Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 April 2008

कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे पासून

दिल्ली, दि.२ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखांचा मुहूर्त अखेर एकदाचा निवडणूक आयोगाला सापडला. ही निवडणूक तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून, मतदान १०, १६ आणि २२ मे रोजी होणार आहे. मतमोजणी २५ मे रोजी केली जाणार आहे. याविषयीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी राजधानी दिल्लीत आज केली.
""निवडणूक आयोगाने मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतर देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. कर्नाटक विधानसभेच्या सर्वच म्हणजे २२४ मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर, दुसऱ्या टप्प्यांत ६६ जागांवर तर तिसऱ्या व अंतिम टप्प्यात ६९ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे,''असे गोपालस्वामी यांनी सांगितले.
""पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी अधिसूचना १६ एप्रिलला जारी केली जाईल. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल असून उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल आहे. दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना २२ एप्रिलला जारी केली जाईल. या टप्प्यात उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख २ मे आहे. अंतिम टप्प्याची अधिसूचना २६ एप्रिलला जारी होईल. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत ७ मे ठेवण्यात आलेेली आहे. ही निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात घेतली जाणार आहे. यासाठी निमलष्करी दलाची मदत घेतली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनचा वापर या निवडणुकीमध्ये केला जाईल. राज्यात ४ कोटी ७७ हजार ६६६ मतदार असून ३९७५८ मतदान केंद्रे आहेत,''असेही मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सांगितले.
दरम्यान, ""विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्यानंतर निवडणूक आयोग आता निवडणूक तयारींचा आढावा घेण्यासाठी येत्या ४ तारखेपासून कर्नाटकाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाचे पूर्ण पथक या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आयोग राजकीय पक्षांशी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी तसेच सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्तांशी चर्चा करणार आहे. हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे,''अशी माहिती निवडणूक आयोगाचे अधिकारी एम. एन. विद्याशंकर यांनी बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

No comments: