पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): राज्यातील औद्योगिक तंटा लवाद न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेल्या निलंबनाचे जोरदार पडसाद सध्या राज्यातील वकील आणि न्यायाधीशांमध्ये उमटले असून या निलंबनाला विरोध करण्यासाठी सध्या राज्यभरातील वकिलांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ ते वरिष्ठ पातळीवरील बहुसंख्य न्यायाधीशांनीही श्रीमती प्रभुदेसाई यांना आपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला आहे.
श्रीमती प्रभुदेसाई यांची न्यायाधीश या नात्याने गेल्या अठरा वर्षांची कारकीर्द अत्यंत स्वच्छ आणि निःस्पृह राहिली असल्याचे या वकील व न्यायाधीशांचे म्हणणे असून त्यांचे निलंबन करताना पुढे करण्यात आलेल्या कारणांमुळे आमचे अजिबात समाधान झालेले नाही, किंबहुना श्रीमती प्रभुदेसाई यांच्या निलंबनामुळे न्याय क्षेत्रातील प्रामाणिक लोकांना एक प्रकारचा धक्काच बसल्याची प्रतिक्रिया अनेक वकिलांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाला सर्व स्तरावरून जोरदार विरोध करण्याचा निर्णयही विविध वकील संघटनांनी घेतला आहे. विरोधाची ही तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचे उघड पडसाद लवकरच संपूर्ण राज्यभर उमटण्याची दाट शक्यता आहे.
श्रीमती प्रभुदेसाई यांनी कनिष्ठ न्यायालयापासून ते जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या नात्याने पदभार सांभाळला असून राज्यातील न्यायसंस्था, वकील, सहकारी यांच्यात एक शिस्तबद्ध आणि प्रामाणिक न्यायाधीश अशी त्यांची कायम प्रतिमा राहिली आहे. तथापि, २००४ मधील काही अपघातविषयक खटल्यांमध्ये न्यायाधीश या नात्याने त्यांनी आपद्ग्रस्तांना मंजूर केलेल्या नुकसानभरपाईला तसेच २००३ सालच्या एका भूसंपादन प्रक्रियेवरील निवाड्याच्या कार्यवाहीला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयाच्या आढावा समितीने त्यांच्या निलंबनाची शिफारस केली. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निलंबन अशा वेळी आले आहे की, त्यांच्या भावी कारकिर्दीवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. येत्या जानेवारी २०११ मध्ये गोव्यातून मुंबई उच्च न्यायालयावर गेलेले न्यायमूर्ती नेल्सन ब्रिटो हे निवृत्त होत आहेत व त्यांची ही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सहा महिने आधीपासूनच सुरू होणार आहे. गोव्याच्या न्यायपालिकेत श्रीमती प्रभुदेसाई या सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने या पदासाठी त्या प्रमुख दावेदार होत्या. मात्र आता निलंबनामुळे त्यांना ही संधी मिळणार की नाही यावरून सध्या अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मागच्या प्रकरणांवरून निघालेले त्यांचे हे निलंबन अशा वेळी आल्याने वकील आणि न्यायाधीश वर्गात सध्या चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांच्या या निलंबनाच्या अनुषंगाने काही ज्येष्ठ वकिलांनी आपल्या तीव्र भावना आणि चिंता व्यक्त केली आहे.
राज्य कायदा आयोगाचे सदस्य मारियो पिंटो आल्मेदा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, श्रीमती प्रभुदेसाई यांचे निलंबन ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे "गोवादूत'शी बोलताना सांगितले. श्रीमती प्रभुदेसाई या एक अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेल्या न्यायाधीश म्हणून समस्त वकील आणि न्यायालयीन वर्तुळात ओळखल्या जातात. न्यायाधीश या नात्याने इतक्या वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांचे वर्तन नेहमीच निःस्पृह राहिले आहे. त्यांच्याविरुद्ध इतक्या वर्षात कधीही कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत की त्या वादग्रस्तही ठरल्या नाहीत. त्यामुळे एका चांगल्या व्यक्तीला मिळालेली ही शिक्षा खूप मोठी आहे. इतकी वर्षे वकील म्हणून काम करताना श्रीमती प्रभुदेसाई यांच्याबद्दल आम्हा वकील मंडळींच्या मनात नेहमी आदराचीच भावना राहिली. त्यांच्या हातून कधीही कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य होणार नाही याबद्दल कोणाच्याही मनात संदेह असणार नाही. त्यामुळे न्याय पालिकेनेही त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा तात्काळ फेरविचार करावा अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.
