पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे मुक्या जनावरांबरोबर आता मनुष्यांचेही हकनाक बळी जाण्याचे प्रकार पेडणे तालुक्यात वाढीस लागले आहेत. या घटनांमुळे आता वीज खात्याची तुलना "मौत का सौदागर' अशीच होऊ लागल्याचे पेडणेवासीयांत बोलते जात आहे. मांद्रे या गावात सावंतवाड्यावरील सौ. सविता ऊर्फ प्रतीक्षा पांडुरंग सावंत या महिलेचा हकनाक बळी गेला. नुकसान भरपाईच्या नावाने काही लाख रुपयांची घोषणा करून व बळी गेलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सरकार जनतेच्या जीविताचा जाहीर लिलाव करू पाहते आहे का, असा खडा सवाल सावंतवाड्यावरील ग्रामस्थांनी केला आहे.
वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांसाठी खात्याकडून वीज बिलांमार्फत प्रत्येक ग्राहकाकडून अतिरिक्त कर आकारला जातो. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा कर लागू केल्याने कोट्यवधी रुपयांचा हा पैसा सरकारकडून केवळ वीज पुरवठा सुविधा उभारण्यासाठी व वीज पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च केला जाईल, अशीही घोषणा केली होती. पेडणे तालुक्यातील बहुतांश भागात मात्र कित्येक वर्षांपूर्वीच्या वाहिन्या व वीज खांब अजूनही तिथेच आहेत. ते बदलण्यासाठी इथल्या ग्रामस्थांच्या बळीची वाट तर सरकार पाहत नाही ना, असा सवाल मांद्रे सिटीजन फोरमतर्फे करण्यात आला. यापूर्वी अशाच प्रकारे मोरजी येथे पिता- पुत्राचा नाहक बळी गेला होता. या घटनेच्या स्मृती ताज्या असतानाच दोन लहान मुलांची आई असलेल्या सौ.सविता हिचा बळी गेला. राज्यात मान्सून सुरू झाल्याने वीज खात्याची जबाबदारी वाढते हे ठाऊक असूनही वीजमंत्री आलेक्स सिकेरा हे मात्र युरोप दौऱ्यात व्यस्त आहेत. वीज खात्यातील बहुतांश वरिष्ठ पदांवरील अधिकारी हे राजकीय आश्रयाने सेवावाढीवर आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून केवळ वीजमंत्र्यांची हुजरेगिरी सुरू असून वीज खात्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नाही, अशीही संतप्त भावना वीज खात्यातील काही कर्मचाऱ्यांचीही बनली आहे. ग्राहकांकडून जमा करण्यात आलेला पैसा केवळ आपल्या ठरावीक मतदारसंघातच खर्च करून तिथे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याची कंत्राटे दिली आहेत तर अन्य ठिकाणी मात्र विजेच्या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात आणखीनही बळींचे खापर सरकारच्या माथी फुटण्याचीच जास्त शक्यता आहे.
गावातील विजेच्या उपकरणांच्या या परिस्थितीबाबत स्थानिक पंचायतीकडूनही खात्याकडे पाठपुरावा केला जात नाही, याबाबतही काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. मांद्रेचे आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात पेडणे तालुक्यातील व विशेषतः मांद्रे मतदारसंघातील वीज वाहिन्या व खांबांच्या जीर्ण अवस्थेबाबत विषय उपस्थित केला असता त्यांना मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळाले होते पण खाते याप्रकरणी अजिबात गंभीर नसल्यानेच हे प्रकार यापुढे बंद होतीलच याबाबत खात्रीपूर्वक सांगणे कठीण आहे,अशी प्रतिक्रिया प्रा.पार्सेकर यांनी दिली.
----------------------------------------------------------
मंत्री फिरकलेच नाहीत!
कुठे तरी गणपतीची मूर्ती सापडल्याची वार्ता समजताच मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सरकारचा सर्व कारभार बाजूला टाकून तिथे धाव घेतात, पण आपल्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे एका महिलेचा जीव गेला तर तिथे भेट देण्याची गरज त्यांना वाटत नाही, हे जनतेचे दुर्दैव आहे, अशी कडवट प्रतिक्रिया येथील काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. कामत यांच्या अजोड भक्तीपुढे देवांनीही आता जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ त्यांची खुर्ची वाचवण्यासाठीच आपली ताकद पणाला तर लावली नाही ना, अशीही भावना काही लोकांनी प्रकट केली.
Thursday 17 June, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment