पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): एखाद्याकडे नेतृत्वगुण असला की मग तो पुरुष असो की स्त्री, त्याच्या नेतृत्वासमोर लिंगभेदाचा विषय निव्वळ गौण ठरतो, असे उद्गार भारताच्या पहिल्या महिला "आयपीएस' अधिकारी डॉ. किरण बेदी यांनी काढले. खरे नेतृत्व हे इतरांसाठी स्फूर्तिदायक ठरणारे असावे. समाजासाठी वावरताना आपल्याला जे काही मिळते त्याच्या दुप्पट आपण समाजाला देणे लागतो व त्यासाठी समाजाप्रति संवेदनशील असणे हाच खरा मंत्र, असेही डॉ. बेदी म्हणाल्या.
डॉ. धर्मानंद कोसंबी विचार महोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी डॉ. किरण बेदी यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानमालेचा आत्तापर्यंतचा इतिहास आज प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मागे पडला. कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात प्रेक्षकांची झुंबड उडालीच पण काही महनीय लोकांनी सभागृहात खाली बसण्यासही कमीपणा मानला नाही. सभागृहाबाहेर "स्क्रीन'ची सोय करण्यात आली होती व तिथेही प्रेक्षकांची उसळलेली तुफान गर्दी डॉ. बेदी यांच्या सर्वत्र पसरलेल्या कीर्तीची स्पष्टपणे ओळख करून देत होती. विशेष करून युवा वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती व त्यांना अपेक्षित स्फूर्तिदायक विचार मांडून डॉ. बेदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. सडेतोड बाणा व क्रांतिकारक विचारांना कर्तृत्वाची झालर यामुळे डॉ. किरण बेदी यांनी आपल्या आयुष्यात वठवलेली प्रत्येक जबाबदारी प्रशंसनीय अशीच ठरली आहे.
गोव्यात १९८४ साली त्यांची विशेष वाहतूक अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. या काळात गोव्यात राष्ट्रकुल प्रतिनिधींची परिषद (चोगम) आयोजित करण्यात आली होती व त्यानिमित्तानेच त्यांची इथे वर्णी लावली होती. त्यांनी त्या काळातील काही जुने फोटो व व्यंगचित्रांच्या साहाय्याने आपल्या गोव्यातील कारकिर्दीला उजाळा दिला. विशेष म्हणजे वाहतूक विभागात केवळ वीस पोलिस कर्मचारी असतानाही विविध विद्यालयीन विद्यार्थी व युवकांना बरोबर घेऊन त्यांनी वाहतूक व्यवस्थेची चोख व्यवस्था पार पाडली. या काळात त्यांनी राजकीय नेत्यांचे निर्भीडपणे वैर पत्करून आपल्या सेवेशी साधलेल्या प्रामाणिकपणाचेही किस्से सादर केले. सध्याच्या जुवारी पुलाचे उद्घाटन त्यांनी एका प्रसंगी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी केले होते. यामुळेच कदाचित या पुलाचे नाव जुवारीच राहिले,अन्यथा त्याला सुद्धा "गांधी'चे नाव लागले असते,असाही टोला त्यांनी लगावला.सेंट झेव्हियर्सच्या पहिल्या शव प्रदर्शनावेळी वाहतुकीच्या व्यवस्थेतून तत्कालीन मंत्रिमंडळातील एका मंत्र्यालाही मुभा दिली नाही, यावरून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलेला राडा व माफी मागण्यास त्यांनी दिलेला स्पष्ट नकार हा किस्साही प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून गेला. आपण नेहमीच काहीतरी अतिरिक्त साध्य करणार या हेतूने काम करावे. इतरांवर ठपका ठेवण्यापेक्षा स्वतःचे लक्ष्य स्वतःच ठरवणे रास्त ठरेल,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. इतरांत वेगळा अपवाद ठरण्यास आपल्याला कुणीच मज्जाव केलेला नाही, त्यामुळे लिंगभेद एका ठरावीक काळापर्यंतच विचारात असतो पण त्यापुढे आपली स्वतःची प्रतिमा ही आपल्या कुवतीनुसारच घडते. मानसिक, शारीरिक व आध्यात्मिकदृष्ट्या आपण कठोर असायला हवे, तेव्हाच आपण यश मिळवू शकतो, असे त्या म्हणाल्या.
नैसर्गिकदृष्ट्या रचनाकाराने पुरुषांपेक्षा स्त्रीची रचना वेगळ्या पद्धतीने केली आहे व निसर्गदत्त मातृत्व तिच्याकडे असते. एका बाळाला जन्म देणे व त्याचे संगोपन करून सर्व कुटुंबाला एका सूत्रात बांधणे ही स्त्रीकडील नैसर्गिक ताकद आहे. आपल्या गुणांच्या बळावर नेतृत्व करणाऱ्या स्त्रीसमोर या अतिरिक्त गुणांचा ठेवा असतो व त्यामुळे ती पुरुषांपेक्षा अधिक कणखर व निर्भीड असते,असेही त्या शेवटी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी केले तर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ.प्रमोद साळगावकर यांनी त्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत तथा विविध प्रशासकीय अधिकारी आवर्जून हजर होते.
Thursday, 11 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment