्थसाह्य मिळवून द्यावे, अशी जोरदार मागणी "मोरजीचो एकवट' आणि मोरजी पंचायत यांनी संयुक्तरीत्या बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.
आज मोरजी विकास मंच कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच रत्नाकर शेटगावकर, मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ आबा शेटगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी मोरजीचे फादर मिनिनो वॉलीस, "मोरजीचो एकवट' संघटनेचे उपाध्यक्ष शाणू दाभोलकर, सुधीर कान्नाईक, खनिजदार लक्ष्मण शेटगावकर, सहखजिनदार बाबू ऊर्फ मच्छिंद्रनाथ शेटगावकर, सचिव मेर्लिन फर्नांडिस, भक्तदास बागकर, उल्हास मोरजे आदी हजर होते.
उद्या २१ रोजी मोरजी पंचायतीची ग्रामसभा होणार असून त्यात रोहिदास शेटगावकर याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबर मोरजी गावातील विदेशी लोकांच्या वाढत्या उपद्रवांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
विदेशींनी गोव्यात पर्यटक म्हणून यावे व पर्यटक म्हणूनच राहावे. इथे वास्तव्य करून पर्यटन व्यवसायात उतरलेल्या विदेशी नागरिकांनी आता स्थानिकांना धमकावण्याचे व त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार सुरू केल्याने हा विषय सर्वत्र नेला जाईल, अशी माहिती वसंत शेटगावकर यांनी दिली. विदेशी लोकांवर हल्ला किंवा त्यांच्याबाबतीत काही घडल्यास त्याची सर्वत्र प्रसिद्धी करून गोव्याला बदनाम केले जाते; पण विदेशींकडून जेव्हा दंगामस्ती केली जाते किंवा स्थानिकांवर हल्ला करण्यात येतो तेव्हा त्यास व्यापक प्रसिद्धी दिली जात नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. मयत रोहिदास शेटगांवकर याला तीन मुलगे आहेत. सर्वांत छोटा मुलगा अपंग आहे. रोहिदास हाच या कुटुंबाचा आधार होता, त्याच्या अकाली जाण्याने या कुटुंबावर महासंकट कोसळले आहे. मोरजी गावातर्फे रोहिदासच्या कुटुंबाला मदत करण्याचे प्रयत्न होतीलच; पण राज्य सरकारकडूनही त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी उद्या ग्रामसभेत ठराव संमत करण्याचा विचार सुरू आहे,अशी माहितीही देण्यात आली.
राष्ट्रवादीने बाऊ करू नये
राष्ट्रवादीच्या नेत्या तथा मांद्रेच्या माजी आमदार तथा माजीमंत्री संगीता परब व त्यांच्या पक्षपदाधिकाऱ्यांनी रोहीदास शेटगांवकर प्रकरणी सरकारवर केलेली टीका व पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या बदलीची केलेली मागणी ही या प्रकरणाला राजकीय स्वार्थासाठी केलेला वापर असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या नेत्यांना रोहीदास शेटगांवकर याची एवढीच सहानुभूती होती तर त्यांनी तो बांबोळी इथे मृत्यूशी झुंज देत होता, त्यावेळी विचारपूस का केली नाही,असा सवालही उपस्थित करण्यात आला. पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत व त्यांनी या संपूर्ण प्रकरणी स्थानिकांना पूर्ण सहकार्य दिले, असा निर्वाळाही यावेळी देण्यात आला.

आजची ग्रामसभा वादळी ठरणार!

कुळे परिसरात तणाव
कुळे, दि. २० (प्रतिनिधी): लोकांच्या मागणीप्रमाणे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी १९९८ साली दिलेल्या आदेशाची कार्यवाही होईपर्यंत कोणत्याही स्थिती कुळे रेल्वे यार्डमधून खनिज मालाची चढउतार करू दिली जाणार नाही, असा ठाम निर्णय कुळे नागरिक समितीने इतर समित्या, पालक शिक्षण संघ व नागरिकांच्या पाठिंब्याद्वारे घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) या विषयावर होणारी ग्रामसभा अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणेच्या बळावर नागरिकांचा विरोध चिरडून टाकण्याची सर्वतोपरी तयारी सरकारने चालवली असतानाही हे दडपण झुगारून देण्याचा निर्धार कुळे, शिगाव व आसपासच्या जनतेने केला आहे.
हॉस्पेट येथून खनिज माल आणून तो कुळे रेल्वे यार्ड मध्ये चढउतार करण्याचा चंग स्थानिक आपमतलबी ठेकेदारांनी काही पंच सदस्यांना हाताशी धरून बांधला आहे. त्यामुळे कुळे नागरिक समितीने एक पत्रक प्रसिद्ध करून ग्रामस्थांना ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूर्वीप्रमाणे आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.
धूळ व आवाजाचे प्रदूषण व रस्त्यावर पाणी शिंपल्यानंतर होणारा घाण आणि चिखल यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर हैराण झालेल्या ग्रामस्थांनी आपल्या मागणीसाठी १९९८ साली जोरदार आंदोलन छेडले होते. त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून एक आदेश मिळविला होता. जोवर लोकांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या खाण व्यवसायाला परवानगी दिली जाणार नाही असे सदर आदेशात नमूद केले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. लोकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून २००५ साली परत एकदा खाण माल हाताळण्यासाठी तेव्हाच्या सरपंचानी खास ग्रामसभा बोलावली होती; पण लोकांचा विरोध पाहून पंचायत मंडळाने जोपर्यंत रेल्वे यार्ड स्थलांतर व बगलरस्ता होत नाही तोपर्यत भविष्यात या विषयावर ग्रामसभा भरवली जाणार नसल्याचे स्पष्ट करून लोकांना नैसर्गिक न्याय दिल्याचे पत्रकात पुढे म्हटले आहे.
या परिसरात कायद्याचे पालन, पर्यावरण सांभाळून व गावच्या युवावर्गाला रोजगार देणाऱ्या खाण व्यवसायाला आपला विरोध नाही असे नमूद करून कुळे रेल्वे यार्ड स्थलांतरीत होऊ शकतो व याचं जिवंत उदाहरण म्हणून "डुक्करकोंड - काले' येथील यार्डकडे पाहता येईल असे म्हटले आहे.
फक्त इच्छा असण्याची आवश्यकता आहे. पण गेल्या बारा वर्षात असा प्रयत्न झालेला दिसत नाही. पंचायत मंडळ लोकशाहीची कदर करून व लोकांचे हित लक्षात घेऊन पुन्हा एकदा नैसर्गिक न्याय लोकांना बहाल करेल, अशी अपेक्षा नागरिक समितीने पत्रकात शेवटी व्यक्त केली आहे.

बाबूशचा बळी देऊन मंत्रिपद नकोच..!

कामत यांच्या डावपेचांना मडकईकरांचा कोलदांडा
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत फूट घालण्याचे प्रयत्न कामत व त्यांच्या मोजक्याच समर्थकांनी चालविले असून आता पांडुरंग मडकईकर यांना विरोधी गटापासून बाजूला काढण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद त्यांना देण्याचे सूतोवाच कामत गटाकडून केले जात आहे. मात्र, बाबूश यांचे मंत्रिपद काढून आपणास ते दिले जाणार असेल तर ते आपणास मान्य नसल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले आहे.
कामत यांच्याविरोधात आक्रमक बनलेल्या गटाने काहीही झाले तरी नेतृत्वबदल घडवून आणणारच, असा विडा उचलला असल्याने या गटाला कमकुवत करण्यासाठी सध्या कामत गटाकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या आणि युक्त्या लढवल्या जात आहेत. मात्र अशा युक्त्यांना बळी पडणार नाही, असा ठाम निर्धार या गटाने केला आहे.
कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनीच सुरुवातीला कामत यांच्याविरोधात बंडाला सुरुवात केली व त्याचे पर्यवसान सध्याच्या अस्थिरतेत झाले आहे. पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काहीही कारण नसताना काढून घेण्यात आल्याने ते खूपच नाराज झाले आहेत. त्यांना मंत्रिपद देण्याची लालूच वारंवार श्रेष्ठींकडून दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यामुळे त्यांची श्रेष्ठी थट्टा तर करीत नाही ना, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची बनली आहे.
मुख्यमंत्री कामत यांनी आता नव्याने मडकईकर यांना मंत्रिपदाचा प्रस्ताव सादर केला असून शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद काढून त्यांना देण्याचाही घाट घातला आहे. बाबूश यांना शिक्षण खाते दिल्याने सुरुवातीला अनेकांनी सरकारवर टीका केली खरी; पण शिक्षणमंत्री या नात्याने बाबूश यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे जनताही त्यांच्यावर खूष आहे. ते प्रत्यक्षात काम करीत असताना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची कृती पांडुरंग मडकईकर यांना मान्य नाही, अशी नवी माहिती मिळाली आहे.
कामत यांना मंत्रिपदाची जागाच खाली करायची असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातील सपशेल अपयशी ठरलेल्यांची खुर्ची खाली करावी,असा सल्ला श्री.मडकईकर यांनी दिल्याचे समजते. बाबूश यांचे मंत्रिपद काढून मडकईकर यांना बहाल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा बेत ही राजकीय चाल आहे. बंडखोर गटांत मतभेद निर्माण करण्याचाच हा डाव असल्याने हा प्रस्ताव धुडकावून लावण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दरम्यान, काल शिवजयंतीनिमित्त फर्मागुडी येथे झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्री रवी नाईक हे भलतेच आक्रमक बनले होते. त्यांनी आपल्या भाषणांत तर चक्क आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. काल सकाळी नव्यानेच राजकारणात उतरलेल्या काही नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणातील रोख थेट आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सुदिन ढवळीकर यांच्यावर होता, अशी कुजबुज तेथे उपस्थित नागरिकांत लगेच सुरू झाली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आप्रत्यक्षरीत्या राजकारणातील नीतिमत्तेचे चार शब्द सुनावून रवी नाईक यांच्यावर शरसंधान केले असेही सांगितले जाते. एकंदरीत आतापर्यंत छुप्या पद्धतीने एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते आता उघडपणे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कॉंग्रेस आघाडी सरकारातील हेवेदावे अधिक तीव्रपणे जनतेसमोर येऊ लागले आहेत.

तेलंगण पेटले... विद्यार्थ्यांचा हल्लाबोल

हैदराबाद, दि. २० : स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी आज (शनिवारी) आंध्र प्रदेश विधानसभेवर हल्लाबोल केला. संयुक्त संघर्ष समितीच्या विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे जाणारे सर्व रस्ते रोखले असून शहर प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत.
उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात शनिवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी जमून विधानसभेकडे कूच केले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू तिरुपती राव यांच्या कार्यालयावर दगडफेकही केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने शहरभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र तेलंगण साठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

विधानसभेपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणा-या विद्यानगर परिसरात पोलिसांनी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा अडवला. पण तरीही विद्यार्थ्यांची ' जय तेलंगण ' ची घोषणाबाजी आणि वाद्ये वाजवणे सुरूच होते. पोलिसांना न जुमानता विद्यार्थी पुढे येण्यासाठी प्रयत्न करत होते.

पोलिसांनी ही रॅली बेकायदेशीर असल्याचे सांगत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या आंदोलनाला वेसण घालण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद केले. रेल्वेमार्गावर बॉंब पेरण्यात आल्याच्या अफवा पसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. हैदराबाद-वारंगळ मार्गावरील अनेक ट्रेनही थांबवण्यात आल्या. दक्षिण-मध्य रेल्वेनेही हैदराबाद सिकंदराबाद शहरे जोडणा-या अनेक ट्रेन रद्द केल्या.

सरपोतदार यांचे निधन

मुंबई, दि. २० : मुलुखमैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपोतदार यांचे आज (शनिवारी) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेवर शोककळा पसरली आहे.
सकाळपासून त्यांची प्रकृती खालावू लागली, उपचारांना प्रतिसाद देणे कमी-कमी होत गेले आणि दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
बुधवारी सकाळी छातीत दुखू लागल्यानं सरपोतदार यांना "हिंदुजा'च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा दिसली, पण ती तात्पुरतीच ठरली. अनेक जाहीर सभांमध्ये आणि संसद-विधिमंडळात कधीच माघार न घेणारे सरपोतदार मृत्युशी झुंज देण्यात अपयशी ठरले. त्यांच्यावर उद्या, (रविवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार आणि सून शिल्पा सरपोतदार असा परिवार आहे.
शिवसेनेला मध्यमवर्गीय पांढरपेशा शिक्षित वर्गाची संघटना, अशी प्रतिमा देण्यामध्ये मधुकर सरपोतदार यांचा मोठा वाटा होता. स्वतः एका आंतराराष्ट्रीय कंपनीत पर्सनल मॅनेजर असल्यामुळे कामगार कायद्याचे उत्तम ज्ञान त्यांना होता. त्याचाच फायदा शिवसेनेला झाला. विविध कारखान्यांमध्ये शिवसेनेने युनियन स्थापन केल्या. त्यासाठी सरपोतदारांनी अथक परिश्रम घेतले. याशिवाय, रिक्षाचालक संघटनांसारख्या संघटना स्थापन करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. दादर, शिवाजी पार्क, पार्ले, ठाणे, मुलुंड या मध्यमवर्गीय विभागात शिवसेना पोहोचवण्यात सरपोतदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.

मुंबईतल्या खेरवाडी मतदारसंघातून १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सरपोतदार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९६ आणि ९८ मध्ये त्यांनी वायव्य लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले असूनही ते मंत्रिपद मिळवण्यात कमनशिबीच ठरले होते. शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आली, तेव्हा मुंबईतून किती मंत्री करायचे, या गणितात त्यांचं नाव मागे पडलं. रालोआच्या काळात ते खासदार होते, पण त्यावेळीही मंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांचं नाव नव्हतंच.

एक अत्यंत कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक अशी त्यांची ख्याती होती. ९२-९३ च्या दंगलीच्या काळात सरपोतदारांच्या गाडीत शस्त्रं सापडली होती. त्याबद्दल दोषी ठरवून त्यांना एक वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

गेली काही वर्षं ते किडनीच्या विकाराने आजारीच होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून त्यांना दूर जावं लागलं. त्यातच, अतुल आणि शिल्पा सरपोतदार यांनी मनसेत प्रवेश केल्यानं त्यांचं स्थान आणखीच डळमळीत झालं होतं. असं असलं तरी, शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात मधुकर सरपोतदार हे नाव येईलच येईल.

मधुकर सरपोतदार यांच्या निधनाबद्दल शिवसेना नेते आणि अन्य पक्षातल्या नेत्यांनीही दुःख व्यक्त केलंय. एक कट्टर, निष्ठावान शिवसैनिक हरवल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

ब्रह्मेशानंदांचा उद्या 'जन्माष्टमी महोत्सव'

कुंडई, दि. २० : प.पू. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदाय श्रीक्षेत्र तपोभूमी गुरूपाठाचे विद्यमान पीठाधीश्र्वर श्रीमद् सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा "जन्माष्टमी महोत्सव' येत्या २२ रोजी म्हणजेच फाल्गुन शुद्ध अष्टमी तिथीला श्री क्षेत्र तपोभूमी गुरूपीठावर भक्तिभावाने साजरा होणार आहे.
त्यानिमित्त सोमवारी सकाळी १०.३० वा. प. पू. सद्गुरू श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून हरिश मेलवानी- (खाण उद्योजक, गोवा) उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सदरात सद्गुरूंच्या हस्ते अनाथ मुलांना दानधर्म केला जाणार आहे. संध्याकाळी ६.३० वा. तपोभूमीच्या भव्य व्यासपीठावर प्रकट कार्यक्रमात गोमंतक, महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रतिभासंपन्न सेवाभावी कर्तृत्वान देवस्थान पदाधिकारी भक्तांचा महनीय मान्यवरांच्या उपस्थितीत पू. सद्गुरूंच्या हस्ते प्रातिनिधिक गुणगौरव ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. तसेच या महोत्सवाला विशेष सत्कारमूर्ती म्हणून प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी (महासचिव, हिंदूधर्म आचार्य सभा, राजकोट), श्री. किशनलालजी सारडा (संचालक, गुरूगंगेश्वरानंद वेदविद्यालय, नासिक), श्री. रोहित फळगावकर, संशोधक, पुरातन देवस्थान, श्री. सुहान करकल, संचालक, गोवा ३६५ न्यूज चॅनल, मा. श्री. प्रमोद महादेव गावस, देशरक्षक जवान, संत समाज दोडामार्ग, गोवा यांची महनीय उपस्थिती लाभणार आहे. पद्मनाभ संप्रदायाचे संचालित श्री ब्रह्मेशानंद वेद पाठशाळा, हातुर्लीचे गुरूजी श्री. सतीश वर्मा व श्री. ब्रह्मेशानंद वेद पाठशाळेचे गुरूजी श्री. प्रवीण वर्मा यांना ईश्वरी कार्याचे श्रीफळ पू. सद्गुरूंच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर खास उपस्थित राहणार आहेत.
श्रीक्षेत्र तपोभूमी गुरूपीठावर हजारो भाविकांच्या साक्षीने होणाऱ्या या दिव्य गौरव सोहळ्याला देवस्थान प्रमुखांनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या अमृततुल्य आशीर्वादास पात्र व्हावे. उद्या तपोभूमी गुरूपीठावर जन्माष्टमी सोहळ्याला सुमारे दहा हजार भाविकांची उपस्थिती लाभणार आहे. तरी भव्य व्यासपीठ, मंडप आदी तयारी तपोभूमीवर सुरू आहे. सर्व भाविक गुरूबंधूभगिनींनी सोहळ्याला उपस्थित राहून ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन पद्मनाभ संप्रदायाचे सचिव श्री सच्चिदानंद नाईक यांनी केले आहे.

मोगूबाई संगीत संमेलनाचे मडगावी शानदार उद्घाटन

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी): संगीताचे शिक्षण आत्मसात करण्यासाठी गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांनी अपार कष्ट सोसून संगीतसाधना केली आणि गोव्याला शास्त्राय संगीताची अद्भुत देणगी दिली. त्यांचाच संपन्न वारसा आज त्यांची कन्या किशोरी आमोणकर पुढे चालवत आहेत. स्वरमंच संस्था गेली नऊ वर्षे या महान गायिकेच्या नावाने खास संगीत संमेलन आयोजित करत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन फातोर्ड्याचे आमदार तथा संमेलनाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आज येथे केले.
रवींद्र भवनाच्या परिषदगृहात "स्वरमंच मडगाव', कला व संस्कृती खाते आणि उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते व्हायचे होते; पण ते अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारूलकर यांच्या हस्ते संमेलनाचा शुभारंभ झाला.
अलका मारूलकर व आमदार दामू नाईक यांनी समई प्रज्वलित करून आणि स्व. मोगूबाई कुर्डीकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून उद्घाटन केले. त्यावेळी संमेलनाच्या प्रसिद्धी माध्यम दै. "गोवादूत'चे विपणन व्यवस्थापक सागर अग्नी, सरव्यवस्थापक ज्योती धोंड, अध्यक्ष किरण नायक, डॉ. श्रीपाद वाघुर्मेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वरमंच संस्था ४६ वर्षांपूर्वी स्थापन झाली होती. संगीताची परंपरा पुढे नेण्यासाठी ती प्रयत्नत आहे. संस्थेचे निष्ठेने कार्य करत आहेत सांगून दामोदर नाईक म्हणाले, "स्वरमंच' संस्थेची स्वतःची वास्तू असावी अशी इच्छा असून ती उभारून तिचे संगीत अकादमीत रूपांतर करण्याची मनीषा आहे. ती स्तुत्य असून त्यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीन.
या संमेलनासाठी ग्रामीण भागांतील संगीताचे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वाहनाची व जेवणाची व्यवस्था संस्थेने केल्याबद्दल श्री. नाईक यांनी संस्थेचे अभिनंदन केले. ही व्यवस्था करणारी एकमेव संस्था आहे.
आपला कित्येक वर्षांपासून स्वरमंच संस्थेशी जवळचा संबंध आहे. या संस्थेचे संस्थापक माधव पंडित यांच्यामुळे संस्थेशी आपला संबंध आला, असे डॉ. अलका मारूलकर यांनी सांगितले.
आपल्या वडिलांबद्दल मोगुबाईना अत्यंत प्रेम होते. आजारपणातही मी भेटायला गेले तेव्हा वडिलाच्या प्रकृतीबद्दल व माझ्या गायनाबद्दल त्यांनी सर्वप्रथम विचारले होते, अशी आठवण अलकाताईंनी सांगितली.
ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. संस्थेचे अध्यक्ष किरण नायक यांनी स्वागत करून संस्थेची माहिती दिली "गोवादूत' नेहमीच प्रसिद्धीमाध्यम राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ही संस्था गोव्यातील अत्यंत जुनी संस्था आहे. गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून यंदा निवास १०० टक्के लागला. ५ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. देव कुटुंबांनी या संस्थेचे कार्य बघून तीन विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्या देण्यास कायम ठेव दिली आहे.
यावर्षी सदर शिष्यवृत्या संजना देसाई, शानवी कुंकळ्येकर व ऐश्र्वर्या शानभाग यांना देण्यात आल्या. संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी आभार मानले. गिरीश वेळगेकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर गोव्याचे योगराज बोरकर यांचे सितारवादन पार पडले. तसेच श्रुती आरती ठाकूर व पं. एम. व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

आगामी काळ भाजपच्या वैभवाचा इंदूर अधिवेशनाने दिली नवी उर्जा

प्राचार्य पार्सेकर यांचा विश्वास
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मध्य प्रदेशातील इंदूर येथील एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाने भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये "न भुतो न भविष्यती' असा आत्मविश्वास निर्माण झाला असून या चैतन्यदायी वातावरणामुळे आगामी काळात पक्ष संपूर्ण देशात एक नवी उभारी घेईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज व्यक्त केला.
गोव्यातील पक्षाचे १४ आमदार, एक खासदार व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मिळून ४० जाणांच्या गटाचे सर्व सदस्य आज इंदूरहून गोव्यात परतले. इंदूरमध्ये मिळालेली उर्जा, भावी वाटचालीचा स्पष्ट असा दिशादर्शक नकाशा, योजना, कार्यक्रम आणि येणाऱ्या काळातील उद्दिष्टे इतकी सुस्पष्ट आहेत की, येणारा काळ हा भाजपच्या वाढीचा, वैभवाचा आणि जबरदस्त कार्यक्रमांनिशी सामान्य जनतेचा विश्वास जिंकण्याचा असेल, असे प्राचार्य पार्सेकर म्हणाले.
ते म्हणाले की, इंदूरचे संमेलन हा पक्षाच्या ध्येयधोरणांना गती आणि शक्ती देणारा एक उर्जास्त्रोत होता. पक्षाचे सर्वच्या सर्व लहान मोठे पदाधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते एका पातळीवर येऊन एकदिलाने भावी वाटचालीचा विचार करत आहेत. हा अनुभव इतका अद्भुत होता की, तीन दिवसांनी गोव्यात परतलेले आम्ही एक वेगळा उत्साह घेऊन आलो आहोतच परंतु हा उत्साह संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांना एक नवीन उमेद देईल.
पक्षाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्वतः निवड कशी योग्य होती याचाच प्रत्यय या अधिवेशनात आणून दिला. ज्या आत्मविश्वासाने त्यांनी सूत्रे हाताळली, अधिवेशनाला दिशा दिली, विचार दिला ती त्यांची क्षमता केवळ वादातीत होती. कधी काळी पक्षाच्या तिसऱ्या फळीत समावेश होणारा हा नेता आज पहिल्या फळीत आला तेव्हा त्याच्यातली क्षमता आणि आत्मविश्वास काठोकाठ भरलेला दिसला. अशा तरूण नेत्याच्या हाती पहिल्यांदाच पक्षाच्या सूत्रे आली असल्याने सगळ्याच पातळ्यांवर एक नवसंजीवनी पसरली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षा हे विषय हाताळण्यास केंद्रातील "युपीए' सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून वीस लाख सह्या गोळा करण्याचा निर्धार अधिवेशनात पक्का करण्यात आला. याच विषयांवरून सुमारे पाच लाखांचा विराट मोर्चा संसदेवर नेऊन संसदेला घेराव घातला जाईल. असे अनेक कार्यक्रम अधिवेशनात निश्चित करण्यात आले असून त्याची तितक्याच जोरदारपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
अधिवेशनात पक्षाचे जवळपास एक हजार आमदार - खासदार आणि पदाधिकारी प्रतिनिधी मिळून पाच हजार सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासाठी हजारो तंबूंची सोय करण्यात आली होती. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी असे सगळेच तंबूत राहिले होते. सगळे मजेत आणि आनंदात राहिले. सगळे एकत्रित राहण्याचा तो आनंद वेगळाच होता. एकसंधतेची उर्जाही वेगळी होती, असे सांगून ही उर्जा येणाऱ्या दिवसांत सर्वत्र पाहायला मिळेल असा विश्वास प्राचार्य पार्सेकर यांनी व्यक्त केला.
पहिल्या दिवशीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला स्वतः पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर व महासचिव अविनाश कोळी हे उपस्थित होते. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात गोव्यातून गेलेले चाळीसही जण हजर होते, असेही त्यांनी सांगितले.