येथील एक ज्येष्ठ वकील श्रीमती शुभलक्ष्मी नायक यांचीही प्रतिक्रिया याच सदरात मोडणारी होती. श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाचे वृत्त वाचून आपणास धक्काच बसला. गेली अनेक वर्षे आपण त्यांना ओळखते. आपले काम नेहमीच सचोटीने करणारी एक अत्यंत प्रामाणिक न्यायाधीश हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या न्यायाधीशावर ही पाळी यावी याबद्दल आपणास अत्यंत वाईट वाटते आहेच परंतु त्याही पेक्षा या घटनेने आपणास जबर धक्का बसल्याचेही ऍड. शुभलक्ष्मी नायक यांनी सांगितले.
लेबर प्रॅक्टिशनर असोसिएशन (कामगार कज्जाविषयक वकील संघटना) चे अध्यक्ष ऍड. माधव बांदोडकर यांनीही श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनामुळे आपणास धक्का बसल्याचे सांगितले. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या निलंबनामागच्या कारणांबाबत आपण भाष्य करणार नाही, परंतु एक प्रामाणिक न्यायाधीश म्हणूनच आम्ही वकील मंडळी त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निलंबनामुळे कामगार कज्जे विषयक कामकाजात अडथळे येणार असल्याचे ते म्हणाले. श्रीमती प्रभुदेसाई यांचे निलंबन दुःखदायी असल्याचे ते म्हणाले.
श्रीमती प्रभुदेसाई या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या निलंबनाने आपणास धक्काच बसल्याचे येथील एक नामवंत वकील ऍड. शैलेश भोबे यांनी सांगितले.
राज्यातील एक आघाडीचे वकील सरेश लोटलीकर यांची प्रतिक्रिया तर अधिकच बोलकी होती. ते म्हणाले, मुळातच विविध घटनांमुळे न्यायप्रणाली बऱ्याचदा वादग्रस्त ठरत असताना, श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासारख्या प्रामाणिक न्यायाधीशाला प्रामाणिकपणाचे हेच फळ मिळत असेल तर नवीन चांगले लोक या क्षेत्रात यायलाच बघणार नाहीत. श्रीमती प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले आरोपपत्र आपण स्वतः वाचलेले आहेत. या आरोपपत्रात त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप अत्यंत तकलादू आहेत. अपघातग्रस्तांना त्यांच्या मागणीपेक्षा अधिक नुकसानभरपाई देण्यात आली हे कारण तर कोणालाही न पटणारे आहे. किंबहुना या आरोपामुळे तर श्रीमती प्रभुदेसाई या खरोखरच प्रामाणिक आहेत हेच सिद्ध होते. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत "नो नॉनसेन्स जज्ज' हीच त्यांची ओळख आहे. आज केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण बार काउन्सील त्यांच्या पाठीशी उभे आहे. न्यायाधीश म्हटले की त्याच्या निवाड्यामुळे एकटा आनंदी होणे आणि दुसरा वकील नाराज होणे हे आलेच परंतु श्रीमती प्रभुदेसाई यांच्यावर कधीही कोणी तसा राग धरला नाही. त्यांचा निवाडा सगळ्यांनीच खुल्या दिलाने मान्य केला, अशी त्यांची निःस्पृहता आहे. उदाहरणच द्यायचे तर आज मी त्यांच्या पाठीशी राहिलो आणि उद्या त्या पुन्हा न्यायालयात रुजू झाल्या तर माझ्या एखाद्या खटल्यात निवाडा देताना मी त्यांच्या मागे राहिलो होतो हा विचारसुद्धा त्यांच्या मनात शिवणार नाही, इतक्या त्या प्रामाणिक आहेत. त्यामुळे आज त्यांच्या निलंबनाच्या वेळी त्यांना मिळणारा पाठिंबा हा उत्स्फूर्त असून आज सगळेच वकील आणि न्याय यंत्रणेशी संबंधित बहुसंख्य सगळेच त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे ऍड. लोटलीकर पुढे म्हणाले.
Friday, 12 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment