Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 17 June 2010

बरेच आढेवेढे घेतल्यावर मंत्री हळर्णकर यांच्याकडे पाशेकोंचीच सर्व खाती

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): शेवटच्या क्षणापर्यंत आढेवेढे घेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादीचे नवनियुक्त मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना महत्त्वाच्या पर्यटन खात्यासह बंदर कप्तान, गृह निर्माण आदी माजीमंत्री मिकी पाशेको यांच्याकडील सर्व पदे बहाल करून हा विषय अखेर निकालात काढला. गृह निर्माण महामंडळाचे अध्यक्षपदही हळर्णकर यांच्याचकडे ठेवण्यात आले. यासंबंधीची अधिसूचना रात्री उशिरा जारी करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
नादिया तोरादो मृत्युप्रकरणी मुख्य संशयित म्हणून घोषित झालेले मिकी पाशेको यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्याजागी राष्ट्रवादीचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांची वर्णी लागली होती. श्री. हळर्णकर यांना ८ जून रोजी शपथ देऊनही अद्याप खाती बहाल करण्यात आली नसल्याने काही प्रमाणात सरकाराअंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. मुळातच मिकी यांच्याकडील पर्यटन खात्यावर मुख्यमंत्री कामत यांच्यासह अनेकांची नजर होती. हे खाते प्राप्त करून श्री. हळर्णकर यांना अन्य कुठले तरी पद देण्याचीही चाचपणी कामत यांनी केल्याची खबर आहे. शेवटी खातेबदलाचा हा प्रयोग आपल्याच अंगलट येईल, याची खात्री पटल्यामुळे त्यांनी पाशेको यांच्याकडील सगळी खाती नीळकंठ हळर्णकर यांच्या पदरात टाकून दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशांचे पालन केले.
हळर्णकर यांना खातेवाटप करताना महामंडळाच्या अध्यक्षपदांबाबत काही फेरफार करण्याचाही निर्णय सरकार दरबारी झाल्याचे ऐकिवात येते. नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद होते. अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे हे पद कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांना देण्याचे ठरले आहे. रेजिनाल्ड हे कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून हे पद वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांचे बंधू तथा प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांना मिळण्याची शक्यता आहे. वाहतूक खाते व कदंब महामंडळ यांच्यावर ही ढवळीकर बंधूंकडे येणार असल्याने त्याचा कितपत फायदा महामंडळाला होतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
या महामंडळ वाटपात मुख्यमंत्र्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांचीही सोय लावली आहे. आमोणकर यांच्याकडे गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. यापूर्वी हे पद माजी युवाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडेही होते. आमोणकर यांना गृह निर्माण महामंडळाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते; पण त्यास हळर्णकर यांनी हरकत घेतल्याने अखेर फलोत्पादनावरच समाधान मानणे युवा कॉंग्रेससाठी अनिवार्य ठरले.
--------------------------------------------------------
पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त!
माजी मंत्री मिकी पाशेको यांनी नियुक्त केलेल्या पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महामंडळाचे अध्यक्षपद मात्र कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्याकडेच राहणार आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्याने लिंडन मोंतेरो यांच्याकडील उपाध्यक्षपद रद्द झाले आहे. आता या पदावर राष्ट्रवादीच्या अन्य एका नेत्याची नियुक्ती होईल, अशी माहिती हाती आली आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार चढाओढ असल्याचेही सांगितले जात आहे.

No comments: