आमदार दयानंद सोपटे आक्रमक
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्याकडून गोव्यात कॉंग्रेस आघाडी सरकारच्या आशीर्वादाने कशा पद्धतीने बेकायदा खाण व्यवसाय सुरू आहे, याची माहिती देणारे निवेदन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश व केंद्रीय खाणमंत्री बी. के. हंडीक यांना पाठवण्यात येईल, अशी माहिती पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिली. विविध राज्यांतील बेकायदा खाण व्यवसायाचा विषय केंद्राने गांभीर्याने घेतलेला असताना गोव्याचे खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत हे बेकायदा खाण व्यवसायाला उत्तेजन देत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
भाईड कोरगाव येथील जितेंद्र देशप्रभू यांच्या बेकायदा खाणीवरून पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे आक्रमक बनले आहेत. राज्य पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी अलीकडे विविध बेकायदा खाण उद्योगांना नोटिसा पाठवल्या आहेत. कोरगाव येथील ही खाण पूर्णपणे बेकायदा आहे. या खाणीसाठी जल किंवा वायू प्रदूषणासंबंधी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणताही परवाना घेण्यात आला नसल्याने या खाण मालकावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार सोपटे यांनी या प्रकरणी खाण खात्याला चांगलेच खडसावल्याने व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनीही या खाण प्रकरणी सखोल चौकशी अहवाल मागवल्याने खाण खात्यातील अधिकाऱ्यांची दाणादाण उडाली आहे. खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी आपल्या खात्यातील एका पथकाला मायणा, न्हावेली येथे पाठवून कोरगाव येथील बेकायदा खाणीवरून किती खनिज माल तिथे पोचला याचा तपशील तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. सध्या या बेकायदा खाणीवरील मशिनरी मुख्य रस्त्याच्या कडेला आणून ठेवण्यात आली असली तरी ती मशिनरी जप्त करण्यासाठी खाण खात्याकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची टीका यावेळी स्थानिकांनी केली. ही मशिनरी बेकायदा खाण उत्खननासाठी वापरण्यात येत होती, याची माहिती खाण खात्याला असताना ती जप्त का करण्यात आली नाही, असा सवाल कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी केला आहे. दरम्यान, खाण खात्याकडून जप्त करण्यात आलेला एक ट्रक सध्या पेडणे पोलिस स्थानकावर पडून आहे. हा ट्रक सोडवण्यासाठी अद्याप कोणीही खाण खात्याकडे संपर्क साधला नाही, अशी माहिती मिळाली आहे. हा ट्रक पूर्णपणे खनिज मालाने भरलेला आहे व त्यामुळे या खाणीवरून बेकायदा खनिजाची वाहतूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खाण संचालक अरविंद लोलयेकर यांच्याकडे संपर्क साधला असता सदर फाईल सरकारला पाठवण्यात आली असून सरकारच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.
Thursday, 2 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment