Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 1 October 2009

मिकींना पुन्हा अटक, सुटका

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांना आज पुन्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कागदोपत्री अटक करून दहा हजार रुपयांच्या हमीवर सुटका केली. हाय स्ट्रीट हॉटेलच्या व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर मंत्री पाशेको यांना आज अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरुन आजही पोलिस स्थानकावर श्री. पाशेको आले असता, त्यांच्याविरुध्द नोंद असलेल्या दुसऱ्या एका प्रकरणात अटक करून सुमारे दोन तास जबानी नोंदवून घेण्यात आली.
हा आपल्या विरोधातील कट असून आपण अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्री. पाशेको यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला ४८ तासात दोन वेळा अटक होते, यावर प्रतिक्रिया विचारली असता "त्यात आपण काय करू शकतो' असे उद्गार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काढले.
गेल्या काही वर्षात मंत्री पाशेको यांच्या विरोधात पाच पोलिस तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
सदर तक्रार अपडेट गेमिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाने दि. १९ जून रोजी मंत्री मिकी पाशेकोने कॅसिनोत घुसून धमकी दिल्याची तक्रार कोलवा पोलिस स्थानकात दिली होती. तसेच मंत्री धमकी देत असल्याचे सीसी टीव्ही वरील क्लिपींगही पोलिसांना सादर करण्यात आले होते. यावेळी ही तक्रार तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्त करण्यात आली होती.
माजोर्डा येथील कॉसिनोज घुसून ३ लाख ६९ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मिकी पाशेको यांनी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता. त्यावेळी दुसऱ्याही धमकीच्या गुन्ह्यामुळे अटक होण्याची शक्यता असल्याने त्याही प्रकरणात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता.
याविषयीचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक मंगलदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रविणकुमार वस्त करीत आहे.

No comments: