बेहिशेबी मालमत्तेची छाननी होणार, अनेकांचे धाबे दणाणले
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पोलिसांचे अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या माफियांशी साटेलोटे असल्याचे गंभीर आरोप झाले असल्याने आता संपूर्ण पोलिस खात्याचीच "शस्त्रक्रिया' करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. तसेच पोलिस शिपाई ते वरिष्ठ अधिकारी स्तरावरील पोलिसांच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाणार आहे. काही पोलिस शिपाई व अधिकाऱ्यांची बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती खात्याला मिळाली आहे.
तसेच पोलिसांचे ड्रग माफियांशी आणि गुन्हेगारांशी संबंध आहेत काय याचा छडा लावण्यासाठी गुप्तहेर नेमण्यात आल्याने अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.
गोव्याच्या किनारी भागांत वाढलेला अमली पदार्थांचा व्यवहार, स्कार्लेट किलींग या ब्रिटिश युवतीचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि या सर्व गैरप्रकारांशी जोडला जाणारा पोलिसांचा संबंध यामुळे खात्यांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारी प्रकारांशी जोडला जाणारा संबंध धक्कादायक असल्याने पोलिसांच्या आर्थिक स्थितीबाबत गांभीर्याने तपास करण्याची पाळी खुद्द पोलिस खात्यावरच आता आली आहे. त्यामुळे पोलिसांची मालमत्ता आणि त्यांच्या संपत्तीची छाननी करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत अमलीपदार्थ विरोधी पथकाने एखादा छापा सोडल्यास कोणतीही कारवाई केली नसल्याचीही दखल खात्याने घेतली आहे. तसेच या पथकाला अमलीपदार्थाचा मोठा साठा का सापडत नाही, याचीही चौकशी केली जाणार आहे. गोव्यात अमलीपदार्थाचे जाळे संपूर्ण किनारी भागात पसरल्याची माहिती पोलिस खात्याला मिळाली आहे. गोव्यात रशियन, इस्रायली तसेच ब्रिटिश माफियांनी आपला जम गोव्यातील किनारी भागात बसवला आहे. पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हा व्यवहार चालूच शकत नसल्याचीही बाबा गृह खात्याच्या लक्षात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने अमलीपदार्थ व्यवहारातील एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याने त्याला सेवेतून बडतर्फ कण्यात आले होते. हणजूणे येथे पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनात असलेल्या पोलिसांनी एका विदेशी व्यक्तीला धमकावून पैसे लुटल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते.
Tuesday, 1 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment