Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 15 June 2010

हळर्णकर अद्याप बिनखात्याचे मंत्री!

राष्ट्रवादीमध्ये तीव्र असंतोष
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - मिकी पाशेको यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना देण्यात आले आहे. मंत्रिपद बहाल केले खरे पण आता पाशेकोंकडील खाती देण्यावरून मात्र मुख्यमंत्री दिगंबर कामत काहीसे हात आखडते घेत असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बनली आहे.
नीळकंठ हळर्णकर यांना गेल्या मंगळवार ८ जून रोजी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दोन दिवसांत खाती देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री आता सहा दिवस झाले तरी अद्याप खाते वाटपाबाबत निर्णय घेत नाहीत, यामुळे राष्ट्रवादीत कमालीची नाराजी पसरली आहे. मिकी पाशेको यांच्याकडील खातीच राष्ट्रवादीला देण्याचे स्पष्ट संकेत दिल्लीतील राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दिले आहेत. आता असे असतानाही मुख्यमंत्री हा विषय नेमका कोणत्या कारणांसाठी पुढे रेटीत आहेत, याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. मिकी पाशेको यांच्याकडील पर्यटन खात्यावर खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीच नजर आहे, असेही आता उघडपणे बोलले जाते. कला व संस्कृती खात्याप्रमाणे पर्यटन खात्यातही महोत्सव वा अन्य उत्सवांना वाव आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे व त्यामुळे या खात्यात काम करण्यासारखे बरेच काही आहे. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून हे खाते मिकी पाशेको यांना देणे भाग पडले होते. कामत यांच्याकडे हे खाते आल्यास कलाकारांबरोबर त्यांना पर्यटन उद्योजकांतही आपली प्रतिमा उंचावण्याची नामी संधी प्राप्त होणार आहे. दरम्यान, नीळकंठ हळर्णकर यांनी खात्यांचा भार हा पूर्णपणे श्रेष्ठींच्या हवाली केला असून श्रेष्ठी सांगतील ते आपल्याला मान्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रदेश राष्ट्रवादीने यापूर्वीच मिकी पाशेको यांच्याकडील सर्व पदे नीळकंठ हळर्णकर यांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, गृह निर्माण खाते नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे देण्यात येणार असले तरी गृह निर्माण महामंडळाच्या अध्यक्षपदी युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांची नेमणूक करावी,असा प्रस्तावही मुख्यमंत्री कामत यांच्यासमोर असल्याची खात्रीलायक खबर आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदासाठीही युवा कॉंग्रेसच्या एखाद्या पदाधिकाऱ्याची नेमणूक करावी,असाही आग्रह आहे. या पदासाठी राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी इच्छुक असल्याने हा गुंता कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
दरम्यान, पर्यटन खाते आपल्याकडे ठेवले तर नीळकंठ यांना कुठले खाते द्यावे असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उभा राहिला असून सध्या त्यांच्याकडे असलेली खाण, नगर नियोजन, कायदा, माहिती तंत्रज्ञान,कला व संस्कृती आदी खाती देण्यासही ते राजी नाहीत.पर्यटन खाते मिळवण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळाचे खातेपालट करण्याचाही त्यांचा विचार होता पण त्यामुळे अधिक घोळ होईल, या भीतीने ते व्यथित झाले आहेत. कामत हे जाणीवपूर्वक खाते वाटपासंदर्भात वेळकाढू धोरण अवलंबून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिजवण्याचा तर प्रयत्न करीत नसतील ना,असाही सवाल या पक्षाचे पदाधिकारी करू लागले आहेत.

No comments: