Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 19 May 2010

२० लाखांचे बेकायदा मद्यार्क जप्त

- पत्रादेवी चेकनाक्यावर कारवाई
- पर्रीकरांच्या आरोपांना पुष्टी

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोव्यात राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्काची आयात होत असल्याचा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा आरोप आज अबकारी खात्याने केलेल्या कारवाईअंती खरा ठरला आहे. नवनियुक्त अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी सर्व सीमेवरील अबकारी तपासनाक्यांना कडक तपासणीचे आदेश दिले असतानाच आज पत्रादेवी तपासनाक्यावरील पथकाने महाराष्ट्रातून बेकायदेशीररीत्या मद्यार्काची वाहतूक करणारा भला मोठा कंटेनर भल्या पहाटे जप्त केला. सुमारे २० लाख रुपये किमतीचे मद्यार्क या कंटेनरमध्ये सापडल्याची माहिती असून काळ्या बाजारात याची किंमत ४५ ते ५० लाख रुपयांवर पोहचते. राज्य सरकारला सुमारे २५ लाख रुपयांचा कर चुकवून ही वाहतूक केली जात होती, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
यासंबंधीची सविस्तर माहिती अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी संध्याकाळी पत्रकारांना दिली. आज सकाळी पत्रादेवी अबकारी तपासनाक्यावर एक भला मोठा कंटेनर गोव्याची सीमा ओलांडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. जीजे - ६ - टीटी - ९१०३ या क्रमांकांच्या कंटेनरच्या हालचालींबाबत संशय निर्माण झाल्याने कंटेनरच्या चालकाकडे चौकशी केली असता पशू खाद्याची वाहतूक केली जात असल्याचे सांगण्यात आले. पशू खाद्याच्या वाहतुकीसाठी कंटेनरचा वापर करण्याच्या प्रकाराबाबत नवल वाटल्याने अबकारी निरीक्षकांनी कंटेनरची पाहणी केली व त्याचवेळी हा प्रकार उघडकीस आला. कंटेनरमध्ये सुमारे १०८ मद्यार्काने भरलेले बॅरेल्स आढळून आले. सुमारे वीस हजार लीटर मद्यार्काचे प्रमाण असण्याची प्राथमिक शक्यता श्री.रेड्डी यांनी वर्तविली असून त्याची बाजारातील अधिकृत किंमत २० लाख रुपये होते. काळ्या बाजारात मात्र हे मद्यार्क ४५ ते ५० लाख रुपयांपर्यंत विकले जाते. मद्यार्काचे प्रमाण पाहता सुमारे २५ लाख रुपये अबकारी कर या बेकायदा वाहतूकीव्दारे चुकवला जात होता, अशी माहितीही त्यांनी उघड केली. या मद्यार्काचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. कंटेनरच्या चालकाने आपले नाव अस्लम असे सांगितले असून तो आपली जबानी बदलत असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण बनल्याचेही श्री.रेड्डी यांनी सांगितले. आपल्याला हा कंटेनर गोव्याच्या सीमेपर्यंत आणण्यासाठी पाठीमागे केदार नामक एका व्यक्तीने मदत केली. गोव्याच्या सीमेवर अन्य एक व्यक्ती भेटेल व तो सर्व तपासनाक्यांचा अडथळा दूर करील, असे सांगण्यात आले होते, असेही अस्लम याने आपल्या जबानीत म्हटले आहे. प्राप्त कागदपत्रांनुसार हा माल इंदोर येथील "प्रकाश लोडींग कंपनी' कडे चढवण्यात आला व तो मडगाव येथे एस. एस. हिरेमठ नामक कारखान्यात उतरविण्यात येणार होता. अशा नावाचा मडगावात एकही मद्यनिमिर्ती कारखाना नाही, अशीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, पत्रादेवी व महाराष्ट्रातील इन्सूली तपासनाक्यावरून या कंटेनरबाबतची गेल्या दोन वर्षांतील सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे पर्रीकरांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अबकारी घोटाळ्याला पुष्टी मिळाली आहे. या घोटाळ्याची कसून चौकशी केली जाईल, अशी माहिती देताना वास्को अबकारी कार्यालयातील संगणकावर मिळालेल्या संशयास्पद पत्रव्यवहारांचाही तपास सुरू आहे. पत्रादेवी अबकारी तपासनाक्यावर नव्यानेच नियुक्त केलेल्या पथकाचे श्री. रेड्डी यांनी कौतुक केले. या कारवाईत अबकारी निरीक्षक राजेश नाईक, अनंत नाईक यांच्यासह साहाय्यक निरीक्षक नितीन परब, रोहन गावकर, सुदन कांदे, अबकारी रक्षक देवेंद्र नाईक, रामा बगळी आदींनी चोख कामगिरी केली,असेही ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------
हा निव्वळ योगायोग
अबकारी आयुक्तपदाची जबाबदारी पी. एस. रेड्डी यांनी स्वीकारावी व त्यांनी छापे टाकून बेकायदा मद्याचा साठा जप्त करावा हा निव्वळ योगायोग आहे, असे विचित्र वक्तव्य मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले. राज्यात बनावट मद्यनिमिर्तीची शक्यता फेटाळून लावताना अशा पद्धतीच्या वाहतुकीसाठी गोव्यातील वाहतूक मार्गांचा केवळ वापर होत असावा,असेही वादग्रस्त विधान त्यांनी केले. बेकायदा मद्यसाठा जप्त केल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यास किंवा कारवाई करण्यास अबकारी कायद्यात आवश्यक तरतूद नाही, ही गोष्ट लक्षात आणून दिली असता त्याबाबत सखोल अभ्यास करून विधीतज्ज्ञांचे साहाय्य घेऊन या कायद्याला आवश्यक दुरुस्ती सुचवण्याचे आदेश आपण अबकारी आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

No comments: