'विश्व हृदयदिन २००९' चा संदेश
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): "हृदयापासून काम करा' असा संदेश विश्व हृदय फेडरेशनतर्फे देण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने हृदयविकारापासून सावध राहावे व काळजी घ्यावी जेणेकरून निरोगी आयुष्य जगता येणे शक्य आहे. विश्व हृदय दिनानिमित्त जगभरात तळागाळात हा संदेश पोहोचवण्याची मोहीम विश्व हृदय फेडरेशनतर्फे हाती घेण्यात आली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलचे तथा गोव्यातील नामांकित हृदय तज्ज्ञ डॉ. उदय खानोलकर यांनी ही माहिती दिली. जगभरात वर्षाकाठी १७.८ दशलक्ष लोक हृदयरोगाचे बळी ठरत आहेत. हृदयविकाराचा झटका हे त्याचे प्रमुख कारण आहे. या रोगामुळे होणाऱ्या मनुष्यहानीचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम जाणवतो. कर्तृत्ववान मनुष्यबळाचा अंत होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम कुटुंब, समाज, राज्य, देश व पर्यायाने जगावरही पडतो, असे मत विश्व आर्थिक फोरमने व्यक्त केले आहे. दरम्यान, हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींची जाणीव करून घेतल्यास व या गोष्टींपासून सावधगिरी बाळगल्यास ८० टक्के जीव वाचवणे शक्य आहे व त्यामुळेच हा संदेश या मोहिमेअंतर्गत प्रभावीपणे मांडण्यासाठी विश्व हृदय फोरमने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगानेच विश्व आर्थिक फोरमने "खुशालीच्या दिशेने वाटचाल' असा संदेश विश्व हृदय दिनाच्या निमित्ताने दिला आहे. खुशाली ही निरोगी शरीर व मानसिक स्वास्थ्य अशी अभिप्रेत आहे. पौष्टिक आहार, व्यायाम व धूम्रपानविरहित जीवनमान हाच खुशालीचा मंत्र आहे. प्रत्येक मनुष्याचा अधिकतर वेळ हा कामाच्या ठिकाणी जातो व त्यामुळे तेथील वातावरण प्रसन्न असणे गरजेचे आहे. यामुळेच ह्रदयापासून काम करा, असा संदेश देण्यात आला आहे, असे डॉ. खानोलकर म्हणाले. कामाच्या ठिकाणी धूम्रपानास बंदी घालणे, कॅन्टीनमध्ये जादा फळे व भाज्यांचा समावेश करणे व कामगारांना नित्यनेमाने शारीरिक हालचाली करण्यास प्रवृत्त करणे हा निरोगीपणाचा एक भाग आहे.
धूम्रपानामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका दुप्पट वाढतो. स्थूलपणा व जाडेपणामुळेही हृदयावर जादा दबाव पडतो. यामुळे हृदयविकाराची संभावना वाढते. शरीरातील रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुरळीतपणे होणे गरजेचे आहे, अन्यथा रक्तवाहिनीत "क्लॉट' तयार होतात व त्याचा परिणाम हृदयावर पडतो. नियमित व्यायाम व संतुलित आहार हा यावरील प्रमुख उपाय आहे. हृदयविकारावर उपचारात मोठ्या प्रमाणात संशोधन झाल्याने मनुष्यहानी कमी होत असली तरी ही बाब खर्चीक आहे व ती सर्वांनाच परवडणारी नाही, त्यामुळे काळजी व खबरदारी घेणेच रास्त आहे. नियमित व्यायामाद्वारेच हे टाळणे शक्य आहे व त्याची सवय करून घेणे फायद्याचे आहे.
Sunday, 27 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment