Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 11 February 2010

दंडाधिकाऱ्यांकडूनही पुरेसे सहकार्य नाही

कुळे नागरिक समितीचा आरोप
कुळे दि. १० (प्रतिनिधी): येथील जेम्स आल्मेदा मृत्युप्रकरणी स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच आता केपे येथील विभागीय दंडाधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणाचा छडा लावण्यास पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची कुळे नागरिक समितीची भावना झाली आहे. केपे विभागीय दंडाधिकाऱ्यांनी आज नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात पाचारण करून उपस्थित केलेले बरेच मुद्दे गैरवाजवी आणि असंबंद्ध असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. जेम्सच्या मृतदेहाची बेकायदा विल्हेवाट लावणे हे उपदंडाधिकाऱ्यांनाही फारसे खटकले नसावे; कारण प्रत्यक्षात त्याची चौकशी करण्यापेक्षा जेम्स दारू कसा घेत होता, त्याच्या मालकाचे खाण व्यवसायावरून नागरिक समितीशी कसे खटके उडाले होते आणि त्यावरून समिती त्याला लक्ष्य करत असावी असेच निष्कर्ष दंडाधिकाऱ्यांनी काढले असावेत, असे त्यांच्या आजच्या बोलण्यावरून जाणवल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खरेतर जेम्सचा मृत्यू जानेवारी २३ रोजी झाल्यानंतर त्याच्या मालकाने ज्या पद्धतीने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ती पद्धत केवळ संशयास्पदच नव्हती तर पूर्णतः बेकायदाही होती. संपूर्ण कुळे गावात त्यावरून आजही उलट सुलट चर्चा आहे. त्यामुळे लोकांचे विविध प्रश्न हाती घेऊन आजवर अन्यायाविरोधात लढणाऱ्या कुळे नागरिक समितीने या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची विनंती पोलिसांना केली होती. तथापि, कुळे पोलिसांकडून पुरेसे सहकार्य न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी या स्तरांवरही समितीने निवेदने दिली होती. जेम्स आल्मेदाचा मृत्यू हा घातपाताच विषय असू शकतोे, असे नागरिक समितीचे मत आहे. लोकांच्या मनातला हा संशय दूर करण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू आहेत की काय, अशी शंका येण्याजोगी सध्या परिस्थिती निर्माण झाली असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आज समितीच्या पदाधिकाऱ्यांना केपे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाचारण केल्यानंतर उपजिल्हाधिकारी ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होते ते पाहिल्यानंतर जेम्सच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात तक्रार करून नागरिक समितीनेच जणू गुन्हा केला आहे की काय असे उपजिल्हाधिकाऱ्यांचे वर्तन असल्याचे सांगण्यात आले.
जेम्सच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नागरिक समितीने साक्षी आणि पुरावे द्यावेत अशी उपजिल्हाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, ज्या लोकांनी खोटे दाखले देऊन आणि घेऊन जेम्सच्या मृतदेहाची घाईगडबडीत विल्हेवाट लावली, तो प्रकार म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असूनही संबंधितांकडून चांगल्या हेतूनेच ते सगळे घडले असावे, अशी उघड भूमिका उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे त्यांच्या वर्तनावरून दिसत असल्याची समितीच्या पदाधिकाऱ्यांची भावना बनली आहे. किंबहुना हा विषय लावून धरल्याबद्दल समितीच काहीतरी चूक करीत असावी असेच त्यांचे आजचे वर्तन होते, असे समितीचे म्हणणे आहे. परिणामी त्यांच्याकडून या प्रकरणी सादर केला जाणारा चौकशी अहवाल नेमका कसा असेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अशा वेळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यताच कठीण असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments: